चेहर्यावर नैसर्गिक तेज येण्यासाठी (Glitter your...

चेहर्यावर नैसर्गिक तेज येण्यासाठी (Glitter your face the natural way)

माझ्या बहिणीचं लग्न ठरलं आहे. या वर्षभरातच लग्नाचा मुहूर्त निघेल. पण तिची त्वचा अगदी निस्तेज दिसते. यापूर्वी तिने कधीही त्वचेसाठी कोणत्याही प्रकारची प्रसाधने वापरलेली नाहीत. तेव्हा तिच्या चेहर्‍यावर नैसर्गिक तेज येण्यासाठी काही करता येईल का?
प्रतिभाताई सर्वप्रथम तुमच्या बहिणीचं अभिनंदन आणि शुभेच्छा! लग्न म्हटल्यानंतर सुंदर दिसावसं वाटणं स्वाभाविक आहे. काही काळजी करू नका. तिला हा लेप नियमितपणे लावायला सांगा. बदाम, खसखस, केशर आणि उगाळलेलं चंदन समप्रमाणात घेऊन लेप तयार करा. हा लेप चेहर्‍यावर लावून, सुकेपर्यंत तसाच ठेवा. तोपर्यंत बोलूही नका. साधारण 20 मिनिटांत लेप सुकेल. नंतर तो धुवा. असं आठवड्यातून दोनदा करा. नियमितपणे हा लेप तिला लावायला सांगा. चेहर्‍यावर नैसर्गिक तेज येईल.

माझी मुलगी, समिधा 15 वर्षांची आहे. एवढ्या वयातच तिचे केस थोडे थोडे पांढरे होऊ लागले आहेत. या प्रकारामुळे तिला आणि मला खूप काळजी वाटते. केस पांढरे होण्यामागे काय कारण असेल व केस पांढरे होऊ नयेत, यासाठी काय करता येईल?

केस अनेक कारणांमुळे अकाली पांढरे होतात. योग्य पोषण न मिळणं आणि चिंता ही त्यातील मुख्य दोन कारणं आहेत. तेव्हा सर्वप्रथम पौष्टिक आहार घेण्यावर भर द्या आणि अकारण चिंता करणं सोडून द्या. ताणतणावाचा विपरीत परिणाम आरोग्य आणि सौंदर्य दोघांवर होतो, हे लक्षात असू द्या. केस पांढरे होऊ नयेत यासाठी घरच्या घरी एक तेल तयार करता येईल. त्यासाठी एक वाटी बदाम तेलात अर्धा वाटी एरंडेल तेल एकत्र करा. त्यात एक चमचा मेथीदाणे आणि कांद्याची बी (कलाँजी) एकत्र करून आठ तास सूर्यप्रकाशात ठेवा.

नंतर हे तेल काचेच्या हवाबंद बाटलीत भरून ठेवा. हे तेल आठवड्यातून किमान दोनदा केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने मसाज करा. या घरगुती उपायाने खूप फायदा होईल.

माझा चेहरा, मान आणि हात कडक उन्हामुळे काळवंडले आहेत. ते उजळ व्हावेत, यासाठी ब्लिच करावं असं वाटतंय. कोणत्याही अपायाशिवाय योग्य परिणाम देईल असं एखादं घरगुती ब्लिच सांगाल का?

लिंबू आणि टोमॅटो यामध्ये त्वचेला ब्लिच करण्याचे, अर्थात त्वचा उजळविणारी तत्त्वं असतात. एका बशीमध्ये टोमॅटोचा रस घ्या आणि सपाट ब्रशच्या साहाय्याने हा रस काळवंडलेल्या त्वचेवर लावा. 20 मिनिटांनंतर त्वचा स्वच्छ धुवा. याच प्रकारे बशीभर पाण्यामध्ये पाच-सहा थेंब लिंबूरस एकत्र करून, ते पाणीही चेहर्‍यावर लावता येईल. त्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.