घेतलेला प्राणवायू निसर्गाला परत करा; डॉक्टरांचे...

घेतलेला प्राणवायू निसर्गाला परत करा; डॉक्टरांचे आवाहन (Give Back Oxygen You Consumed : Doctors Appeal)

”उपचारादरम्यान तुम्ही १ लाख ४४ हजार लिटर ऑक्सिजन आत घेतला आहे. त्यामुळे तुम्हाला जीवदान मिळालेले आहे. आता हा ऑक्सिजन तुम्ही निसर्गाला परत करा. म्हणजे निसर्गातून सर्व जणांना ऑक्सिजन मिळत राहील. त्यासाठी १० झाडे लावा आणि तुम्ही घेतलेल्या कृत्रिम प्राणवायूच्या मोबदल्यात नैसर्गिक प्राणवायू निर्माण करण्यास हातभार लावा,” असे आवाहन नागपूर येथील एका हॉस्पिटलचे प्रमुख असलेल्या डॉक्टरांनी केले आहे.

येथील गेट वेल हॉस्पिटलात ४१ वर्षांची एक महिला करोनाच्या संसर्गाने गंभीर अवस्थेत दाखल झाली होती. स्वाभाविकच तिला प्राणवायूवर ठेवण्यात आले होते. त्यातून ती बरी झाली, तेव्हा तिला डिस्चार्ज देताना हॉस्पिटल प्रमुख डॉ. राजेश स्वर्णकार यांनी तिला वरीलप्रमाणे आवाहन केले. त्यावर सदर महिलेने त्यांची बूज राखत वर्षभरात १० झाडे लावून, त्यांचे संवर्धन करण्याची कबुली दिली. ”कोविडने मला धडा मिळाला आहे. ऑक्सिजनचे महत्त्व कळले आहे. तेव्हा निसर्गातून जो आम्हाला मोफत मिळतो, तो त्याला परत करण्यासाठी प्राणवायू देणारी झाडे लावण्याची गरज आहे,” असेही उद्‌गार सदर महिलेने काढले.

सध्या रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. हा निसर्गातून आपल्याला अधिक प्रमाणात मिळाला तर आजारपण येणार नाही, या दृष्टीकोनातून डॉक्टरांचे हे आवाहन आहे. त्यामुळे त्यांच्या हॉस्पिटलामधून बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांना वरीलप्रमाणे आवाहन करण्याचा शिरस्ता त्यांनी पाळला आहे.