मान्सूनची उनाड स्टाईल (Give A Smart Look To You...

मान्सूनची उनाड स्टाईल (Give A Smart Look To Yourself With This Trendy Monsoon Fashion)


आपल्याला आवडो… न आवडो… मान्सून म्हटलं की चिंब होणं हे आलंच. मग भिजायचंच आहे, तर स्टाइलमध्येच भिजायला हवं… नाही का?
मान्सूनच्या चिंब दिवसांत बहुतेकांची भूमिका ही बचावात्मक असते. अर्थात, पावसाचं पाणी आणि चिखल यापासून बचावलो, म्हणजे दिवस सार्थकी लागला! कारण घराबाहेर पडल्यावर आपल्या पोशाखावर पाणी वा चिखलाचे शिंतोडे पडू
न देता कॉलेज वा ऑफिस गाठणं, हे मोठ्ठं आव्हानच असतं. मग अशात फॅशन आणि ट्रेण्ड यांना जरा बगलच दिली जाते. पण फॅशनसोबत केलेली ही तडजोड योग्य नाही. या चिंब वातावरणातही फॅशनसंबंधी अप-टू-डेट राहायला हवं… आणि ते तितकं अवघडही नाही. थोडी काळजी घेतली आणि त्यानुसार सध्याच्या ट्रेण्डचा सुयोग्य वापर केला, म्हणजे झालं! मान्सूनमध्ये फॅशन सज्ज होण्यासाठी हे काही मंत्र-

मान्सून बेसिक
सहज सांभाळता येतील, अशा आकर्षक पोशाखांची निवड करा.
पटकन सुकणार्‍या आणि रंग न सुटणार्‍या पोशाखांची निवड करा.
पांढर्‍या रंगाचे पोशाख परिधान करणे कटाक्षाने टाळा.
सौम्य रंगाचे किंवा शिअर टॉप्सही टाळलेलेच बरे. कारण पावसात भिजून ते शरीराला चिकटतात आणि अधिकच पारदर्शक होतात.
आपल्या वॉर्डरोबमध्ये विविध रंगांना आवर्जून स्थान द्या.
भिजल्यावर जड होणारे आणि लगेच न वाळणारे जाड फेब्रिक वापरू नका.
डेनिमही न वापरलेलीच बरी. वापरायची असल्यास
पूर्ण लांबीची न वापरता क्रॉप्ड जीन्स वापरा.
अगदी घट्ट मापाचे पोशाख घालणेही टाळा. कारण एकतर
ते कम्फर्टेबल नसतात आणि दुसरे म्हणजे भिजल्यावर
अतिशय विचित्र दिसतात.
पूर्ण लांबीचे ड्रेसही परिधान करू नका.
आखूड बाह्यांचे किंवा बिनबाह्यांचे पोशाख वापरा.
कमीत कमी ज्वेलरी आणि अ‍ॅसेसरीज परिधान करा.

मान्सून फ्रेण्डली फेब्रिक
पटकन सुकणारे, तसेच ऑफिसमधील एअरकंडिशनमध्ये ऊब देणारे फेब्रिक निवडा.
मान्सूनसाठी हलके फेब्रिक उत्तम पर्याय ठरतात. कारण जड फेब्रिक भिजल्यावर अधिक जड होतात आणि लवकर वाळतही नाहीत.
ब्लेंडेड कॉटन, क्रेप, पॉली कॉटन, शिफॉन आणि पॉली नायलॉन
हे फेब्रिक मान्सूनसाठी उत्तम आहेत. हे फेब्रिक पावसामुळे खराब होत नाहीत आणि त्यांची चमकही कमी होत नाही. महत्त्वाचे म्हणजे, ते पटकन सुकतात आणि त्यांना इस्त्रीही करावी लागत नाही.
मान्सूनच्या मौसमात सिल्कचाही वापर करता येईल.

बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटीफुल
या मौसमासाठी शॉर्ट ड्रेसेसचा पर्याय उत्तम ठरतो. म्हणूनच मान्सूनसाठी कपड्यांची खरेदी करताना लांब ड्रेसेसपेक्षा आखूड कपड्यांनाच प्राधान्य द्या.
इझी टू वेअर नी-लेंथ अर्थात गुडघ्यापर्यंत लांबी असलेल्या ड्रेसेसना वॉर्डरोबमध्ये जागा द्या.
हॉट पँट्स, नी-लेंथ किंवा बरमुडा असे वेगवेगळे प्रकार अजमावण्यासाठी मान्सूनचं निमित्त उत्तम आहे.
फुल लेंथ ट्राउझर्सपेक्षा कॅप्रीज, थ्री-फोर्थ पॅन्ट्सची निवड करा.
या सिझनमध्ये नी-लेंथ जम्प सूट्स ट्रेण्डमध्ये आहेत. वेगवेगळे फेब्रिक्स, पॅटर्न-डिझाइन्स, कर्लस असे बरेच पर्याय यात उपलब्ध आहेत.
तसेच या सिझनमध्ये नी-लेंथचे वनपिसही ट्रेण्डमध्ये आहेत. कॅप्रीज वा थ्री-फोर्थ लेगिंग्ससोबत किंवा त्यांच्याशिवायही या वनपिस ड्रेसेसचा लूक अतिशय आकर्षक दिसतो.
मान्सूनसाठी शॉर्ट स्कर्टस्ही उत्तम पर्याय आहेत. ते तुम्ही टी-शर्ट किंवा टँक टॉपसोबत घालू शकता.
रंगीत पॅन्ट्सचा ट्रेण्ड या सिझनमध्येही असेल. त्यामुळे रंगीत, प्रिंटेड पॅन्ट्सचा एखादा सेट तरी वॉर्डरोबमध्ये आवर्जून बाळगा.
विविध रंग, डिझाइन, लांबीच्या टी-शर्टस्चं कलेक्शन वॉर्डरोबमध्ये असू द्या. तुम्ही ते लेगिंग्स, जॉगिंग्स, पॅन्ट्स वा शॉर्टस्सोबत घालू शकाल.
तुमच्या वॉर्डरोबमधील समर कलेक्शनचे ग्राफिक टी-शर्ट, हुडेड ड्रेस, कार्डिगन, प्लेसूट, जम्प सूट, फ्लोरल प्रिंटचे ड्रेस असे पोशाख तुम्ही मान्सूनमध्येही घालू शकता. छान फ्रेश लूक मिळेल.
कॅज्युअल लूकसाठी थ्री-फोर्थ पॅन्ट वा लेगिंगसोबत टी-शर्ट, ट्युनिक किंवा कुर्ता घालता येईल.

पारंपरिक तरीही फॅशनेबल
सलवार-कमीज, साडी परिधान करतानाही त्यांना मान्सून फॅशनचा टच द्या.
ढगळ सलवार-कमीज किंवा क्रिस्प कॉटनचे कुर्ते घालू नका. भिजल्यावर ते वाईट दिसतात.
एम्ब्रॉयडरी केलेले सलवार, पटियाला किंवा चुडीदार घालणेही टाळा.
चुडीदार आणि कमी लांबीचे कुर्ते घाला.
फॉर्मल वेअरसाठी कुर्ता वा ट्युनिकसोबत चुडीदार किंवा लेगिंग्स घालता येईल.
शिफॉन किंवा क्रेपच्या साड्या घाला. त्या लवकर सुकतात आणि तसेच भिजल्यानंतर त्यांचा रंग
वा आकार वाईट दिसत नाही.

रंगांची उधळण करा
ब्राइट रंग पावसाळ्यातील मरगळलेल्या दिवसात नवा उत्साह भरतात.
मान्सूनसाठी गडद रंगांची निवड करा. कारण फिक्या रंगांमध्ये एकतर डाग पटकन दिसतात, शिवाय असे ड्रेस भिजल्यावर पारदर्शक होतात.
ब्राइट निऑन रंग अजूनही फॅशनमध्ये आहे. त्यामुळे पूर्णतः निऑन ड्रेस किंवा ओव्हरऑल लूकला निऑनचा थोडा टच देता येईल.
निऑन कलर पेस्टल शेडसोबतही आकर्षक दिसतात. जास्त ब्राइट लूक नको असल्यास तुम्ही निऑन न्यूट्रल रंगासोबत वापरू शकाल.
निऑन पोशाख घालायचा नसेल, तर निऑन अ‍ॅसेसरीजची निवड करता येईल. निऑन रंगाची छत्री, बॅग, फूट वेअर, ज्वेलरी इत्यादी तुम्ही वापरू शकाल. अगदी निऑन नेलपॉलिश किंवा लिपस्टिक लावूनही तुम्ही आपल्या लूकला निऑन इफेक्ट देऊ शकाल.

वॉटर रेसिस्टंट अ‍ॅसेसरी वापरा

ज्वेलरी
हल्ली बाजारात रंगीत, निऑन-फ्लोरसंट रंगाच्या सुंदर बांगड्या, कडे मिळतात. त्यांचा वापर तुम्ही करू शकाल.
तसेच प्लॅस्टिक, रबर किंवा अ‍ॅक्रेलिकचे ब्रेसलेट, कानातले किंवा गळ्यातलेही वापरता येतील.

बॅग
बॅगची खरेदी करताना ती वॉटरप्रूफ असेल याची अवश्य खात्री करून घ्या.
हल्ली बाजारात प्लॅस्टिक आणि जेलीच्या रंगीत आकर्षक बॅग्ज उपलब्ध आहेत.
बॅगचे नामांकित ब्रॅण्डही मान्सून स्पेशल कलेक्शन बाजारात आणतात, त्यांचाही लाभ घेता येईल.

रेनकोट
रेनकोटसाठीही बोअरिंग रंगांना बगल देत, टँगी ऑरेंज, ब्राइट रेड, ब्राइट ऑरेंज, पायनॅपल यलो किंवा निऑन पिंक अशा निऑन किंवा ब्राइट रंगछटेच्या ट्रान्स्परंट रेनकोटची निवड करा. छान बोल्ड लूक मिळेल.

छत्री
ब्राइट वा निऑन रंगछटेच्या प्लेन किंवा छान नाजूक डिझाइन्स असलेली ट्रान्स्परंट छत्री खरेदी करा.

सँडल्स व शूज
हाय हिल्स किंवा लेदर शूज पॅक करून हिवाळ्यासाठी सांभाळून ठेवा. मान्सूनसाठी अ‍ॅक्रॅलिकच्या सँडल्सचा पर्याय उत्तम आहे.
ब्राइट वा निऑन रंगछटेची अ‍ॅक्रॅलिक सँडल निवडा.
पीव्हीसी किंवा पीयु सोल असलेल्या सँडल्स किंवा शूज निवडा.
मान्सूनसाठी परफेक्ट असे ब्राइट रंग आणि आकर्षक स्टाईलचे ट्रान्स्परंट, स्ट्रॅपी सँडल्स, रबर शूज बाजारात उपलब्ध आहेत.
जेली शूजही ट्रेण्डमध्ये आहेत. कम्फर्टेबल असण्यासोबतच ते आकर्षक दिसतात.
यामध्ये विविध रंगांचा पर्याय उपलब्ध असतो.
मान्सूनच्या चिंब दिवसांत आकर्षक लूक देणारा आणि तरीही आरामदायी असणारा, असा पोशाख परिधान करण्यावर भर द्या. ते करताना लूकच्या बाबतीत थोडे प्रयोगशील व्हायला हरकत नाही. तेव्हा, तुम्ही जे काही परिधान कराल त्याला स्वतःचा असा आगळा टच अवश्य द्या.