केस मोकळे व सतेजकसे दिसतील? (Give A Bright And ...

केस मोकळे व सतेजकसे दिसतील? (Give A Bright And fresh Look To Your Hair)

मी 38 वर्षांची विवाहित स्त्री आहे. माझे केस खूप कोरडे आहेत. त्यामुळे ते थंडीच्या दिवसात जास्तच निस्तेज दिसतात. केसावरून आंघोळ केल्यास ते जास्तच फुलतात. त्यामुळे मी कधीही केस मोकळे सोडू शकत नाही. कृपया मला केस मोकळे व सतेज आणि स्लिक होण्यासाठी एखादा उपाय सुचवाल का?

 • मनीषा, पुणे
  माझे केससुद्धा पूर्वी खूप कोरडे अगदी तुम्ही जसे वर्णन केले आहेत, तसेच होते. केस कोरडे असल्यास आहारात बदाम, शेंगदाणे, पालेभाज्या, कडधान्य अशा पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा केसाच्या मुळांना तेलाने मसाज करून थोडी वाफ देणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे केसांना स्लिक आणि शायनिंग येण्यासाठी घरगुती पॅक म्हणून अर्धी वाटी तयार भात व एक वाटी नारळाचे दूध मिक्सरला लावून हे क्रिमी मिश्रण एक-एक बटा घेऊन केसांना व्यवस्थितपणे घासून लावावे. मुळांना लागल्यास हरकत नाही. एक तासानंतर केस धुऊन टाकावे. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्यास केसांचा पोत सुधारून केस सुंदर होण्यास मदत होईल.
 • मी एक 37 वर्षीय तरुणी आहे. माझे हात व पाय दोन्ही फुटतात. पायांना भेगाही पडतात. त्यासाठी मला घरगुती उपाय सांगा?
 • सुनंदा, नागपूर
  आपला चेहरा सुंदर राहण्यासाठी आपण सतत उपाय करत असतो, तो जास्तीत जास्त कसा मेन्टेन राहील यासाठी आपण प्रयत्नशील असतो. अशा वेळी जर आपल्या पायांना भेगा पडल्या असतील, तर अगदीच लाज वाटते. अशा वेळी कोमट पाण्यात लिंबू, मध व थोडे मीठ टाका व त्यात दहा मिनिटे पाय बुडवून ठेवून, त्याच पाण्यात तुमचे हात-पाय स्वच्छ घासून घ्या. यामुळे तुमच्या हातापायांची मृत त्वचा निघून जाईल व हातापायांना चांगली चमक येईल. कडुलिंबाच्या पाल्याचा रस भेगांना लावला तर भेगा कमी होण्यास मदत होईल. तसेच कोरफड आणि तूप हे मिश्रण हाता-पायांना लावल्यास भेगा व फुटलेली त्वचा बरी होईल.
 • मी 43 वर्षांची एक विवाहित स्त्री आहे. माझी त्वचा खूप कोरडी आहे. त्वचा मऊ मुलायम राहण्यासाठी काही उपाय सुचवाल का?
 • रंजना, मुंबई.
  हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे हे साहजिक आहे. त्यासाठी आहारात स्निग्ध पदार्थांचा वापर करावा. म्हणजे योग्य पोषक असे, जास्त तेलकट नकोत. तुम्ही दिवसातून दोन वेळा चेहरा धुवा. त्यानंतर तुमच्या चेहर्‍याचा ओलावा टिकून राहण्यासाठी दोन-तीन बदाम घ्या, त्यात थोडं दूध घेऊन त्याची पेस्ट तयार करा. आंघोळीआधी चेहर्‍यावर ही पेस्ट लावून दहा मिनिटांनंतर चेहरा धुऊन टाका. असे रोज केल्यास थंडीतही तुमची त्वचा मऊ, मुलायम आणि तजेलदार दिसेल. तसेच केळं, मध व ऑलिव्ह ऑईलचे दोन तीन थेंब टाकून ही पेस्ट चेहर्‍यावर लावल्यास चेहरा चमकदार व ताजातवाना दिसेल.