निर्माल्य द्या , झाडांचे खत मोफत मिळवा ! (Get F...
निर्माल्य द्या , झाडांचे खत मोफत मिळवा ! (Get Free Organic Manure In Exchange Of Flowers Waste)

गणेशोत्सवाच्या काळात गौरी-गणपतीला वाहिलेल्या हार-फुले यांचे निर्माल्य मोठया प्रमाणावर जमत असते. या निर्माल्यामध्ये नाश न होणारे साहित्य असते. ते पाण्यात सोडले जाण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. पण तिथेही ते नाश होत नाही. त्यामुळे पर्यावरणास धोका पोहचतो.
यावर तोडगा ठाणे येथील विवियाना मॉलने काढला आहे. त्यांनी भक्तजनांना वनस्पती, हार, फुले, पाने, कापूस असे साहित्य आपल्या मॉलमध्ये आणून देण्याचे आवाहन गणेश भक्तानां केले आहे. हे निर्माल्य गोळा करण्यासाठी मॉलमध्ये पुढील व मागील प्रवेशद्वार तसेच बेसमेंटमध्ये, एकूण ३ कंटेनर्स ठेवण्यात आली आहेत. विसर्जनाच्या दिवशी निर्माल्याचे प्रमाण जास्त असते, त्या दिवशी या पिक पॉईंट्स मध्ये निर्माल्य आणून टाकावे, अशी अपेक्षा मॉलने व्यक्त केली आहे.


या संदर्भात विवियाना मॉलच्या प्रमुख मार्केटिंग अधिकारी रीमा कीर्तिकर यांनी सांगितले की , ” हे निर्माल्य प्रोजेक्ट आम्ही पर्यावरणाच्या संवर्धनासाठी टाकलेले पाऊल आहे. गणेशोत्सव पर्यावरण पूरक व प्रदूषणमुक्त करण्यात छोटे योगदान देण्याची आमची इच्छा होती. या निर्माल्याचे रूपांतर कंपोस्ट खतामध्ये करण्यात येईल व ते परत नागरिकांनाच वितरित करण्यात येईल.”


सदर मॉलचा स्वतःचा खत प्रक्रिया करण्याचा कारखाना आहे. या ऑरगॅनिक वेस्ट मॅनेजमेन्ट प्लान्ट मध्ये दरमहा सुमारे ४ टन सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी गुरविनित सिंग यांनी पुढे आपली योजना सांगितली, ते म्हणाले, ” निर्माल्य कलेक्शन बॉक्सच्या शेजारी एक नंबर देण्यात आला आहे. निर्माल्य टाकणार्यांनी त्यावर मिस्ड कॉल दिला की , त्यांना आमच्या प्लान्टमध्ये तयार झालेले सेंद्रिय खत मोफत दिले जाईल.” मॉलमध्ये श्री गणेश मूर्तीची स्थापना देखील करण्यात आली आहे.