जेनेलिया देखमुखचं १० वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर...
जेनेलिया देखमुखचं १० वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन, रितेश देशमुख सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा! (Genelia Deshmukh returns to acting after 10 years with Riteish Deshmukh’s directorial debut Marathi film Ved)

सिनेमाच्या मोठ्या पडद्यापासून ते खऱ्या आयुष्यातील सोबतीपर्यंत अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा (Genelia Deshmukh) यांची जोडी नेहमीच यशस्वी ठरली आहे. मोठ्या पडद्यावर या जोडीला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. दोघेही अनेक चित्रपटात एकत्र दिसले आहेत. आता त्यांच्या चित्रपटांच्या यादीमध्ये आणखी एका चित्रपटाचे नाव जोडले गेले आहे.

२० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वेड’ या मराठी चित्रपटातून रितेश दिग्दर्शनात पदार्पण करणार असून, त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण करणार आहे. मोठ्या ब्रेकनंतर जेनेलिया मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
रितेशने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिले की, ‘२० वर्षे कॅमेऱ्यासमोर राहिल्यानंतर मी पहिल्यांदाच त्याच्या मागे उभे राहण्यास तयार झालो आहे. मी माझा पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित करत असल्यामुळे, मी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मागतो आहे. या प्रवासाचा एक भाग व्हा, या वेडाचा भाग व्हा.’
वेड pic.twitter.com/5BMrEjyLua
— Riteish Deshmukh (@Riteishd) December 8, 2021
या चित्रपटात दिग्दर्शनासोबतच रितेश अभिनयाचीही कमान सांभाळणार आहे. रितेश-जेनेलियाच्या नव्या चित्रपटाचे संगीत अजय-अतुलने दिले आहे. रितेशने स्वतः सांगितले आहे की, ‘वेड’ म्हणजे वेडेपणा. यासोबतच त्याने चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे. या पोस्टरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट मुंबई फिल्म कंपनी सादर करणार आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री जिया शंकर देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. शिवाय रितेश – जेनेलिया यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

जेनेलियाने या आधी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. १२ ऑगस्ट २०२२ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जेनेलिया २०२० मध्ये अनीस बज्मी यांच्या ‘इट्स माय लाईफ’ मध्ये दिसली होती. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता हरमन बावेजा दिसला होता.
रितेशच्या नव्या चित्रपटांविषयी बोलायचे तर, रितेश लवकरच ‘प्लॅन ए प्लान बी’ या चित्रपटात दिसणार आहे. शशांक घोष दिग्दर्शित हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. तसेच तो ‘काकुडा’मध्ये सोनाक्षी सिन्हासोबत दिसणार आहे.