गणेशोत्सव मंडळ आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात रं...

गणेशोत्सव मंडळ आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात रंगलेला कलगी-तुरा (Ganeshotsav Mandal And Maharashtra Government On Warfront)

करोनाच्या निर्बंधामुळे गेल्या वर्षी अगदी साधेपणाने साजरा झालेला गणेशोत्सव यंदाच्या वर्षी देखील साधेपणानेच साजरा करावा, अशा सूचना सरकारच्या गृह विभागाने दिल्याने, तमाम गणेशभक्त तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे नाराज झाली आहेत. उत्साह आणि जल्लोषाने साजरे होण्याच्या आशेवर यंदाही विरजण पडल्याने ही मंडळे कमालीची नाराज झाली असून समाज माध्यमांवर या मंडळांनी निषेध नोंदवणे चालू केले आहे. त्याचप्रमाणे सरकारशी संघर्ष करण्याची तयारी दर्शविली आहे.

शासनाच्या गृह विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे घरच्या गणपतीची मूर्ती २ फूट तर सार्वजनिक गणेशोत्सवातील मूर्तीची उंची फक्त ४ फूट ठेवावी लागणार आहे. तसेच श्री गणेशाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीवर पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे.

येत्या सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या या गणेशोत्सवात गणपतीची सजावट करताना भपकेबाजी नको, तसेच लाऊडस्पीकर बंदी आणि गणपती उत्सवाच्या मंडपात करोना प्रतिबंधक उपाययोजना करावी, असे शासनाने म्हटले आहे.

शासनाने या सूचनांचा फेरविचार करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे. तर गणपतीची मूर्ती बनविणाऱ्या मूर्तीकारांमध्ये असंतोष पसरला आहे. कारण गेल्या वर्षी करोनाच्या निर्बंधामुळे त्यांनी अक्षरशः उपासमार सहन केली आहे. जे मूर्तीकार पूर्णतः या व्यवसायावर अवलंबून आहेत, त्यांना सलग दुसऱ्या वर्षी नुकसान सोसावे लागणार आहे. त्यामुळे सर्व नियम मागे घेण्यात यावेत, अशी त्यांची मागणी आहे.

मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची एक समन्वय समिती आहे. त्यांनी देखील शासनावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या ४० वर्षांपासून सदर समिती सरकारशी समन्वय साधते आहे. पण यंदा मात्र सरकारने आपल्याशी कोणतीही चर्चा न करता हे निर्बंध लादल्याने त्यांनी निषेधाचे सूर लावले आहेत.

राज्यकर्तेच शेकडोंची गर्दी जमवतात. त्यांच्यावर कोणतेही निर्बंध लागू केले जात नाहीत. मग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवरच गर्दीबाबत निर्बंध का, असा सवाल गणेशोत्सव मंडळांनी केला आहे. या मुद्द्यावरून गणेशोत्सव मंडळे आणि शासन यांच्यात कलगी-तुरा रंगत असल्याचे दिसून येत आहे.