अंगावर काटा आणणारा ‘गांधी गोडसे एक युद्ध&...

अंगावर काटा आणणारा ‘गांधी गोडसे एक युद्ध’ चा ट्रेलर प्रदर्शित (Gandhi Godse Ek Yudh Trailer Out)

गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा ‘गांधी गोडसे- एक युद्ध’ हा चित्रपट चर्चेत आहे. ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाचा टीझर समोर आल्यापासून सर्वजण या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. अशा परिस्थितीत प्रेक्षकांच्या मागणीनुसार ‘गांधी गोडसे एक युद्ध’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ३ मिनिटे १० सेकंदांच्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तुम्ही भारताच्या त्या कालखंडात पोहोचाल, जिथे स्वातंत्र्यानंतरही फाळणीची परिस्थिती होती.

नथुराम गोडसेने बापूंना म्हणजेच महात्मा गांधींना मारण्याचा निर्णय घेतल्याने अखेर काय झाले, हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. आजूबाजूला फक्त रक्तपात आणि जाळपोळ. दुसरीकडे, महात्मा गांधी संपूर्ण प्रश्न अहिंसेने सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु यावेळी देशात अनेक लोक आहेत जे त्यांचे ऐकायला तयार नाहीत. त्याचवेळी नथुराम गोडसेही बापूंशी त्यांच्या विरुद्ध विचारसरणीचा संघर्ष करताना दिसत आहेत.

आजवर पडद्यावर दाखविण्यात आलेल्या सर्व कथांमध्ये केवळ महात्मा गांधी आणि त्यांचे विचार मांडण्यात आले आहेत, मात्र यावेळी नथुराम गोडसे यांचे विचारही जाणून घेण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे. राजकुमारच्या ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या सिनेमाची चर्चा होत आहे.

गुजराती चित्रपट दिग्दर्शक दीपक अंतानी या चित्रपटात महत्मा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता चिन्मय मांडलेकर गोडसेंची भूमिका साकारणार आहे. सिनेमाची कथा वेगळी आहे. गोडसे गांधींवर गोळ्या झाडतो पण गांधी त्यातून वाचतात. पुढे गांधींना नथुरामला भेटण्याची इच्छा असते, अशी या सिनेमाची भन्नाट कल्पना आहे. रिलीजआधीच सिनेमाची चर्चा आहे. परंतु पठाण या बिग बजेट सिनेमासमोर गांधी – गोडसे सिनेमा टिकणार की सपशेल आपटणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

राजकुमार संतोषी दिग्दर्शित गांधी गोडसे हा चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या एक दिवस आधी अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट कमाई करणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटातून राजकुमार संतोषी तब्बल ९ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे.