गणपतीसाठी नैवेद्य (Ganapati Special Recipes)

गणपतीसाठी नैवेद्य (Ganapati Special Recipes)

उकडीचे मोदक

साहित्य : पारीसाठी : १ कप तांदळाचं पीठ, १ कप पाणी, अर्धा कप दूध, १ चमचा साखर, पाव चमचा मीठ, १चमचे तेल किंवा लोणी.

सारणासाठी : १ कप नारळाचा चव, १ कप गूळ, अर्धा कप साखर, २ चमचे भाजलेल्या खसखशीची पूड, थोडा भाजलेला खवा, स्वादानुसार वेलची-जायफळ पूड.

कृती : दूध, पाणी, साखर, मीठ आणि तेल एकत्र करून उकळी येऊ द्या. आता त्यात तांदळाचं पीठ घालून झटपट ढवळत राहा. उकड पूर्णपणे न शिजवता लगेच झाकून ठेवा. उकड गरम राहण्यासाठी एका मोठ्या भांड्यात थोडं गरम पाणी घालून त्यात उकडीचं भांडं ठेवा आणि झाकण बंद करा. उकडीत गुठळ्या झाल्या असल्यास, ती पुरणयंत्रातून फिरवून घ्या. आता हवी तेवढी उकड घेऊन तेल व पाणी लावून मळा आणि त्याचे तीन-चार गोळे बनवा. उकड थंड झाल्यास पारीला कडेने चिरा पडतात, म्हणून मोदक होईपर्यंत उकड गरमच राहील याची काळजी घ्या.

सर्वप्रथम केवळ नारळाचा चव थोडा परतून घ्या. नंतर त्यात गूळ, साखर, खसखस, वेलची-जायफळ पूड आणि खवा घालून सारण एकजीव करून घ्या.

आता तांदळाच्या उकडीचा गोळा तळहातावर घेऊन त्याला खोलगट वाटीप्रमाणे आकार द्या. या पारीला चुण्या द्या. या चुण्यांमधील अंतर समान असायला हवं. यामुळे मोदक सुबक दिसतात. त्यात अंदाजे सारण भरून मोदक तयार करा.

पातेल्यात पाणी घालून त्याला उकळी येऊ द्या. यावर चाळणी ठेवा. चाळणीत तुपाचा हात लावलेली केळीची पानं ठेवून त्यावर मोदक ठेवा. मोदक दहा-बारा मिनिटं वाफवा.

टीप :

* नारळाच्या चवाचं प्रमाण नेहमी तांदळाच्या पिठाच्या दुप्पट असायला हवं.

* सारण तयार करताना, सर्वप्रथम केवळ नारळाचा चव थोडा परतून घेऊन नंतर त्यात गूळ घातला, तर गुळाला पाणी सुटत नाही आणि सारण खमंग बनतं.

*मोदक वाफवताना, पात्रात केळीच्या पानाऐवजी हळदीचं पान ठेवल्यास, मोदकांना छान सुगंध येतो.

*तसंच तुपाऐवजी लोणकढं तूप वापरल्यास मोदक ­­­अधिक चांगले बनतात.

अळूचं फतफतं

साहित्य : ८-१० भाजीच्या अळूची पानं, अर्धा कप वाटलेलं खोबरं, अर्धा कप भिजवलेले शेंगदाणे, दीड कप पाणी, १ टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून हळद, १ टीस्पून गरम मसाला, २ हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या, १ टेबलस्पून गूळ, १ टेबलस्पून चिंचेचा कोळ, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, स्वादानुसार मीठ.

कृती : अळूची पानं स्वच्छ करून, धुऊन, बारीक चिरून घ्या. प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करून त्यात जिर्‍याची फोडणी करा. नंतर मिरच्या आणि हळद घालून परतवा. त्यात अळूची पानं घालून थोडा वेळ परतवा. नंतर शेंगदाणे, गरम मसाला, गूळ आणि मीठ घालून चांगलं एकजीव करा. त्यात पाणी घालून कुकरचं झाकण लावा आणि तीन शिट्ट्या करा.

कुकर थंड झाल्यानंतर उघडून पुन्हा आचेवर ठेवा. त्यात वाटलेलं खोबरं, चिंचेचा कोळ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून चांगलं एकजीव करा. पाच मिनिटांकरिता मिश्रण शिजू द्या. गरमागरम अळूचं फतफतं चपाती किंवा भातासोबत सर्व्ह करा.