स्वस्थ राहा नि सुंदर दिसा… (Gain Health a...

स्वस्थ राहा नि सुंदर दिसा… (Gain Health and Look Beautiful)

वजन कमी करण्याच्या क्रियेमध्ये शरीरातील चरबी कमी झाल्यामुळे हाडालगतची त्वचा सैलावते. याउलट वजन वाढवण्याच्या प्रयत्नात त्वचा ओढली जाते. त्यामुळेही त्वचेवर ताण येतो. वजन कमी-जास्त करताना त्वचेसंदर्भात होणार्‍या स्ट्रेच मार्क्स आणि स्किन टाइटनिंग या दुष्पपरिणामांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
सध्या सर्वत्र झिरो फिगरची क्रेझ पाहावयास मिळते. तीदेखील इन्स्टंट! हळद प्या नि आरशात जाऊन पाहा, इतक्या तात्काळ परिणाम अपेक्षित असतो. सडसडीत, कमनीय शरीरयष्टी म्हणजे सौंदर्य असंच समीकरण ग्राह्य धरलेलं असतं. त्यामुळे शरीर स्वास्थ्यापेक्षा आकर्षक बांध्यासाठीच प्रत्येक जण प्रयत्न करताना दिसतो. सौंदर्य कशावर अवलंबून असतं? कशानं बिघडतं? कशानं वाढतं? या मूलभूत गोष्टींविषयी आपल्याला काहीही माहिती नसते किंवा असल्यास ती अर्धवट असते. आणि मग या अर्धवट माहितीनुसारच शक्य त्या प्रयत्नाने बांधा सडसडीत बनवण्यासाठीची धडपड सुरू होते.
खरं म्हणजे, शरीराचा बांधा कृश वा स्थूल कसाही असला, तरी शरीरस्वास्थ्य निरोगी असणं सौंदर्यासाठी हितावह असतं. जिम, व्यायामशाळा, दवाखाने, ब्युटी सेंटर्स आणि वैद्यकीय संस्थांमध्ये ठरावीक काळात विशिष्ट संख्येने वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी ऑफर्स दिल्या जातात. अर्थात, इथे वैद्यकीय बाब कितपत पाळली जाते, हे शंकास्पद आहे. तरीही अशा अशास्त्रोक्त पद्धतीने वजन कमी-जास्त करण्यास प्राधान्य दिलं जातं, हे वास्तव आहे. मात्र या आकर्षक आणि बांधेसूद सौंदर्याच्या लोभापायी मूळ सौंदर्यच लुप्त होण्याची शक्यता निर्माण होते.

बर्‍याच व्यक्तींच्या बाबतीत वजन कमी-जास्त करताना त्वचेवर काही दुष्परिणाम दिसून येतात. म्हणजे, सर्वसाधारणपणे वजन वाढतं तेव्हा आपली त्वचा ताणली जाते अन् तेच वजन कमी झालं की, त्वचा सैल पडते. वजन कमी-अधिक करण्याने शरीराच्या अंतर्बाह्य त्याचे परिणाम दिसून येतात. वजन ही अतिशय संवेदनशील बाब असून, ती व्यक्तीनिहाय बदलत जाते. शरीराची ठेवण, राहणीमान, उंची यानुसार वजनाचा योग्य भार शरीरास संतुलित ठेवतो. परंतु, अति लठ्ठपणा किंवा अति कृशता या दोहोंमध्ये; एकीकडे शरीरातील पोषणमूल्यांचं योग्य वाटप होत नाही, तर दुसरीकडे पोषणमूल्य योग्य मात्रेत शरीरात वितरित होत नाहीत. अन् शरीराचं संतुलन बिघडतं. त्यासाठी संतुलित उपचारपद्धतीचा वापर केल्यास ते फलदायी ठरतं.
योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात वजन नियंत्रित न केल्यास हार्मोनल इम्बॅलन्स होतो, तसंच पेशींनाही इजा पोहोचते. शरीरातील चरबी एकदम कमी झाल्यास मांस पेशींना इजा पोहोचते. काही व्यक्तींमध्ये शारीरिक आणि मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते. हल्ली अति उच्च वर्गात एक प्रकारचं ड्रग (औषध) घेण्याची सवय पाहायला मिळते. हे ड्रग सरकारद्वारा प्रतिबंधित असलं तरी त्याच्या सेवनाने व्यक्तीस किमान 62 तास भूक जाणवत नाही. परंतु, अशा रासायनिक विघातकांमुळे जिवास धोका उद्भवतो, हे लक्षात घ्यायला हवं.
वजन कमी करण्याच्या क्रियेमध्ये शरीरातील चरबी कमी झाल्यामुळे हाडालगतची त्वचा सैलावते. अशी सैलावलेली त्वचा कालांतराने ओघळते. याउलट वजन वाढवण्याच्या प्रयत्नात त्वचा ओढली जाते. त्यामुळेही त्वचेवर ताण येतो. तेव्हा वजन कमी-जास्त करताना त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स, तसंच त्वचेचा घट्टपणा (टाइटनिंग) याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

काय होऊ शकतं?
वजन कमी करण्याच्या क्रियेमध्ये शरीराअंतर्गत होणार्‍या दुष्परिणामांविषयी
– मांस पेशींना दुखापत झाल्यास त्वचा कायमची क्षतीग्रस्त होते.
– त्वचेला अल्प मात्रेत किंवा कमी-जास्त असंतुलित मात्रेत जीवनसत्त्व किंवा पोषणमूल्य मिळाल्यास त्वचेच्या अंतर्भागास हानी पोहोचते.
– शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यास त्वचेला आर्द्रता न मिळाल्यामुळे त्वचेच्या आतील दुसरा थर कोरडा होतो. त्यामुळे त्वचा शुष्क होते.
– त्वचेला आलेली सैलता त्वरित आटोक्यात न आणल्यास त्वचा कायमची  सैलावते.

स्ट्रेच मार्क्स व सैलपणा घालवण्यासाठी काय करावं?
– मांड्यांना मड पॅक लावा. त्यामुळे त्वचा घट्ट होते.
– चंदनबलालक्षदी तेलाने मांड्यांना नियमित मालीश करा.
– पोटावरील स्ट्रेच मार्क्स घालविण्यासाठी, लाकडी लाटणं खाद्य तेलात बुडवून त्वचेवर हलक्या दाबाने फिरवा. दहा मिनिटांनी पोटाला गरम पाण्याचा शेक घ्या.

– पोट आणि मांड्यांसाठी, रोजमेरी अरोमा ऑईल आणि कच्चं तेल 1ः9 प्रमाणात एकत्र करा. ते गरम करून त्वचेवर चोळा. अर्ध्या तासानंतर त्वचेवर गरम पाण्याचा ओला शेक घ्या.
– तसंच नियमित व्यायाम आणि मालीशद्वारेही पोट आणि मांड्यांची त्वचा अधिक सतेज होऊ शकते.
– खोबरेल, चंदनबलालक्षदी, बला, कोकम, शेंगदाणा, तीळ इत्यादी तेलाने पोट आणि मांड्यांना मालीश करा.
– संत्रं, मोसंबी, लिंबू, कलिंगड इत्यादी फळांचे रस एक चमचा दुधाच्या पावडरसोबत पोट आणि मांड्यांच्या त्वचेवर लावा.
– हातावरील त्वचा पातळ झाल्यास टी ट्री अरोमा तेलाने किंवा कोमट खोबरेल तेलाने मसाज करा.

त्वचेसाठी उपयुक्त पॅक
1 (बेसन + रक्तचंदन ) 2 (चंदन + पिठीसाखर) 3 (तिळकूट + बेसन) 4 (संत्रं पावडर + चंदन)

आहार कसा असावा?
स्ट्रेच मार्क्स आणि त्वचा सैल होऊ नये, यासाठी हे आहारशास्त्रीय उपाय अवश्य करा.
– नियमित अंतराने पाणी प्या.
– सफरचंद जरूर खा.
– आहारात डाळिंबाचा समावेश करा.
– अँटी-ऑक्सिडंट अधिक असलेला आहार घ्या.
– झिंक, प्रथिनं, अ जीवनसत्त्वाचा वापर वाढवा.
– ब, ब6 आणि ब12 या जीवनसत्त्वांची तपासणी करून घ्या.
– आहारात मध, कांदा, बीट असू द्या.

योगाभ्यासही उपयुक्त
– योग ही एक संथ आणि साधी सहज क्रिया आहे. मात्र नियमित योग शरीरस्वास्थ्य उत्तम राखतं.
– अनुलोम विलोम, कपालभारती असे योग प्रकार त्वचा आणि मांसपेशी लवचीक बनवतात.
– दीर्घ श्‍वसन केल्यास त्वचा उत्तम आणि लवचीक बनते.

चेहर्‍यासाठी…
वजन त्वरित कमी-जास्त झालं की, त्याचा परिणाम चेहर्‍याच्या त्वचेवरही होतो. चेहर्‍यावरील मार्क्स, तसंच ओघळलेल्या त्वचेवर हे उपाय करा-
– चेहर्‍यावर वरच्या दिशेने गोलाकार मसाज करा.
– त्यासाठी जोजोबा आणि रोजमेरी ऑईल वापरा.
– खाण्याच्या कच्च्या तेलानेही मसाज करता येईल.
– भाजलेलं बेसन आणि ताक एकत्र फेटून त्वचेवर लावा.
– रक्तचंदन, मुलतानी माती ताकात फेटून त्वचेवर लावा. 

गळ्यासाठी…
गळ्यावरील चरे आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी हे उपाय करता येतील-
– बदाम तेल कच्च्या खाद्य तेलात एकत्र करून लावा.
– पपईचा गर मानेवर लावा.
– रक्तचंदन दुधात उगाळून लावा.

सौंदर्याची अनुभूती व्यक्तीसापेक्ष असते. प्रत्येकाची सौंदर्याकडे पाहण्याची दृष्टी वेगवेगळी असते. आणि त्याप्रमाणे तो सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, हा प्रयत्न योग्य दिशेने झाला तरच त्याचा फायदा होतो, हे लक्षात ठेवा.

– स्वप्निल वाडेकर (सौंदर्य, आहार व आरोग्यतज्ज्ञ)