श्रीदेवीपासून अनिल कपूरपर्यंत, या बॉलिवूड सेलिब...

श्रीदेवीपासून अनिल कपूरपर्यंत, या बॉलिवूड सेलिब्रिटींनी दाक्षिणात्य चित्रपटांमधून केला आपल्या करिअरचा श्रीगणेशा (From Sridevi To Anil Kapoor, These Bollywood Celebs Started Their Career With South Films)

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूने अलीकडेच मी बॉलिवूडला परवडणार नाही, असे वक्तव्य केले होते. हिंदी चित्रपटांमध्ये काम करून आपला वेळ वाया घालवणार नाही, असेही तो म्हणाला होता. पण दक्षिणेतील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये काम करुन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि प्रेक्षकांनीही त्यांना खूप पसंत केले आहे. पण तुम्हाला माहित आहे का, बॉलिवूडचे असे अनेक मोठे सेलेब्स आहेत ज्यांनी साऊथ इंडस्ट्रीमधून पदार्पण केले आणि आज त्यांचे नाव बॉलिवूडच्या टॉप स्टार्सच्या यादीत सामिल आहे. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही सेलिब्रिटींबद्दल-

अनिल कपूर

अनिल कपूर यांनी साऊथ चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. मात्र, साऊथमध्ये डेब्यू करण्यापूर्वी त्यांनी ‘हमारे तुम्हारे’ या बॉलिवूड चित्रपटात छोटी भूमिका केली होती. १९८० मध्ये आलेला ‘वामसा वृक्षम’ हा त्यांचा मुख्य अभिनेता म्हणून पहिला चित्रपट होता. यानंतर त्यांनी ‘पल्लवी अनुपल्लवी’ नावाच्या कन्नड चित्रपटातही काम केले होते.

श्रीदेवी

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी त्यांच्या करिअरमध्ये ३०० चित्रपट केले. आज त्या आपल्यात नाहीत पण त्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून त्या कायम आपल्यातच असतील. श्रीदेवी यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात साऊथ सिनेमांमधून केली होती. श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कंथन करुणाई’ या तमिळ चित्रपटात काम केले होते.

रेखा

सदाबहार अभिनेत्री रेखाचे वडील तामिळ इंडस्ट्रीतील सुपरस्टार होते आणि तिची आई तामिळ चित्रपटसृष्टीची नायिका होती. रेखा १ वर्षांची होती तेव्हा तिने तेलुगू चित्रपट ‘इंती गुट्टू’मध्ये एक छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर रेखाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले.

ऐश्वर्या राय

ऐश्वर्या रायचा पहिला चित्रपट ‘इरुवर’ हा होता. मणिरत्नम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यानंतर ती ‘जीन्स’ या तामिळ चित्रपटात दिसली होती. तिथून सुरू झालेला तिचा प्रवास बॉलिवूडपर्यंत पोहोचला. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत आज ऐश्वर्याच्या नावाची गणना होते.

प्रियंका चोप्रा​​​​​​​​​​​​​​

बॉलिवूडनंतर प्रियंका चोप्राने हॉलिवूड चित्रपटांमध्येही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ती ग्लोबल आयकॉन बनली आहे, पण तुम्हाला माहित आहे का, तिने आपल्या करिअरची सुरुवात साऊथ चित्रपटांमधून केली होती. 2002 मध्ये, ती ‘हमराज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती, परंतु काही कारणास्तव ती या चित्रपटातून बाहेर पडली आणि त्याच वर्षी तमिळ चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

दीपिका पदुकोण​​​​​​​​​​​​​​

‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दीपिका पदुकोणचा पहिला चित्रपट ‘ऐश्वर्या’ हा कन्नड चित्रपट होता. त्यानंतर तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.

दिशा पाटनी​​​​​​​​​​​​​​

दिशा पाटनीने तिच्‍या करिअरची सुरुवात तेलुगू चित्रपट ‘लोफर’मधून केली होती. मात्र, तिचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यानंतर टायगर श्रॉफसोबत म्युझिक व्हिडिओ केल्यानंतर तिला ‘एमएस धोनी’ हा चित्रपट मिळाला होता.