बॉलिवूडच्या या सुंदर अभिनेत्रींनी केल्या होत्या...

बॉलिवूडच्या या सुंदर अभिनेत्रींनी केल्या होत्या खलनायिकेच्या भूमिका (From Serial Killer to Lady Villain, These Beautiful Bollywood Actresses Have Played Negative Roles in Films)

बॉलिवूडमध्ये कतरिना कैफपासून ते प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर खानपर्यंतच्या अभिनेत्रींना चित्रपटांत रोमॅण्टिक पात्रांसाठी ओळखले जाते. या अभिनेत्री आपल्याला बहुतेक वेळेस काळजी करणाऱ्या, रोमॅण्टिक पात्र साकारताना दिसतात म्हणूनच त्या वर्षानुवर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. प्रत्येक कलाकाराला आपण पडद्यावर काहीतरी नेहमीपेक्षा वेगळे साकारावे अशी इच्छा असते. यातील काही अभिनेत्री चित्रपटांमध्ये खतरनाक खलनायिक आणि सीरियल किलरच्या भूमिकेतही दिसल्या आहेत. विशेष म्हणजे त्या अभिनेत्रींनी त्या भूमिकासुद्धा उत्तम साकारल्या आहेत. तसेच या अभिनेत्रींनी अभिनयाच्या बाबतीत त्या मोठ्या कलाकारांशीही स्पर्धा करू शकतात हे सिद्ध केले. चला जाणून घेऊया बॉलिवूडच्या अशाच सुंदर अभिनेत्रींबद्दल, ज्यांनी चित्रपटांमध्ये खतरनाक खलनायिकेच्या भूमिकाही साकारल्या आहेत.

प्रियंका चोप्रा

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने हॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. प्रियांका चोप्रा अनेकदा आपल्याला चित्रपटांमध्ये रोमॅण्टिक अंदाजात दिसली आहे. पण तिची खलनायिकेची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली होती. प्रियंका चोप्राने 2004 मध्ये आलेल्या ‘ऐतराज’ चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अक्षय कुमार आणि करीना कपूर खान मुख्य भूमिकेत दिसले होते.

कतरीना कैफ

फिल्म इंडस्ट्रीमधील बार्बी डॉल म्हणून ओळखली जाणारी कतरिना कैफ आपल्या निरागसतेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्यामुळे कतरिनाला खलनायकाच्या भूमिकेत पाहण्याचा कोणी विचारही कसा करू शकत नाही. पण कतरिनाने पडद्यावर एक फसव्या खलनायिकेची भूमिकाही साकारली आहे. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेस’ या चित्रपटात कतरिना कैफने नकारात्मक भूमिका साकारली होती. तिच्या त्या भूमिकेला खूप पसंतीही मिळाली होती.

करीना कपूर खान

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान आपल्या बहुतेक चित्रपटांमध्ये रोमॅण्टिक नायिका म्हणून दिसली आहे, परंतु करीनाने आपल्यातली खलनायिकादेखील पडद्यावर दाखवली आहे. करीनाने 2004 मध्ये आलेल्या ‘फिदा’ चित्रपटात आणि 2012 साली आलेल्या ‘एजंट विनोद’ या चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारली होती, करीनाच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.

काजोल

चित्रपटांमध्ये खलनायिका साकारणाऱ्या अभिनेत्रींमध्ये काजोलच्या नावाचाही समावेश होतो. काजोलने ‘गुप्त’ चित्रपटात सीरियल किलर महिलेची भूमिका साकारून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. 1997 मध्ये आलेल्या या चित्रपटात काजोल व्यतिरिक्त बॉबी देओल आणि मनीषा कोईराला मुख्य भूमिकेत दिसले होते.

तब्बू

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू ही एक अष्टपैलू अभिनेत्री आहे, ती आपले पात्र अतिशय सुंदरपणे साकारते. तब्बूने ‘मकबूल’, ‘हैदर’ आणि ‘अंधाधुन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये खतरनाक खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत, ज्यासाठी तिला प्रेक्षकांकडून भरभरून दादही मिळाली आहे.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम