सलमान खान ते गौहर खानपर्यंतच्या कलाकारांनी सार्...

सलमान खान ते गौहर खानपर्यंतच्या कलाकारांनी सार्वजनिक ठिकाणी खाल्ला होता मार (From Salman Khan to Gauhar Khan, These Famous Stars have been Publicly Slapped)

बॉलिवूड सेलिब्रेटी आपल्या चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय असतात. चाहते आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी कोणत्याही थराला जातात. अनेकदा सेलिब्रेटींना चाहत्यांच्या गराड्यातून जावे लागते. तेव्हा त्यांना एक स्पर्श करण्यासाठी चाहते आसुसलेले असतात. पण काही वेळेस काही कलाकारांवर चाहते इतके नाराज असतात की, ते मागचा पुढचा विचार न करता सरळ त्या कलाकारांच्या श्रीमुखात भडकवतात. सलमान खानपासून ते गौहर खानपर्यंत अनेक कलाकारांनी असा कोणत्याना कोणत्या कारणामुळे मार खाल्ला आहे.

रणवीर सिंह

काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंह बॅंगलोरमध्ये आयोजित केलेल्या साउथ इंडियन इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्डमध्ये सहभागी झाला होता. तिथला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका चाहत्यांने त्याच्या उगीच जोरात कानाखाली मारली. त्यानंतर अभिनेता आपल्या गालांवर हात ठेवताना व्हिडिओत पाहायला मिळाला.

सलमान खान

2009 मध्ये बॉलिवूडचा दबंग सलमान खानसोबत एक घटना घडली होती. तेव्हा मोनिका नावाच्या मुलीने दिल्लीत सलमानला कानाखाली मारली होती. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका पार्टीदरम्यान सलमान खानने गोंधळ घालणाऱ्या एका मद्यधुंद महिलेला समजवण्याचा प्रयत्न केला असता, त्या महिलेने त्यालाच कानाखाली मारली होती.

गौहर खान

2014 मध्ये एका रिअॅलिटी शोदरम्यान गौहर खानला एका अज्ञात व्यक्तीने सर्वांसमोर कानाखाली मारली होती. मिळालेल्या माहितीनुसार, गौहर खानचे छोटे कपडे पाहून त्या व्यक्तीला राग आला, पण त्या व्यक्तीने नंतर खुलासा केला की हा गौहर खानचा पब्लिसिटी स्टंट होता. दबंग 3 मध्ये काम मिळावे यासाठी गौहरनेच त्या व्यक्तीला स्वत:ला मारण्यास सांगितले होते.

बिपाशा बसू

बॉलिवूडची बिल्लो राणी बिपाशा बसूलाही सार्वजनिक ठिकाणी कानाखाली मारण्यात आली आहे. 2001 मध्ये आलेल्या ‘अजनबी’ चित्रपटाच्या सेटवर करीना कपूर आणि बिपाशा बसू यांच्यात भांडण झाले होते. यादरम्यान करीनाला इतका राग आला की तिने सेटवर बिपाशा बसूला जोरदार कानाखाली मारली. तेव्हापासून या दोन्ही अभिनेत्रींमध्ये विस्तव गेलेला नाही.

अमृता राव

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अमृता रावलाही एकदा सर्वांसमोर कानाखाली मारण्यात आली होती. 2005 मध्ये ‘प्यारे मोहन’ चित्रपटाच्या सेटवर ईशा देओल आणि अमृता राव यांच्यात जोरदार भांडण झाले होते. त्यावेळी ईशाला इतका राग आला की तिने अमृताला कानाखाली मारली. ईशाच्या म्हणण्यानुसार, अमृता दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्यासमोर तिच्यासोबत गैरवर्तन करत होती, त्यामुळे तिला राग आला आणि तिने अमृताला मारले.

करण सिंह ग्रोवर

बिपाशा बसूचा पती करण सिंग ग्रोव्हरला त्याची माजी पत्नी जेनिफर विंगेटने सर्वांसमोर कानाखाली मारली होती. ही घटना ‘दिल मिल गए’ या टीव्ही शोदरम्यान घडली होती, या शोमध्ये करण आणि जेनिफर एकत्र दिसले होते. त्या दोघांनी खऱ्या आयुष्यातही लग्न केले होते, पण जेव्हा जेनिफरला समजले की करण लग्नानंतरही दुसऱ्या कोणाला डेट करत आहे, तेव्हा जेनिफरचा राग अनावर झाला आणि तिने सर्वांसमोर त्याला कानाखाली मारली.

मल्लिका शेरावत

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरावतने सुद्धा सार्वजनिक ठिकाणी मार खाल्ल्याची घटना समोर आली आहे. 2016 मध्ये मल्लिका शेरावत आपला प्रियकर सिरिल ऑक्सेनफॅन्ससोबत पॅरिसमधील अपार्टमेंटमध्ये होती. तेव्हा तीन अज्ञात लोक तोंडावर मास्क लावून आले आणि त्यांनी अभिनेत्रीवर हल्ला करत तिला मारहाण केली होती.

आदित्य नारायण

गायक आणि सूत्रसंचालक आदित्य नारायणलाही सर्वांसमोर मारण्यात आले होते. 2011मध्ये आदित्य आपली गर्लफ्रेंड श्वेता आणि मित्रांसह एका पबमध्ये गेला होता. तेव्हा एका मुलीने त्याच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप करत त्याला मारले होते.