आपल्या चॅरिटीमार्फत बॉलिवूड कलाकार लावतात समाजा...

आपल्या चॅरिटीमार्फत बॉलिवूड कलाकार लावतात समाजाला मदतीचा हातभार (From Salman Khan To Alia Bhatt, These 8 Bollywood Celebs Help The Society In This Way)

बॉलिवूडच्या अनेक स्टार्सची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. त्यांना चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळते. चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकांसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील जाणून घेण्यात लोकांना रस असतो. कलाकार चित्रपट, जाहिरांतीमधून बक्कळ पैसे कमावतात. पण सोबतच ते चॅरिटीच्या माध्यमातून लोकांना खूप मदत सुद्धा करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलिवूड कलाकारांबद्दल सांगणार आहोत. जे समाजाच्या मदतीसाठी हातभार लावतात.

सलमान खान

 चॅरिटीच्या बाबतीत सलमान खानचे नाव नेहमीच पुढे असते. तो नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे दानधर्म करतो. सलमान खानच्या फाउंडेशनचे नाव ‘बीइंग ह्युमन’ आहे. या फाउंडेशनची सुरुवात 2007 साली झाली. हे फाउंडेशन आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्रात लोकांना मदत करते. या फाउंडेशनच्या माध्यमातून सलमान खानने अनेकांना मदत केली आहे.

शाहरुख खान

 बॉलिवूडमध्ये किंग खान म्हणून प्रसिद्ध असलेला शाहरुख खान दानधर्माच्या बाबतीतही कुणापेक्षा कमी नाही. ‘मीर फाउंडेशन’ असे त्याच्या एनजीओचे नाव आहे. शाहरुखने आपले वडील मीर ताज मोहम्मद यांच्या नावावरून हे नाव ठेवले आहे. शाहरुख खानचे हे फाउंडेशन अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्यांची मदत करते.

आमिर खान आणि किरण राव

 आमिर आपली माजी पत्नी किरण रावसोबत ‘पानी’ फाउंडेशन चालवतो. या फाउंडेशनची सुरुवात त्यांनी 2016 मध्ये केली होती. यामार्फत तो दुष्काळग्रस्त भागातील लोकांना मदत करतो. याशिवाय तो या फाउंडेशनमार्फत ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या सुद्धा सोडवतो.

सुष्मिता सेन

 बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन हिने 2009 मध्ये ‘आय अॅम फाउंडेशन’ची स्थापना केली होती. याद्वारे सुष्मिता समाजातील लोकांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्याचे काम करते.

दीपिका पदुकोण

 दीपिका पदुकोण एकेकाळी डिप्रेशनची शिकार झाली होती हे आपल्या माहीत आहे. या संदर्भात तिने अनेकदा मीडियासमोर सांगितले होते. त्यामुळेच ती मानसिक आरोग्याबद्दल खूप जागरूक असते व लोकांना सुद्धा जागरूक करते. दीपिकाच्या NGO चे नाव ‘Live Love Laugh’आहे. त्याची सुरुवात तिने 2015 मध्ये केली. या फाउंडेशनच्या मार्फत ती मानसिक आरोग्याच्या मुद्द्यांवर बोलते.

आलिया भट्ट

अभिनेत्री आलिया भट्ट एक सोशल वेलफेयर प्रोग्राम ‘कोगिस्ट’शी जोडलेली आहे. हे वेलफेअर प्राणी आणि पर्यावरणासाठी कार्य करते. आलियाला याबद्दल बोलताना तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.

शबाना आझमी

 बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी या ‘मिझवान’ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा आहेत. त्याची सुरुवात त्यांचे वडील कैफी आझमी यांनी केली होती. याद्वारे शबाना आझमी गावातील लोकांना सक्षम करण्याचे काम करतात. मिजवां गावाला पाठिंबा देण्यासाठी, शबाना आझमी दरवर्षी फॅशन शो आयोजित करतात, ज्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीही सहभागी होतात.

अनुपम खेर

 बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांच्या फाउंडेशनचे नाव ‘द अनुपम खेर फाउंडेशन’ आहे. 2008 मध्ये त्यांनी या फाउंडेशनची सुरुवात केली होती. या फाउंडेशनच्या मदतीने अनुपम खेर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत करतात.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम