रणवीर सिंह पासून तापसी पन्नू या कलाकारांनी बॉलि...

रणवीर सिंह पासून तापसी पन्नू या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये चमकण्यासाठी नोकऱ्या सोडल्या (From Ranveer Singh to Taapsee Pannu, These Celebrities Left Their Jobs to Make Career in Bollywood)

तोंडाला एकदा रंग लागला की, तो काही केल्या उतरत नाही – हे वाक्य मराठी रंगभूमीवरील नटांनी अनेकदा उच्चारून झालं आहे. कारण नाटक, अभिनय यांचे आकर्षण इतके जबरदस्त असते की, त्यासाठी घरादाराची पर्वा न केलेले असंख्य कलावंत मिळतील. त्याचप्रमाणे प्राध्यापक, डॉक्टर अथवा आर्किटेक्ट यासारख्या मंडळींनी आपला मूळ धंदा अभिनय क्षेत्रात येण्यासाठी सोडल्याची इथे अनेक उदाहरणे आहेत. बॉलिवूडचा देखील तोच इतिहास आहे. अगदी सुनील दत्त पासून अमरीश पुरी यांच्यापर्यंत, बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी आपल्या चांगल्या नोकऱ्या सोडल्या आहेत.

रणवीर सिंह

रणवीर सिंह आज आघाडीचा अभिनेता झाला असला तरी हे लक्ष्य गाठण्यासाठी त्याला चांगलेच कष्ट पडले आहेत. रणवीर हा सोनम कपूरचा मावस भाऊ आहे. त्याने अमेरिकेत क्रिएटिव्ह रायटिंगचे शिक्षण घेतले. भारतात आल्यावर त्याने एका जाहिरात कंपनीत नोकरी धरली. काही जाहिरातींसाठी त्याने कॉपीरायटर म्हणून काम केले. पण त्यात मन रमलं नाही. म्हणून ती नोकरी सोडली व बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘बँड बाजा बारात’ मध्ये त्याला नायकाची भूमिका मिळाली. अन्‌ आज तो आघाडीवर आहे.

तापसी पन्नू

तापसीने नवी दिल्ली येथून सायन्स इंजिनियरिंग ही पदवी घेतली. त्यानंतर तिने सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी धरली. पण त्यात फार काळ ती रमली नाही. कारण तिनं एका रिॲलिटी शो मध्ये भाग घेतला. अन्‌ ग्लॅमर इंडस्ट्रीचे दालन तिच्यासाठी खुले झाले. ‘चश्मे बद्दूर’ या चित्रपटापासून तापसीची कारकीर्द सुरू झाली, अन्‌ आज ती आघाडीची अभिनेत्री बनली आहे.

विकी कौशल

विकी कौशल हा तसा कुशल तंत्रज्ञ आहे. त्याने २००९ साली इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंगची डिग्री घेतली. त्यानंतर त्याला नोकरीच्या बऱ्याच संधी चालून आल्या. पण ॲक्टिंगचा किडा चावला असल्याने त्याने या संधी धुडकावून दिल्या. विकीने ‘मसान’ या चित्रपटातून पदार्पण केले. प्रेक्षकांना तो आवडला. तिथपासून तो एकेक करत यशस्वी चित्रपट देऊन लोकप्रिय कलाकार झाला.

जॉन अब्राहम

तुम्हाला माहीत नसेल, पण आधी जॉन अब्राहम पण नोकरी करत होता. कारण त्याने मुंबईच्या एका प्रतिष्ठीत कॉलेजातून इकॉनॉमिक्स घेऊन पदवी घेतली होती. पुढे त्याने मुंबई एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेतून मास्टर्स इन मॅनेजमेन्ट सायन्स केले. अन्‌ एका जाहिरात कंपनीत मिडिया प्लॅनर म्हणून जॉब केला. नोकरी करत असतानाच तो मॉडेलिंग क्षेत्रात आला. अन्‌ २००३ साली  ‘जिस्म’ या चित्रपटात त्याला नायकाची भूमिका मिळाली. म्हणून त्याने आपला जॉब सोडला नि बॉलिवूडमध्ये स्थिरावला.

आयुषमान खुराना

सिनेसृष्टीत येण्यापूर्वी आयुषमान खुरानाने रेडिओ जॉकी, व्हीजे, टी.व्ही. सुत्रधार म्हणून कामे केली. पण त्याला रुपेरी पडद्यावर अभिनेता म्हणून कारकीर्द गाजवायची होती. म्हणून त्याने हे सगळे जॉब सोडले. ‘विक्की डोनर’ या चित्रपटातून आयुषमानला तशी संधी मिळाली. अन्‌ आज बॉलिवूडमध्ये त्याने नाव कमावले.

या फिल्म इंडस्ट्रीत स्थिरावण्यासाठी वरील काही कलावंतांनी आपली नोकरी पणास लावली. त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला आणि मनापासून कष्ट करून यश मिळविले. आपली स्वप्ने साकार केली.