निशा रावल ते श्वेता तिवारी या टी. व्ही. कलावतीं...

निशा रावल ते श्वेता तिवारी या टी. व्ही. कलावतींनी आपल्या जोडीदारांवर लावलेले हिंसाचाराचे आरोप (From Nisha Rawal to Shweta Tiwari : These TV Actresses Accused Their Partner of Domestic Violence)

बॉलिवूडपेक्षा टेलिव्हिजन वर काम करणारे कलाकार जास्त लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे या कलाकारांचे ग्लॅमर, प्रेमप्रकरणे, लग्न आणि घटस्फोट ही प्रकरणे जास्त चर्चिली जातात. कारण दर्शकांना त्यांच्या खासगी जीवनाबद्दल औत्सुक्य असते. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील करण मेहरा व त्याची बायको निशा रावल ही जोडी सध्या जास्तच चर्चेत आली आहे. कारण निशा रावलने करण मेहरावर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला आहे. हे प्रकरण इतकं टोकाला गेलं आहे की, मुंबई पोलिसांनी करणला अटक केली आहे. निशा रावलच्या आधी श्वेता तिवारी व अन्य काही टी. व्ही. कलावतींनी आपल्या पतीच्या कुकर्माचे पाढे वाचले आहेत.

निशा रावल

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

निशा रावल आणि करण मेहरा यांच्या लग्नाला आता जवळपास एक दशक झालं आहे. इतक्या वर्षांनी त्यांच्या वैवाहिक जीवनात वादळ आलं आहे. नवऱ्याने आपल्याला भयंकर मारझोड केली असल्याची तक्रार निशाने पोलिसात केली. त्यावरून पोलिसांनी करणला अटक केली. दुसऱ्याच दिवशी त्याला जामीनावर सोडण्यात आलं. मोकळा झाल्यावर करणने निशाने केलेल्या आरोपांचा इन्कार केला, आता दोघे घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहेत.

श्वेता तिवारी

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

राजा चौधरीशी लग्न केल्यावर, श्वेता तिवारी शारीरिक व घरगुती हिंसाचाराला बळी पडली होती. परिणामी तिने घटस्फोट घेतला. दोघांना एक मुलगी आहे. तिचं नाव पलक तिवारी. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यावर श्वेताने अभिनव कोहलीशी दुसरं लग्न केलं. पण दुर्दैवाने तिचं हे दुसरं लग्न पण टिकलं नाही. श्वेताने अभिनव वर मानसिक अत्याचार व मारहाणीचे आरोप लावले. या दोघांना एक मुलगा झाला आहे. आता श्वेता अभिनव वेगळे झाले आहेत.

रश्मी देसाई

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

रश्मी देसाईने ‘उतरण’ या मालिकेतील आपला सहकलाकार नंदिश संधू याच्याशी लग्न केलं. पण हे संबंध जास्त दिवस टिकले नाहीत. म्हणून रश्मीने घटस्फोटासाठी अर्ज केला. नंदिश संधू बरोबर आपले संबंध अपमानजनक असल्याचा खुलासा रश्मीने एका मुलाखतीत केला होता. तिच्या म्हणण्यानुसार तिचं नंदिशवर खूप प्रेम होतं आणि त्याच्याबरोबर ती सुखाचा संसार करू इच्छित होती. पण त्यात मिठाचा खडा पडला आणि दोघांनी घटस्फोट घेतला.

दलजीत कौर

‘बिग बॉस १३’ ची स्पर्धक दलजीत कौरने आपला नवरा शालिन भानोतला लग्नानंतर ६ वर्षांनी घटस्फोट दिला. नवरा ६ वर्षे आपल्यावर मानसिक अत्याचार आणि घरगुती हिंसाचार करत असल्याचा आरोप दलजीतने केला. इतकंच नव्हे तर त्याने हुंडा मिळविण्यासाठी आपली हत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप लावून शालिनची तक्रार केली होती. दोघांना एक मुलगा आहे. तो दलजीतकडे राहतो.

वाहबिज दोराबजी

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

वाहबिज दोराबजीने व्हिवियन डीसेना याच्याशी लग्न केलं. मात्र लग्नानंतर ३ वर्षांनी त्यांच्या संबंधास तडे गेले. वाहबिजने व्हिवियन वर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले. त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. नंतर तिने व्हिवियनकडे पोटगीची मागणी केली. तेव्हा लोकांनी तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले होते.

मंदना करीमी

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

मंदना करीमीने, गौरव गुप्ता सोबत लग्न केलं. पण ते लवकरच संपुष्टात आलं. परदेशात मॉडेल असलेली मंदना अभिनय क्षेत्रात नाव कमावण्यासाठी भारतात आली होती. तेव्हा २०१६ साली तिची गौरवशी भेट झाली. २०१७ मध्ये दोघांनी लग्न केलं. पण गौरवने करिअर सोडण्यासाठी आपल्यावर दबाव आणला व सासरी जाऊ दिले नाही, असा त्याच्यावर आरोप लावला. तसेच सासरच्या मंडळींनी आपला खूप अपमान केला, असाही तिनं आरोप केला.