मुनमुन दत्ता ते कविता कौशिक : या टी.व्ही. तारका...

मुनमुन दत्ता ते कविता कौशिक : या टी.व्ही. तारकांचे झाले होते लैंगिक शोषण (From Munmun Dutta To Kavita Kaushik These TV celebs Disclose Shocking Confessions About Their Sexual Abuse)

सामान्य मुलींप्रमाणे टेलिव्हिजनवरील कलाकारांनाही कोणत्या ना कोणत्या कारणाने कधी ना कधी लैंगिक शोषणास बळी पडावे लागले आहे. अन्‌ याबाबत त्यांनी सोशल मीडियावर, कधी मुलाखतीदरम्यान तर कधी बिग बॉस हाऊसमध्ये मोकळेपणाने सांगितले आहे. पाहुया या टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी कोण आहेत?

मुनमुन दत्ता

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील बबिताजी उर्फ मुनमुन दत्ता याबाबत खुलेपणाने बोलली आहे. आजही त्या गोष्टीच्या आठवणीने तिच्या डोळ्यात पाणी येते, असे ती म्हणते. तिला एकदा नाही तर अनेकदा वाईट पद्धतीने स्पर्श करून तिचे लैंगिक शोषण केले गेले असल्याचे मुनमुन दत्ताने सांगितले. लहान असताना तिला तिच्या शेजाऱ्याच्या काकांच्या डोळ्यांची खूप भीती वाटायची. ते माझ्याकडे बघायचे आणि हे कोणालाही सांगायचे नाही, अशी धमकी द्यायचे, असे मुनमुन दत्ताने सांगितले. तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या चुलत भावांनीही तिच्याकडे वाईट नजरेने पाहिल्याचे ती म्हणाली. एवढेच नाही तर ज्या व्यक्तीने मला हॉस्पिटलमध्ये जन्मलेले पाहिले त्या व्यक्तीलाही, १३ वर्षानंतर मी वयात येत असताना तो माझ्या शरीराच्या अवयवांना स्पर्श करू शकतो असे वाटले होते, असे तिने सांगितले. पुढे शिकवणीच्या शिक्षकांकडूनही मुनमुन दत्ताला अतिशय वाईट अनुभव आले. परंतु, त्यावेळेस वय लहान असल्याने कोणाकडे तक्रार करता येत नव्हती अन्‌ सर्व सहन करण्यापलीकडे काही पर्याय नव्हता, असे ती म्हणाली.

कविता कौशिक

कविता कौशिकने बिग बॉसच्या घरात तिला सहन कराव्या लागलेल्या लैंगिक शोषणाबाबत खुलासा केला होता आणि इम्युनिटी टास्क दरम्यान सांगितले होते की ती ११ वर्षांची असताना तिच्या गणिताच्या शिक्षकाने तिचा विनयभंग केला होता. कविताने सांगितले की, एकदा तिचे पालक बाहेर गेले होते आणि तिला शिकवणी देण्यासाठी सर घरी आले होते. सर कविताशी घाणेरडे बोलायचे आणि तिचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न करायचे. कविताने त्याबद्दल पालकांना सांगेन असे सांगितल्यावर, तुझ्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, असे त्याने तिला सांगितले. आणि खरोखरच कविताच्या पालकांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही, उलट तिला गणिताचा अभ्यास करायचा नाही म्हणून ती कारणं सांगत आहे असे त्यांना वाटले. परंतु या सगळ्यामुळे कविता इतकी ट्रॉमामध्ये राहू लागली की तिचे गणितातील गुण कमी होऊ लागले.

नीना गुप्ता

‘सच कहून तो’ या आत्मचरित्रात, नीना गुप्ता यांनी बालपणी डॉक्टर आणि टेलर यांनी तिचे लैंगिक शोषण कसे केले याबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे. तिने सांगितले की, जेव्हा ती तिच्या भावासोबत डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेली तेव्हा डॉक्टरांनी तिच्या भावाला बाहेर बसवले आणि डोळ्याव्यतिरिक्त शरीराच्या इतर अवयवांना स्पर्श करण्यास सुरुवात केली. नीना गुप्ता या गोष्टीने खूप घाबरली होती, पण आई यावर विश्वास ठेवणार नाही, असा विचार करून तिने या घटनेचा उल्लेख केला नाही. याशिवाय तिच्या टेलरने माप घेण्याच्या बहाण्याने तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता, या घटनेचाही तिने उल्लेख केला आहे.

आरती सिंह

आरती सिंहने देखील बिग बॉसच्या घरात तिला आलेल्या वाईट अनुभवाचा खुलासा केला होता. एकदा घरात कोणी नसताना त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला, परंतु त्याने घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद केले होते. अखेरीस स्वतःला वाचवण्यासाठी आरती सिंहला दुसऱ्या मजल्यावरून उडी मारावी लागली होती, असे तिने सांगितले. आरती म्हणते की, त्या दिवसापासून तिला पॅनीक अटॅक येऊ लागले आहेत. आरती सिंहचा हा खुलासा तिचा भाऊ कृष्णा अभिषेकसाठीही धक्कादायक होता.

मधुरिमा तुली

मधुरिमा तुलीही बिग बॉसमध्ये बोलली होती की, तिच्या शिक्षकाने ती लहान असताना तिचा विनयभंग केला होता. मधुरिमाने सांगितले की, ट्यूटरने तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तो शिक्षक मधुरिमाच्या भावाला मुद्दाम चहा-पाणी आणण्याच्या बहाण्याने खोलीबाहेर पाठवत असे, जेणेकरून तो एकटेपणाचा फायदा घेऊन घाणेरडे कृत्य करू शकेल. मात्र, मधुरिमाने त्याच्याबद्दल तिच्या पालकांना सांगितले आणि तिच्या आईवडिलांनी तिला पाठिंबा दिला.

श्रेनु पारिख

टी.व्ही. शो ‘इस प्यार को क्या नाम दूं’, ‘एक बार फिर’ फेम श्रेणू पारीख हिचाही अनुभव धक्कादायक आहे. श्रेणूने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून तिला वयाच्या ६ व्या वर्षी विनयभंगास सामोरे जावे लागले असल्याचे सांगितले होते. तिने लिहिले होते की, लहानपणी सुट्टीमध्ये ती तिझ्या आजोबांच्या घरी शहरात जात असे. त्यावेळेस ते लोकल बसने प्रवास करायचे आणि सीट रिकामी नसली की आजोबा कोणाला तरी विनंती करून तिला मांडीवर बसवायला सांगायचे. असेच एकदा प्रवास करताना श्रेणू एका प्रवाशाच्या मांडीवर बसली होती. त्या माणसाने संपूर्ण प्रवासात तिला घाणेरड्या पद्धतीने स्पर्श करून हैराण केले. त्यावेळेस काय करावे तिला समजत नव्हते. त्यावेळेस तोंड उघडता आले असते तर ६ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याबद्दल त्याला नक्कीच शिक्षा झाली, असे तिने सांगितले.

एजाज खान

प्रत्येक वेळी मुलींनाच लैंगिक शोषणास बळी पडावे लागते असे नाही तर एजाज खान या कलाकाराने देखील बिग बॉस हाऊसमध्ये इम्युनिटी टास्क दरम्यान जेव्हा स्पर्धकांना आपल्या जीवनातील वाईट प्रसंगाबद्दल बोलण्यास संधी देतात, त्यावेळेस आपल्याला सहन कराव्या लागलेल्या वाईट अनुभवाबद्दल खुलासा केला होता. लहान वयातच त्याचा विनयभंग झाला असल्याचे त्याने सांगितले. तेव्हापासून त्याला कोणाच्याही स्पर्शाची भीती वाटते, असे तो म्हणतो. त्यावेळेस घडलेल्या त्या घटनेसाठी तो स्वतःला दोष देत नाही, कारण त्यात त्याची चूकी नव्हती. परंतु त्याने ही गोष्ट आपल्या वडिलांपासून लपवल्याबद्दल त्यांची माफी मागितली होती.