दाढी मिशांवरुन खिल्ली उडवणं ते थप्पड आणि ड्रग्ज...

दाढी मिशांवरुन खिल्ली उडवणं ते थप्पड आणि ड्रग्ज प्रकरण… भारती सिंहला या आधीही पडले आहे महागात (From Mocking beard-moustache To getting slapped and being named in drugs case, here are the controversies related to Bharti Singh)

आपल्या विनोदबुद्धीने सर्वांचे मनोरंजन करणारी टेलिव्हिजनची लोकप्रिय कॉमेडी क्वीन भारती सिंग सध्या तिच्या एका विनोदामुळे अडचणीत सापडली आहे. लोकांच्या दाढी- मिशांवर  विनोद करणे तिला इतके महागात पडले आहे की ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हे प्रकरण वाढत असल्याचे पाहून भारतीने शीख समुदायाचीही हात जोडून माफी मागितली आहे, तरी हे प्रकरण शमलेले दिसत नाही. मात्र भारती सिंग वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही तिच्यासोबत अनेक वाद निर्माण झाले आहेत. चला जाणून घेऊया.

ड्रग्ज प्रकरणामध्ये आलं नाव

गेल्या वर्षी जेव्हा भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांचे ड्रग्ज प्रकरणात नाव आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. या प्रकरणी एनसीबीने भारती सिंग आणि हर्ष यांना अटक केली होती. त्यावेळी भारती सिंगच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला होता, चौकशी दरम्यान खुद्द भारतीनेही याची कबुली दिली होती. त्यानंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र त्यांना जामीन मंजूर झाला.

सिद्धार्थ सागरसोबत थप्पड वाद

काही वर्षांपूर्वी भारती सिंग आणि कॉमेडियन सिद्धार्थ सागर यांच्यातील थप्पड वादानेही खूप हंगामा केला होता. रिपोर्ट्सनुसार, एका शूट दरम्यान सिद्धार्थने चुकून भारती सिंहला थप्पड मारली होती. वास्तविक, अभिनयादरम्यान, सिद्धार्थने भारतीला हळूवार थप्पड मारायची होती, परंतु सिद्धार्थने भारतीला जोरदार थप्पड मारली होती. परफॉर्मन्स दरम्यान, भारतीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि शांतपणे अभिनय केला, परंतु नंतर तिने निर्मात्यांना सिद्धार्थबद्दल तक्रार केली, ज्यामुळे सिद्धार्थला शोमधून बाहेर करण्यात आले.

धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

२०१९ मध्ये फराह, भारती सिंग आणि रवीना टंडन यांनी फराह खानच्या ‘बॅक बेंचर’ या शोमध्ये भाग घेतला होता. या दरम्यान दोघांनी बायबलमधील हालेलुईया या शब्दाची खिल्ली उडवली, जी त्यांना खूप महागात पडली होती. हा भाग ऑनलाइन स्ट्रीम केल्यानंतर, फराह खान, रवीना टंडन आणि भारती सिंग यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला. वाद वाढल्यानंतर रवीना आणि फराहने माफीही मागितली होती.

नवीन वाद?

अलिकडेच एका टीव्ही शो दरम्यान भारतीने दाढी आणि मिशांवर विनोद केला होता. या टीव्ही शोमध्ये अभिनेत्री जास्मिन भसीन पाहुणी म्हणून दिसली होती. जस्मिनसोबत मस्ती करताना भारती दाढी-मिशी का नको, दूध प्यायल्यावर दाढी तोंडात घातली की शेवयाची टेस्ट येते, असे म्हणताना दिसली. एवढेच नाही तर  माझे अनेक मित्र ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे, ते दिवसभर दाढी-मिशांतील उवा काढण्यात व्यस्त असतात, असेही तिने म्हटले. तिच्या या वक्तव्यावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. वाद चिघळत असल्याचे लक्षात येताच भारती सिंहने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करून माफी मागितली असली तरी हे प्रकरण शांत होण्याचे नाव घेत नाही आहे.