2022 मध्ये या बॉलिवूड कलाकारांच्या घरी हलला पाळ...

2022 मध्ये या बॉलिवूड कलाकारांच्या घरी हलला पाळणा (From Alia-Ranbir to Sonam-Anand, These Bollywood Couples Became Parents in Year 2022)

 2022 हे वर्ष अनेक सेलिब्रिटी जोडप्यांसाठी खूप खास ठरले आहे. यावर्षी बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले, तर काही सेलिब्रिटींच्या घरात पाळणा हलला. बॉलिवूडपासून टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत अनेक जोडपी यावर्षी पालक बनले आहेत.

सोनम कपूर आणि आनंद आहुजा

बी-टाऊनमधील सर्वात रोमँटिक जोडप्यांपैकी एक असलेल्या सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्यासाठी हे वर्ष खूप खास ठरले आहे. याच वर्षी सोनम कपूरने मुलगा वायु कपूरला जन्म दिला. सोनम आपल्या गरोदरपणात खूप चर्चेत होती. तिच्या मुलाच्या जन्मानंतरही ती प्रसिद्धीच्या झोतात राहिली.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट

खूप वर्षे एकमेकांना डेटिंग केल्यानंतर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी एप्रिल 2022 मध्ये लग्न केले आणि याच वर्षी ते पालकही झाले आहेत. आलिया आणि रणबीरचे एप्रिल महिन्यात लग्न झाले आणि या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या जोडप्याने त्यांची मुलगी राहाचे या जगात स्वागत केले. लग्नानंतर दोन महिन्यांनी जूनमध्ये आलियाने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती.

प्रियांका चोप्रा-निक जोन्स

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपली ओळख निर्माण करणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा लग्नानंतर आपला पती निक जोनाससोबत यूएसमध्ये राहत आहे. प्रियांका आणि निक 2022 च्या सुरुवातीला आई-बाबा झाले आहेत. या जोडप्याने सरोगसीद्वारे मुलगी मालती मेरीला जन्म दिला आहे. प्रियांका अनेकदा आपल्या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

बिपाशा बसू-करण सिंग ग्रोव्हर

लग्नाच्या जवळपास सहा वर्षानंतर बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आई झाली आहे. बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हरने यावर्षी आपल्या मुलीचे या जगात स्वागत केले आहे. बिपाशाने सोशल मीडियावर बेबी बंपचा फोटो शेअर करून प्रेग्नंसीची घोषणा केली होती. या दाम्पत्याने मुलीचे नाव देवी ठेवले आहे.

नयनतारा आणि विघ्नेश शिवन

साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन यांच्यासाठी 2022 हे वर्ष लकी ठरले आहे. या वर्षी 9 जून रोजी दोघांचे लग्न झाले आणि लग्नानंतर काही महिन्यांतच सरोगसीद्वारे हे जोडपे जुळ्या मुलांचे आई-बाबा झाले. सरोगसीद्वारे मुले जन्माला घालण्यावरून हे जोडपे वादातही सापडले होते.

भारती सिंग-हर्ष लिंबाचिया

टीव्हीवरील कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया हे ड्रग्ज प्रकरणात अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत, या वर्षी या जोडप्याच्या घरही पाळणा हलला. त्यांनी यावर्षी एप्रिलमध्ये एका मुलाला जन्म दिला, त्याचे नाव त्यांनी लक्ष ठेवले, परंतु भारती त्याला प्रेमाने गोला म्हणते.

देबीना बनर्जी-गुरमीत चौधरी

लग्नाच्या जवळपास 11 वर्षानंतर टीव्हीचे सियाराम देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यावर्षी आई-वडील झाले आहेत. या वर्षी 3 एप्रिल रोजी त्यांनी पहिल्या मुलीला जन्म दिला, तर याच वर्षी पहिल्या मुलीच्या जन्मानंतर सात महिन्यांनी 11 नोव्हेंबरला देबिना दुसऱ्यांदा आणखी एका मुलीची आई झाली. हे जोडपे एका वर्षात दोन मुलींचे पालक झाले आहेत.