आलिया भट्ट – रणबीर कपूर यांच्यासह बॉलिवूड...

आलिया भट्ट – रणबीर कपूर यांच्यासह बॉलिवूडच्या कलाकारांनी केला अवयव दानाचा संकल्प (From Alia Bhatt to Ranbir Kapoor, These Famous Celebrities of Bollywood Have Taken The Pledge of Organ Donation)

आपल्या मृत्यूपश्चात अवयव दान करण्यासारखं मोठं दान कुठलंही नाही, असं म्हटलं जातं. म्हणूनच त्याला महादान म्हटलं जातं. अलिकडेच एका कार्यक्रमात बॉलिवूडची चुलबुली आणि सुंदर अभिनेत्री आलिया भट्टने आपले अवयव दान करण्याचा संकल्प केला. ऐन तरुण वयात आलियाने आपली इच्छा जाहीर केली की, मृत्यूनंतर आपले अवयव दान केले जावेत. जेणेकरून कुणा गरजवंतास नवजीवन मिळेल.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

त्याचं असं झालं की, ऐश्वर्या रायने आपले सुंदर डोळे मृत्यूनंतर दान करण्याचा संकल्प जाहीर केला होता. त्यावरून आलियाला देखील ही अवयव दानाची प्रेरणा मिळाली. आलियाच्या आधी बॉलिवूडच्या काही मान्यवर कलाकारांनी आपल्या अवयवांचे महादान करण्याचा संकल्प सोडलेला आहे. त्यांनी अशी इच्छा जाहीर केली आहे की, आपल्या मृत्यूनंतर आपले अवयव कुण्या गरजवंताला देण्यात यावे.

रणबीर कपूर

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

आलियाच्या पावलावर पाऊल टाकत रणबीर कपूरनेही संपूर्ण देहदान करण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प त्याने दुसऱ्यांदा केला आहे. गेल्या वर्षी नॅशनल ऑर्गन डे च्या निमित्ताने त्याने देहदानाची शपथ घेतली होती. त्यावेळी तो असंही म्हणाला होती की, माझ्या या कृतीने एक-दोन व्यक्तींना नवजीवन मिळेल. तेव्हा कृपा करून आपणही अवयव दानाचा विचार करा.

ऐश्वर्या राय-बच्चन

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

पूर्वाश्रमीची विश्वसुंदरी आणि बॉलिवूडची सौंदर्यसंपन्न अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या सौंदर्याची सगळे जण तारीफ करतात. विशेषतः तिच्या डोळ्यांवर तर सगळेच फिदा आहेत. पण हे सुंदर डोळे, आपल्या मृत्यूनंतर दान करण्यात यावे, असा संकल्प तिने काही वर्षांपूर्वी सोडला आहे. अन्‌ आपल्या मनाचं ऐश्वर्य प्रकट केलं आहे.

सलमान खान

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

वृत्तीने रोमॅन्टिक असला तरी सलमान खान तितकाच दरियादिल आहे. त्यामुळे गरजवंतांच्या मदतीला तो नेहमीच पुढे असतो. त्यानुसार त्याने आपले अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे. आपल्या शरीरातील आवश्यक ते सर्व अवयव दान करण्याची शपथ घेतली आहे. चाहत्यांना हेही माहीत असेल की, त्याने याआधी आपला बोन मॅरो देखील दान करण्याचा संकल्प केलेला आहे. हाडांच्या पोकळीत हा द्रव रक्तापासून तयार होतो.

राणी मुखर्जी

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर राणी मुखर्जीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिनेही आपल्या मृत्यनंतर डोळ्यांचे दान करण्याचा संकल्प सोडला आहे. एखादी अंध व्यक्ती आपल्या डोळ्यांनी हे जग बघू शकेल, अशी तिची भावना आहे. कुणाला तरी नवजीवन देणं, ही खूप चांगली अनुभूती असल्याचं तिनं म्हटलं आहे. राणीचा पती आदित्य चोप्रा याने देखील आपले डोळे दान करण्याचा संकल्प सोडला आहे.

प्रियंका चोप्रा

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

बॉलिवूड ते हॉलिवूड चित्रपटसृष्टी गाजवणारी प्रियंका चोप्रा हिने देखील आपले देहदान केले जावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. तिचे वडील अशोक चोप्रा हे कॅन्सरने आजारी होते. तेव्हा त्यांना अशाच एका ऑर्गनची गरज पडली होती. तेव्हाच प्रियंकाच्या मनाने पक्कं घेतलं होतं की, देहदान करून कुणा गरजवंताला नवीन जीवन दिलं पाहिजे. म्हणूनच वडिलांच्या मृत्यूनंतर प्रियंकाने आपल्या देहदानाची इच्छा व्यक्त केली आहे.

अमिताभ बच्चन

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

या महादानाच्या बाबतीत महानायक अमिताभ बच्चन मागे राहिलेला नाही. ऐश्वर्या राय प्रमाणेच, मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांचे दान करण्यात यावे, असा संकल्प त्याने सोडला आहे. अमिताभसह त्याची पत्नी व दिग्गज अभिनेत्री जया बच्चनने देखील मृत्यूनंतर आपले डोळे एखाद्या गरजवंताला देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आमीर खान व किरण राव

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अष्टपैलू अभिनेता आमीर खानने, मृत्यूपश्चात किडनी, लिव्हर, हृदय, डोळे, त्वचा आणि हाडे असे महत्त्वाचे अवयव दान करण्यात यावे, अशी घोषणा २०१४ सालीच केलेली आहे. त्याच्या आधी, म्हणजे २०१३ साली, त्याची पत्नी किरण रावने संपूर्ण देहदान करण्याची घोषणा केलेली आहे.

रितेश – जेनेलिया देशमुख

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

रितेश आणि जेनेलिया या कलाकार जोडीने देखील संपूर्ण देहदान करण्याची शपथ घेतली आहे. आपल्या मृत्यूनंतर कुण्या गरजवंतास जीवनदान देण्याची त्यांची मनीषा आहे.

याशिवाय निर्माता – दिग्दर्शक करण जोहर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी एका कार्यक्रमात आपली किडनी दान करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. याच कार्यक्रमात आलिया भट्टने आपला संकल्प केला होता.