बॉलिवूडमधील या दिग्गज कलाकारांना करावा लागला हो...

बॉलिवूडमधील या दिग्गज कलाकारांना करावा लागला होता वर्णभेदाचा सामना (From Ajay Devgan to Bipasha Basu, These Stars Have Become Victims of Apartheid in Bollywood)

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करणारे अभिनेते असो किंवा अभिनेत्री, प्रत्येकजण आपल्या लूक आणि फिटनेससाठी सतर्क असतात. ग्लॅमर इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांचे सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व असणं गरजेचं असं असे प्रत्येकाला वाटते. पण इंडस्ट्रीत आल्यानंतर अनेक सेलिब्रिटींना त्यांच्या रंगावरून लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. इंडस्ट्रीतील अनेक टॉपचे कलाकार सुरुवातीला वर्णद्वेषाला बळी ठरले होते, परंतु त्यांनी आपल्या दमदार कामगिरीने स्वत:ला सिद्ध केले.

मिथुन चक्रवर्ती

हिंदी चित्रपटसृष्टीतील डिस्को डान्सर म्हणून ओळखले जाणारे अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी अलीकडेच आपल्या रंगामुळे इंडस्ट्रीत अनेकदा अपमान सहन केल्याचा खुलासा केला आहे. ‘मृगया’ या पदार्पणाच्या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला, पण तरीही त्यानंतर त्यांचा इंडस्ट्रीतील संघर्ष कमी झाला नव्हता. त्यांच्या सावळ्या रंगामुळे त्यांना खूप टोमणे मारले जायचे.

अजय देवगण

आज जरी अजय देवगण बॉलिवूडमध्ये सुपरस्टार म्हणून ओळखला जात असला तरी जेव्हा त्याने इंडस्ट्रीमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती, तेव्हा त्याच्या रंगामुळे लोक त्याची खिल्ली उडवायचे. एकदा तर लोकांच्या टोमण्यांना कंटाळून त्याने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता, पण ‘फूल और कांटे’ या चित्रपटामुळे त्याच्याबद्दलची लोकांची मते बदलली.

बिपासा बसू

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री बिपाशा बसूलाही करीअरच्या सुरुवातीच्या काळात तिच्या गडद रंगामुळे खूप त्रास सहन करावा लागला होता. अभिनेत्रीने सांगितले होते की जेव्हा मी कोलकाता येथे पहिल्यांदा सुपरमॉडेल स्पर्धा जिंकली तेव्हा बातमीपत्रात कोलकाताची सावळी मुलगी विजेती ठरली असे छापून आले होते. अभिनेत्रीने असेही सांगितले होते की जेव्हा लोक मला जाडी आणि काळी म्हणून चिडवायचे तेव्हा मी खूप चिडायची, पण जेव्हा माझा पहिला चित्रपट ‘अजनबी’ आला तेव्हा लोकांनी मला त्यातल्या रंगासह स्विकारले.

प्रियांका चोप्रा

देसी गर्ल प्रियांका चोप्राने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिच्या कुटुंबातील सदस्यच तिला काळी म्हणून चिडवायचे. तसेच जेव्हा मी अमेरिकेत शिकत होती, तेव्हा तिथेही लोक मला माझ्या काळ्या रंगामुळे ब्राउनी म्हणत चिडवायचे. प्रियांका चोप्रा मिस वर्ल्ड बनल्यानंतरही तिला तिच्या सावळ्या रंगामुळे  वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. तिच्या रंगामुळे तिच्या हातून एक हॉलिवूड चित्रपटही गेल्याचे तिने सांगितले.

नवाजुद्दीन सिद्दीकी

बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीलाही अनेक वर्षे वर्णभेदाला सामोरे जावे लागले होते. आपल्या कमी उंचीमुळे आणि गडद रंगामुळे इंडस्ट्रीत आपल्याला बरीच वर्षे नाकारण्यात आल्याचे नवाजने एका मुलाखतीत सांगितले होते.

रेखा

हिंदी सिनेसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री रेखाने जेव्हा इंडस्ट्रीत पाऊल ठेवले तेव्हा तिलाही आपल्या सावळ्या रंगामुळे सुरुवातीला वर्णभेदाला सामोरे जावे लागले होते. आपल्या करीअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात रेखा सावळ्या वर्णाची होती मात्र नंतर तिने स्वत:चा मेकओव्हर करून सर्वांना आश्चर्यचकित केले.