माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बायोपि...

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकची घोषणा, पंकज त्रिपाठी साकारणार मुख्य भूमिका (Former Prime Minister Atal Bihari Vajpayee biopic announced, Pankaj Tripathi to play the lead role)

काल शुक्रवारी एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपटाचे शीर्षक आहे – ‘मैं रहूं या ना रहूं, यह देश रहना चाहिए- अटल’. हा सिनेमा ‘द अनटोल्ड वाजपेयी-पॉलिटिशियन अॅन्ड पॅराडॉक्स’ या पुस्तकावर आधारित असणार आहे.

शीर्षकानुसार, हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर एक बायोपिक असून त्यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) साकारणार आहेत. या चित्रपटाचे लेखन उत्कर्ष नैथानी यांनी केले आहे, तर तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावलेले रवी जाधव हे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांचा वैयक्तिक आणि राजकीय प्रवास दाखवण्यात येणार आहे.

अटलजी हे भारतीय राजकारणातील अशा नायकांपैकी एक आहेत, ज्यांनी देशाच्या राजकारणावर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकला. त्यांची बुद्धी आणि बोलण्याची शैली केवळ त्यांच्या मित्रांनाच नव्हे, तर त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांनाही पटली. कवी म्हणूनही त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. जनसंघाच्या स्थापनेपासून ते भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते होण्यापर्यंत आणि पंतप्रधान होण्यापर्यंतचा अटलजींचा प्रवास प्रेरणादायी आहे.

भारतीय राजकारणातील एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल पंकज त्रिपाठी स्वतःला भाग्यवान समजतात. पंकज म्हणाले- “अशा राजकारण्याची पडद्यावर भूमिका करणे ही सन्मानाची गोष्ट आहे. ते केवळ राजकारणी नव्हते तर त्याहूनही बरेच काही होते. महान लेखक आणि प्रसिद्ध कवी. त्यांना पडद्यावर सादर करणे माझे भाग्य आहे.”

रवी जाधव हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी नटरंग, बालगंधर्व या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. जाधव यांनी चित्रपटाविषयी सांगितले- “अटलजींसारखे व्यक्तिमत्त्व आणि पंकज यांच्यासारखे अभिनेते, या चित्रपटाचे दिग्दर्शन करणे ही सुवर्णसंधीपेक्षा कमी नाही.” दिग्दर्शक म्हणून अटलजींपेक्षा चांगल्या कथेची कल्पनाही करू शकत नाही. त्याहीपेक्षा पंकजसारखा अभिनेता मिळणे निर्मात्यांनाही चांगलेच ठरेल.”

अटलबिहारी वाजपेयी १९४७ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले आणि नंतर भाजपमध्ये शीर्षस्थानी पोहोचले. अटलजी हे पहिले पंतप्रधान होते जे काँग्रेसचे नव्हते आणि त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला. या चित्रपटाची निर्मिती विनोद भानुशाली, संदीप सिंग, सॅम खान आणि कमलेश भानुशाली करत आहेत. झीशान अहमद आणि शिव शर्मा सहनिर्माते आहेत. सिनेमाच्या मेकर्सनी याच्या रिलीजविषयी काहीच माहिती अद्याप दिलेली नाही. पण त्यांनी चाहत्यांना हे मात्र नक्कीच सांगितले की, पुढील वर्षी ख्रिसमसपर्यंत सिनेमा रिलीज केला जाऊ शकतो.