चंद्रा गाण्याने परदेशी तरुणींनाही नाचवले! पाहा ...

चंद्रा गाण्याने परदेशी तरुणींनाही नाचवले! पाहा भन्नाट व्हिडिओ (Foreign citizens also love Chandra Song Watch awesome dance video)

सध्या मराठी चित्रपटांचा डंका परदेशातही वाजू लागला आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातील ‘चंद्रा’ गाण्यानं राज्यासह देशभरातील संगीत रसिकांना वेड लावलं होतं. अजय अतुल यांच्या संगीतसाजानं नटलेल्या या गाण्यात वेगळीच नशा आहे. त्यामुळेच या गाण्याची परदेशी नागरिकांनाही भूरळ पडली आहे. याचा एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत परदेशी तरुणी चंद्रा या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. परदेशातील रस्त्यावर तरुणींच्या या ग्रुपनं या गाण्यावर हुबेहुब अमृता खानविलकरप्रमाणं नृत्य सादर केलं आहे. विशेष म्हणजे हा तरुणींचा ग्रुप प्रोफेशनल डान्सर असल्याचं यातून स्पष्ट होतंय. कारण त्यांच्या डान्सस्टेप्स इतक्या कमालीच्या दिसत आहेत. विशेष म्हणजे या गाण्यावर थिरकताना या तरुणींनी शॉर्ट आणि टॉप अन्‌ गळ्यात विविधरंगी स्टोल असा पेहराव केलेला आहे.

अजय-अतुल फॅन्स नामक एका फेसबुक पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून त्याला ४० हजारांहून अधिक लाईक्स, ८०० हून अधिक कमेंट्स आणि जवळपास साडेचार हजार शेअर्स आहेत.

युजर्सनी यावर अनेक पॉझिटिव्ह कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये अनेकांनी अजय-अतुलच्या संगीताची जादूच निराळी असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी चंद्रा गाण्याची कोरियोग्राफर फुलवा खामकर, गायक श्रेया घोषाल आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या कामाचंही कौतुक केलं आहे. प्रसिद्ध लेखक-कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित त्याच नावाचा हा सिनेमा आहे. एक बडा राजकारणी आणि तमाशा कलावंतीन यांच्यावर बेतलेला हा चित्रपट आहे. यामध्ये अजय-अतुलच्या संगीताची ही जादू आहे.