फ्रीजमध्ये ठेवू नयेत असे 13 पदार्थ (Foods that ...

फ्रीजमध्ये ठेवू नयेत असे 13 पदार्थ (Foods that should not be kept in the fridge)

काहीही आणावं आणि फ्रीजमध्ये टाकावं. फ्रीजमध्ये आहे, म्हणजे ते शंभर टक्के सुरक्षित, असं आपलं ठाम मत असतं. परंतु, काही खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे खराब होतात, त्यांची चव बदलते. काही शरीरास हानिकारक होतात. म्हणूनच फ्रीजमध्ये काय ठेवू नये, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

रेफ्रिजरेटर हा आपल्या किचनमधील एक अत्यावश्यक घटक ठरला आहे. खाद्यपदार्थ ताजे ठेवण्याचं, टिकवून ठेवण्याचं महत्त्वाचं कार्य फ्रीज करतो. दूध, दही, चीज, तूप, लोणी असे दुग्धजन्य पदार्थ किंवा कणकेचा गोळा, आइस्क्रीम, शीतपेयं इत्यादी ठेवण्यासाठी पूर्वी फ्रीजचा वापर केला जायचा; पण हळूहळू त्यात भाज्या, फळं, मसाले, लोणची, सुकामेवा वगैरे अनेक गोष्टींची वर्णी लागली. आता तर औषधं, ब्रेड इत्यादीही फ्रीजमध्ये गर्दी करू लागले आहेत. अर्थात काही पदार्थ नक्कीच असे आहेत की, जे जास्त दिवस टिकावेत म्हणून फ्रीजमध्ये ठेवावे लागतात. परंतु, काही खाद्यपदार्थ असेही आहेत की, जे फ्रीजमध्ये ठेवले तर खराब होतात. त्यांची चव बिघडते. तेव्हा असे कोणते पदार्थ आहेत, ते पाहूया.

ब्रेड
ब्रेडचं मोठं पाकीट घरी आणलं की, ते एका वेळेस खपत नाही. त्यात मुंबईसारख्या दमट हवामानात ब्रेड टिकून राहील की नाही, याची धास्ती असते. बुरशी येण्याची शक्यता अधिक असते. मग तो टिकवून ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये कोंबला जातो. फ्रीजच्या थंडगार हवेत ब्रेड कोरडा होतो नि कडक होतो. त्याची चव बिघडते. अन् नेमकं काय होतं, ते सांगता येणार नाही; पण तो पचायलाही जड होतो. तेव्हा ब्रेड फ्रीजमध्ये ठेवू नये. बाहेरच ठेवावा नि दोन-चार दिवसांत संपवून टाकावा. आता तर ब्रेडच्या पाकिटावर किती दिवसांच्या आत वापरायचा, त्याची तारीखही छापलेली असते. त्या तारखेच्या आत तो संपवून टाकावा, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज भासणार नाही.

अंडी
फ्रीजमध्ये जागा व्यापणारी आणखी एक गोष्ट म्हणजे अंडी. बहुदा सगळ्याच फ्रीजमध्ये अंड्यांसाठी खास जागा असते. परंतु, अंडी बाहेर ठेवली किंवा फ्रीजमध्ये ठेवली, तरी त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मात काहीच फरक पडत नाही. त्यामुळे ती आपण आरामात सामान्य वातावरणात, अर्थात उघड्यावर ठेवू शकतो. आपण ज्या दुकानातून ती खरेदी करतो, तिथे ती विशिष्ट आकाराच्या ट्रेमध्ये, अगदी उघड्यावरच ठेवली असतात ना! मग घरी आणल्यावर त्यांना फ्रीजमध्ये लपवून ठेवण्याची गरजच काय? अंड्यांना फ्रीजची गरज नसते, हे आपल्या लक्षात कधी येणार? मात्र बाहेर ठेवलेली अंडी आठवड्याभरात वापरावीत.

कॉफी
काही लोकांना कॉफी, विशेषतः दाणेदार कॉफी फ्रीजमध्ये ठेवण्याची सवय असते. ही सवय वाईट म्हटली पाहिजे. कारण कॉफी फ्रीजमध्ये ठेवल्याने ती ओलसर होऊन गोळा होते. तिचा स्वाद आणि वास बदलतो. मग ती कॉफीची अस्सल चव देऊ शकत नाही. कॉफी फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी, हवाबंद डब्यात ठेवावी. त्यातून कॉफी काढताना ओला चमचा वापरू नये. चमचा पूर्ण कोरडा करूनच त्यात घालावा.

मध
मध हा निसर्गतः टिकाऊ पदार्थ आहे. त्याला आणखी फ्रीजमध्ये ठेवून टिकवण्याची काहीच गरज नाही. अति थंड किंवा गरम वातावरणात त्याचा पोत बदलतो, त्यामध्ये दाणे तयार होतात. उलटपक्षी सर्वसाधारण तापमानात त्याचे नैसर्गिक गुणधर्म कायम राहतात. मधास हवाबंद काचेच्या बाटलीत ठेवावं. मग ते कधीच खराब होणार नाही. मात्र ही बाटली गॅसच्या जवळपास ठेवू नये. आगीच्या धगीने मधावर परिणाम होण्याची शक्यता असते.

केचप, सोया सॉस
टोमॅटो केचप, सोया सॉस आणि अन्य सॉसमध्ये व्हिनेगर आणि प्रिझर्व्हेटिवज जास्त प्रमाणात असतात. म्हणजे जास्त दिवस ते टिकून राहावेत म्हणून आधीच त्यामध्ये टिकाऊपणाचे घटक घातलेले असतात. त्यामुळे त्यांना अजून फ्रीजमध्ये टिकवून ठेवण्याची गरज नाही. या घटकांमुळे ते फ्रीजच्या बाहेर ठेवले तरी टिकू शकतात. काही लोकांना असं वाटतं की, या बाटल्यांचं बूच उघडल्यावर ते फ्रीजमध्ये ठेवावं. मात्र त्याचीही काही आवश्यकता नाही. याच पद्धतीने जॅम आणि जेलीही फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही.

ऑलिव्ह ऑईल
आजकाल डाएटिंगच्या नावाखाली स्वयंपाकात नेहमीची तेलं वापरण्याऐवजी ऑलिव्ह ऑईल वापरण्याचे सल्ले दिले जातात. आपणही स्वयंपाकात ऑलिव्ह ऑईलचा वापर करत असाल, तर ते फ्रीजमध्ये ठेवू नका. खूप कमी तापमानात ऑलिव्ह ऑईल, लोण्याप्रमाणे घट्ट होऊन जातं. अन् त्याचा स्वादही बिघडतो. तेव्हा या तेलास फ्रीजच्या आत ठेवण्याऐवजी थंड आणि सावलीच्या जागेत ठेवा. अशा रितीने ठेवल्यास ते दोनेक वर्षं तरी खराब होणार नाही. मात्र गॅसच्या जवळपास अथवा थेट पडणार्‍या सूर्यप्रकाशात तेल ठेवू नका. कारण जादा तापमानदेखील त्यास पेलवत नाही, ते लवकरच खराब होतं.

तुळशीची पानं
ही पानं फ्रीजमध्ये ठेवल्यास, त्यांच्या गुणधर्मानुसार इतर खाद्यपदार्थांचा गंध शोषून घेतात. शिवाय कोमेजतात आणि त्यातील सत्त्वं निघून जातं. म्हणून तुळशीची पानं फ्रीजमध्ये ठेवू नयेत. एका ग्लासात पाणी घालून त्यात ही पानं ठेवावीत.

लसूण
अख्खा लसूण किंवा लसणाच्या पाकळ्यांना कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. कारण अति थंडीने ती नरम पडतात आणि त्यांना कोंब फुटतात. त्यामुळे त्याचा स्वाद कमी होतो. लसूण सोलून, तुकडे करून, हवाबंद डब्यात भरून एक-दोन दिवसांकरिता फ्रीजमध्ये ठेवू शकता. सूर्यप्रकाशापासून दूर, थंड जागेत लसूण ठेवावेत, म्हणजे ते लवकर खराब होणार नाहीत. प्लॅस्टिक बॅग अथवा बंद डब्यात लसूण अजिबात ठेवू नका.

कांदा
कांदे फ्रीजमध्ये ठेवू नका. कारण ते अति थंडीने सुकतात आणि निकामी होतात. हवेशीर आणि थंड जागेत कांदे ठेवावेत. फ्रीजमध्ये त्यांना हवा लागत नाही. अन् ते लवकर खराब होतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदे आणि बटाटे एकत्र ठेवू नका. प्लॅस्टिकच्या पिशवीत त्यांना चुकूनही ठेवू नका. त्यामधून वायू निघतो आणि दोघांतही ओलावा असल्याने दोन्ही भाज्या खराब होतात.

बटाटे
फूड स्टॅन्डर्ड एजन्सीच्या सूचनेनुसार बटाटे फ्रीजमध्ये ठेवू नयेत. कारण फ्रीजमध्ये ठेवलेले बटाटे आपण शिजवतो, तेव्हा त्यामधून अ‍ॅक्रायला माइट नावाचं रसायन बाहेर पडतं, जे आपल्यासाठी हानिकारक असतं. असे बटाटे खाल्ल्याने कॅन्सरचा धोका असतो. बाहेरच्या वातावरणात, थंड जागेत बटाटे ठेवावेत, म्हणजे ते त्याच्या मूळ रूपात राहतात.

टोमॅटो
साधारणपणे एक-दोन किलो टोमॅटो आणून ते फ्रीजमध्ये ठेवण्याची वृत्ती घराघरांत दिसून येते. परंतु, फ्रीजमध्ये ठेवलेले टोमॅटो नंतर निरखून पाहिले तर त्याचा रंग आणि स्वाद बदललेला आढळून येतो. फ्रीजमधील अति थंड तापमानाचा टोमॅटोच्या आवरणावर परिणाम होतो. शिवाय ही थंड हवा टोमॅटो पिकण्याची प्रक्रिया थांबवते. यामुळे त्याचा स्वाद कमी होतो. तेव्हा टोमॅटो हे कागदी पिशवीत ठेवून रूम टेम्परेचरलाच ठेवा. पिकल्यानंतर दोनेक दिवसात वापरून संपवा, अन्यथा जास्त पिकून ते खराब होऊ शकतात.

काकडी
टोमॅटोप्रमाणेच काकडीदेखील फ्रीजमध्ये ठेवण्याची वृत्ती घराघरांत दिसून येते. पण ही फळभाजी मुळातच पाणीदार आणि थंड प्रकृतीची असल्याने तिला आणखी थंड वातावरणात ठेवण्याची गरज नाही. फ्रीजमध्ये ठेवल्याने काकडीची साल खराब होते. अन् ती जास्त दिवस आत राहिल्यास कुजते. तेव्हा फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा काकडी बाहेरच थंड जागेत ठेवा. अन् लवकरात लवकर वापरा.

फळं
फ्रीजच्या जाहिरातीत दाखवतात, अन् आपण त्याला भुलून फळं फ्रीजमध्ये ठेवतो. पण सफरचंद, केळी, संत्री, मोसंबी, पिच, लिंबू अशी फळं फ्रीजमध्ये ठेवू नयेत. कारण त्यांची चव बिघडते. ती नरम पडतात. कधी कधी काळी पडून खराब होतात. काही लोकांना थंडगार फळं खाण्याची इच्छा होते. अशा लोकांनी खाण्यापूर्वी फार तर तासभर आधी ती फ्रीजमध्ये ठेवावी. अन् मग खावीत. संत्री, मोसंबी, लिंबू ही फळं रूम टेम्परेचरवर ठेवावीत. एकमेकांच्या जवळ ठेवू नयेत. कारण ती खराब होऊ शकतात.

कोणताही अन्नघटक उगाच जास्त प्रमाणात खरेदी करून, घरात साठा करून ठेवू नका. ताजं अन्न आणा आणि ताजंच खा. बाजारातून कोणताही पदार्थ आणल्यानंतर अधिक काळ न ठेवता, लवकरात लवकर वापरा.