पहिली महिला रिक्षाचालक, सेवाभावी नर्स देखील आहे...
पहिली महिला रिक्षाचालक, सेवाभावी नर्स देखील आहे… ‘जीव माझा गुंतला’च्या सेटवर झाला उलगडा! (First Lady Auto Rickshaw Driver, Also Works As A Nurse)

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिका सध्या बरीच गाजते आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा जीव या मालिकेत गुंतला असं म्हणायला हरकत नाही. मालिकेत अंतराची भूमिका अभिनेत्री योगिता चव्हाण साकारते आहे. अंतराने या भूमिकेसाठी रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. परंतु रिक्षा चालवण्यापेक्षाही रिक्षा चालवताना संवाद बोलायचे, अॅक्टिंग करायची होती. सुरुवातीला जरा अवघड वाटले तरी आता अंतरा आणि तिची हमसफर (रिक्षा) दोघींनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अंतराला याच मालिकेच्या सेटवर एक सरप्राईझ मिळालं जेव्हा रेखा दुधाणे तिला भेटायला सेटवर आल्या. अंतरा म्हणते, ‘माझ्यासाठी तर ती “ग्रेट भेट”च होती.

रेखा दुधाणे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला रिक्षाचालक. त्या अचानक एक दिवस ‘जीव माझा गुंतला’ मालिकेच्या सेटवर आल्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने अंतरावर जो काही प्रभाव टाकला त्यामुळे अंतराला तिच्यावर सोपवलेल्या जबाबदारीची जाणीव झाली. एवढंच नाही तर आपण अशा व्यक्तीला रिप्रेसेंट करतो या गोष्टीचा तिला आनंद असल्याचे तिने सांगितले. रेखाजींच्या व्यक्तीमत्त्वाचा दुसरा पैलू देखील यावेळेस सगळ्यांना माहीत झाला. तो म्हणजे, रेखाजी त्या रिक्षाचालक नसून त्या नर्सदेखील आहेत. रेखा ताईंनी आयुष्यात मुलगी, बहीण, बायको आणि अश्या अनेक जबाबदार्या पार पाडल्या आहेत. गेले तीसहून अधिक वर्ष नर्सिंग बरोबरच रिक्षा चालवून संसाराला चांगलाच हातभार लावत आहेत.
“मला आशा आहे रेखा ताईंच्या आशीर्वादाने आणि तमाम महाराष्ट्राचं प्रेम या दोन्हीमुळे मी देखील अंतराच्या भूमिकेला न्याय देऊ शकेन”,असे अंतराने म्हटले आहे.