ऋषि कपूरचा पहिला स्मृतीदिन, जूही चावलाने जागवल्...

ऋषि कपूरचा पहिला स्मृतीदिन, जूही चावलाने जागवल्या आठवणी (First Death Anniversary: Juhi Chawla Remembers Rishi Kapoor Calling Her An Insecure Actor)

बॉलिवूडचे सर्वाधिक रोमँटिक हिरो चिंटू म्हणजेच ऋषि कपूर यांचा आज पहिला स्मृतीदिन आहे. ३० एप्रिल २०२० रोजी वयाच्या ६७ वर्षी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. आज त्यांना जाऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या आठवणीने भावूक होत चाहत्यांनी ट्वीटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत काम केलेल्या सहकलाकारांनीही ऋषिजींसोबतच्या आठवणी जागवल्या आहेत. अभिनेत्री जुही चावलानेही त्यांच्यासोबत काम करतानाचा एक अनुभव शेअर केला आहे.

ऋषि कपूर यांचा शेवटचा चित्रपट शर्माजी नमकीनमध्ये जुही त्यांच्यासोबत काम करत होती. परंतु चित्रपट पूर्ण होण्याआधीच त्यांचं निधन झालं. आता या चित्रपटामध्ये परेश रावल त्यांची भूमिका करणार आहेत. याच चित्रपटादरम्यानचा एक किस्सा जुहीने टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना सांगितला –

जुहीने सांगितले की, ऋषिजी बाहेरून जेवढे कठोर दिसायचे, तेवढेच ते मनाने प्रेमळ होते. माझी मस्करी करायला त्यांना खूप मजा वाटायची. त्यांची बोलण्याची ढब अशी होती की कोणालाही वाटे की ते आपल्यावर रागावले आहेत. त्यांच्या या स्वभावामुळे मला मात्र त्यांच्याशी बोलताना छान वाटायचे. मी एखादा शॉट दिल्यानंतर सारखे सारखे रिव्हू बघण्यासाठी मॉनिटरजवळ जायचे, त्यामुळे त्यांनी मला इनसेक्युअर अॅक्ट्रेस असं म्हटलं होतं.

त्याचं झालं असं होतं की, ऋषिजींचे सर्वच शॉट्‌स छान होते आणि मला सतत मी शॉट व्यवस्थित करते की नाही, अशी काळजी वाटत होती. म्हणूनच मी सारखी सारखी शॉट पाहण्यासाठी मॉनिटरजवळ जात होते. ऋषिजींच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या अंदाजात मला सुनावलं, ‘तो मॉनिटर दिग्दर्शकासाठी आहे, तुझ्यासाठी नाही इनसिक्युअर ॲक्टर.’

खरोखर ते एकदम मस्त आणि गमतीशीर व्यक्ती होते.

जुहीने ऋषी कपूर यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि चाहत्यांनीही त्यांच्या जोडीस पसंती दर्शविली आहे. जुहीने सांगितले की, ऋषि कपूर गणेशचतुर्थीच्या वेळी नेहमी बोलायचे, मी तुला बोलावणार नाही, तूला स्वतःहून यावं लागेल. मला त्यांना विचारण्याची हिंमतच झाली नाही की, तुम्ही आतून इतके प्रेमळ असताना, वागताना इतके कठोर का होता?

ऋषि कपूर यांना ॲड फिल्म्समध्ये काम करायला अजिबात आवडत नव्हतं. कोणत्याही कथेशिवाय वा भावांनाशिवाय संवाद कसे बोलणार, असं ते म्हणायचे. याच कारणामुळे त्यांनी कधी जाहिरातींमध्ये काम केले नाही.

जवळपास २ वर्ष कॅन्सरशी लढा दिल्यानंतर ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला. उपचाराकरीता ते न्यूयॉर्कलाही गेले होते. परंतु मागील वर्षी लॉकडाऊन दरम्यान पुन्हा त्यांची तब्येत बिघडली आणि आठवणी मागे ठेवत ते सगळ्यांना सोडून निघून गेले.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम