आषाढस्य प्रथम दिवसे…. (First Day Of Aash...

आषाढस्य प्रथम दिवसे…. (First Day Of Aashadh Month: Memories Of Mahakavi Kalidas)

संगीता वाईकर
रणरणत्या उन्हानंतर वेध लागतात ते पावसाच्या सरींचे…या पावसाच्या सरी तन आणि मन चिंब भिजवून टाकतात. ज्येष्ठ संपून आषाढ सुरू झाला की आकाशात हळूहळू मेघांची गर्दी होऊ लागते आणि मग आठवण येते ती महाकवी कुलगुरू कालिदासाची. 
कालिदासाच्या ‘मेघदूत’ या विरह काव्यातील दुसरा श्लोक ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा अतिशय प्रसिद्ध असा श्लोक. ‘आषाढ’ म्हटले की आठवतो ढगांच्या काळ्या पुंजक्यातून, गडगडाट करीत बरसणारा मुसळधार पाऊस आणि कालिदासाची स्वतंत्र अभिजात साहित्य कृती ‘मेघदूत’. निसर्गावर प्रेम करणारा हा निसर्ग प्रेमी कवी. निसर्गाबद्दल असणारं अतोनात प्रेम त्यांच्या शब्दातून व्यक्त होतं. प्रत्येक निसर्गप्रेमींना त्यात चिंब चिंब भिजवून टाकतो. आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी पावसाळ्याची सुरुवात होते. आपल्या मेघदूत या महाकाव्याच्या प्रारंभी पावसाळ्याच्या सुरुवातीचे नितांत सुंदर वर्णन कालिदासांनी केले आहे.

मेघदूत काव्याचा जन्म
हेमामाली आणि विशालाक्षी या नूतन विवाहित यक्ष दाम्पत्याची ही कथा. आपल्या प्रिय पत्नी पासून दूर असलेला यक्ष. आकाशात दाटलेल्या मेघांकडे बघून पत्नीच्या विरहाने व्याकूळ होतो आणि त्या मेघांशी बोलू लागतो. या मेघालाच तो आपला दूत बनवतो आणि हे मेघदूत नावाचे अतुल्य काव्य कालिदासाच्या सिद्धहस्त लेखणीतून जन्म घेते.   
आषाढातील नभात निळ्या सावळ्या मेघांची गर्दी होते. निवांतपणा न घेता बरसणार्‍या सरींनी तृप्त झालेली वसुंधरा अंकुरते. हा एक सृजनाचाच उत्सव असतो. सगळीकडे हिरवागार गालिचा अंथरलेला दिसतो. सृष्टीचे हे विलोभनीय देखणं रूप तन-मनाला ओले चिंब करून जाते. निसर्गाचं हे भव्य आणि उदात्त रूप कोणत्याही वयाला खुणावत असतं. कालिदासाला देखील या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसराने मोहून टाकले आणि त्यातून निर्माण झालं अभिजात दर्जाचं साहित्य ‘मेघदूत’

नव चैतन्याचा आषाढ मास
शृंगार रस हा कालिदासाच्या लेखणीला भावलेला रस. यातील अलंकाराचा प्रतिभाविलास सौंदर्यपूर्ण आहे. असा हा सृजनाचा आणि नव चैतन्याचा आषाढ मास. मन कातर करणारा… मनाला हुरहुर लावणारा असा हा आषाढ. 
कालिदासाची प्रकृती वर्णन शैली अभूतपूर्व आहे. त्यात आल्हाददायकता आहे, भावात्मकता आहे. या काव्यात मनुष्याची चिरवेदना आहे. स्त्री- पुरुषाच्या मधुसक्त प्रणयाची ही अनोखी कहाणी आहे. हे विरह काव्य आहे. यात अलंकाराचा समायोचीत उपयोग केला आहे. काव्यात स्वाभाविक सौंदर्य ओतप्रोत भरलेले आहे. कवीचे काव्यमाधुर्य मनाला आकृष्ट केल्याशिवाय राहत नाही. शृंगार रस हा या काव्याचा आत्मा आहे. मेघालाच सजीव बनवून किंवा मानून कवीने त्याला नायकाचे महत्त्व प्राप्त करून दिले आहे.

महाकवी कालिदास 
कालिदास म्हणजे एक सुजाण रसिक होता याची कल्पना मेघदूत साहित्य कृतीतून होते. निसर्ग, प्रदेश, माणसं याबद्दलचं त्याचं भान आणि जाण याबद्दल वाटणारं प्रेम हे सातत्याने जाणवत राहतं. सृष्टीतील जे काही उत्तम, उदात्त, सुंदर, मंगल असतं ते सगळं प्रतिभावंताला मोहात पाडतं. कालिदास म्हणजे खरोखरच एक महान कवी, नव्हे ‘महाकवी’ .
कालिदासाच्या काव्याने अनेक कवी – लेखकांना भुरळ पाडली, प्रेरणा दिली. कालिदासाच्या जन्म तिथीबाबत निश्चिती नसल्याने मेघदूतात वर्णन केलेल्या आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिन साजरा केला जातो. एखाद्या साहित्यिकाच्या साहित्यकृतीच्या उल्लेखावरून त्यांचा जन्म दिन साजरा करणे ही कल्पना खूपच आगळीवेगळी आहे. कवी कालिदास म्हणजे भारतीय कवींच्या शिरपेचातला मुकुटमणी म्हणता येईल.
कामिनीचा विलास
पावसाळा हा प्रेमीजनांचा ऋतू. प्रेमाला या ऋतूत बहर येतो तसा निसर्ग देखील आपल्या सौंदर्याने नखशिखांत नटलेला असतो. मानव हा निसर्गाचाच एक अविभाज्य घटक. त्याची सृजनशीलता हीच निसर्गाच्या सान्निध्यात अधिकाधिक समृद्ध होते. कालिदासांना वृक्षांनी सजलेली  व फळाफुलांनी, वेलींनी नटलेली सुजलाम सुफलाम अशी वनसृष्टी अपेक्षित आहे आणि तसेच अप्रतिम वर्णन त्यांच्या साहित्यात आहे.
मानवी संबंधाचे सत्य आणि नात्याची घट्ट वीण कालिदास आपल्या साहित्यात अतिशय अप्रतिम चित्रित करतात. त्याचप्रमाणे अंत:पुरातील गुजगोष्टींपासून ते हिमालयाच्या उत्तुंग शिखरापर्यंत  कलिदासाची लेखणी लीलया संचार करते. भोग आणि त्याग, शृंगार आणि वैराग्य, काम आणि मोक्ष यांचा सुरेख समन्वय कालिदासाने आपल्या साहित्यात साधला आहे.
केवळ संस्कृत वाङ्मयातच नव्हे तर संपूर्ण जागतिक वाङमयात कवी कुलगुरू कालिदासाचे स्थान अद्वितीय आहे. दीड हजार वर्षे उलटून गेली तरी देखील त्यांचे स्थान अढळ आहे. भावकवी, महाकवी व नाटककार या तिन्ही भूमिका वठवण्यात कालिदास कमालीचा यशस्वी झाला. तो ‘कवी कुलगुरू’ बनला. ऋतू संहार आणि मेघदूत ही खंड काव्ये, कुमार संभवम, रघुवंशम ही महाकाव्ये आणि विक्रमोर्वशियम, अभिज्ञान शकुंतलम्, मालविकाग्निमित्रम् ही तीन नाटके अशा कालिदासाच्या सात कलाकृती अविस्मरणीय आहेत.   

सुमारे सोळा शतके उलटून गेली तरी कालिदास तो कालिदासच ! कालिदासाची विद्वत्ता चतुरस्र आहे, तशी त्याची कलानिपुणता रसिकांचे समाराधन करणारी आहे. विद्वत्ता आणि वैदग्ध यांचा अपूर्व मेळ त्यांच्या साहित्यात दिसतो. म्हणूनच त्यांचे साहित्य पांडित्यपूर्ण तर आहेच, त्यात कलेची समृद्धताही आहे. त्यांचे साहित्य मनाला गुंतवून टाकणारे, भुरळ घालणारे आहे. त्यांच्या सूक्ष्म अवलोकनाचा प्रत्यय त्यांच्या निसर्ग वर्णनात येतो.
असा हा काव्य कामिनीचा विलास कालिदास!|
महाकवी कुलगुरू कालिदास यांना विनम्र अभिवादन