पहिले बाहुबली आणि आता प्रभू श्रीराम यांचा आवाज ...

पहिले बाहुबली आणि आता प्रभू श्रीराम यांचा आवाज म्हणून लोक मला स्मरणात ठेवतील – शरद केळकर (First Bahubali And Now I Will Be Remembered As The Voice Of Lord Ram Sharad Kelkar)

आदिपुरुष चित्रपटात श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या प्रभासचा आवाज अभिनेता शरद केळकरने डब केला आहे. याबद्दल बोलताना शरद केळकरने, “गेली अनेक वर्षं लोक मला बाहुबलीचा आवाज म्हणून ओळखत होते. अनेकांनी तर माझे नाव तसेच लक्षात ठेवले आणि आता २०२३ नंतर मला हेच सर्वजण श्रीरामाचा आवाज म्हणून लक्षात ठेवतील, याचा मला खूप आनंद आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की प्रभू श्रीरामांनी मला त्यांचा आवाज म्हणून निवडले”, अशी भावना व्यक्त केली.

ओम राऊत या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा आदिपुरुष हा चित्रपट गेल्या दीड महिन्यांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटातील पात्रांच्या लूकची अन्‌ चित्रपटाच्या व्हीएफएक्सबाबतही नेटकरी टिका करत आहेत. असे असतानाही काही प्रेक्षक मात्र प्रभासला रामाच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

आदिपुरुष या चित्रपटात अभिनेता प्रभास हा प्रभू रामाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या हिंदी भूमिकेसाठी प्रभासला आवाज देणारा अभिनेता शरद केळकर याने माध्यमांशी संवाद साधला. शरद म्हणाला- “ओम राऊत यांनी अगदी पहिल्या दिवसापासूनच निश्चित केले होते की, प्रभासच्या पात्राला माझा आवाज द्यायला हवा. आणि या बाबतीत मी खूप भाग्यवान आहे की, मी भगवान श्री राम यांच्या व्यक्तिरेखेला माझा आवाज दिला आहे.”

यावेळी शरद केळकरला छोट्या बजेटच्या हनुमान चित्रपटातील उत्कृष्ट व्हीएफएक्सच्या तुलनेत आदिपुरुष चित्रपटातील खराब व्हीएफएक्सबद्दल विचारण्यात आल्यानंतर त्याने मी अजून हनुमानचा ट्रीझर पाहिलेला नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करू शकत नाही. मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतो, असे उत्तर दिले. आदिपुरुष पुढील वर्षी १६ जून २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान आणि सनी सिंग महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे, जो हिंदीसह तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे बजेट जवळपास ५०० कोटी आहे.