लखनऊ येथे शाहरुख खानच्या पत्नीविरोधात एफआयआर दा...
लखनऊ येथे शाहरुख खानच्या पत्नीविरोधात एफआयआर दाखल; काय आहे प्रकरण (FIR Registered Against Shahrukh Khan Wife Gauri For Embezzlement In Lucknow)

प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. शाहरुखची पत्नी गौरी खान हिच्याविरोधात लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आयपीसी ४०९ अंतर्गत हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, तुलसियानी कंट्रक्शन अँड डेव्हलपर्स लिमिटेडचे सीएमडी अनिल कुमार, डायरेक्टर महेश तुलसियानी आणि शाहरुख खानची (Shahrukh Khan) पत्नी, कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर गौरी खान विरोधात एफआयर दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील एक व्यक्ती जसवंत शाह यांनी तुलसियांनी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पर्स लिमिटेड या कंपनीकडून लखनऊमध्ये फ्लॅट खरेदी केला होता. त्याची किंमत कोट्यवधीत होती. त्यापैकी आतापर्यंत ८६ लाख रुपये त्यांनी दिले आहेत. तरीही त्याला फ्लॅट मिळाला नाही, असा दावा जसवंत शाह यांनी केला आहे. गौरी खान या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर असल्यामुळे त्याने गौरी खानच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?
एवढेच नव्हे तर जसवंत शाह याने तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पर्स लिमिटेडचे सीएमडी अनिल कुमार तुलसियांनी आणि संचालक महेश तुलसियानी यांच्या विरोधातही एफआयआर दाखल केला आहे. तिघांवरही कलम ४०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यातून तशी माहिती देण्यात आली आहे. गौरी खान ही ब्रँड अॅम्बेसेडर होती. तिच्याकडून झालेला प्रचार प्रसार पाहून प्रभावित होऊन हा फ्लॅट खरेदी करण्यात आला. मात्र, आपली फसवणूक झाली, असं शाह यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, या प्रकरणावर गौरी खानने अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पैसै देऊनही मला फ्लॅट देण्यात आला नाही, असं तक्रारदाराचं म्हणणं आहे. कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर असल्याने गौरीचं या प्रकरणात नाव आलं आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दुसऱ्यालाच फ्लॅट विकला
दरम्यान, कंपनीने त्याचा फ्लॅट दुसऱ्या व्यक्तीला रजिस्टर्ड अॅग्रीमेंट टू सेल करून विकला असल्याचे समजते. शिवाय शाह याने पैसे परत मागितल्यानंतर त्यांना धमकावण्यात आलं आहे. याप्रकरणी शाह यांनी डीसीपी साऊथ राहुल राज यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यानंतर डीसीपीच्या आदेशाने तिघांवर एफआयआर नोंदवण्यात आला.
शाह याने एचडीएफसीकडून लोन घेऊन ८५.४६ लाख रुपये भरले होते. ऑगस्ट २०१५ मध्ये हे पैसे भरले होते. ऑक्टोबर २०१६ पर्यंत फ्लॅट देण्याचं कंपनीने त्यांना आश्वासन दिलं होतं. पण त्यांना फ्लॅटचा ताबा मिळाला नाही. मात्र, कंपनीने नुकसान भरपाई म्हणून त्याला २२.७० लाख रुपये दिले होते. तसेच सहा महिन्यात फ्लॅट देण्याचं आश्वासन दिलं होतं. तसं नाही केलं तर व्याजासहीत पैसे परत करण्याचे आश्वासनही कंपनीकडून देण्यात आलं होतं, असं त्याचं म्हणणं आहे.