‘द कपिल शर्मा शो’ वादाच्या भोवऱ्यात (FIR Filed ...

‘द कपिल शर्मा शो’ वादाच्या भोवऱ्यात (FIR Filed Against ‘The Kapil Sharma Show’, Know What is The Matter)

अलिकडेच एका नव्या अंदाजात आणि नव्या पर्वासह सुरु झालेला ‘द कपिल शर्मा शो’ हा काही कारणास्तव वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यामुळे या शोमधील कलाकार तसेच निर्मातेही संकटात सापडणार असे दिसते. शोमधील एका एपिसोडच्या प्रसारणावर मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्हा न्यायालयात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पाहूया असं काय घडलं या एपिसोडमध्ये…

द कपिल शर्मा शो, The Kapil Sharma Show

सोनी टेलिव्हिजनवर प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘द कपिल शर्मा शो’च्या एका एपिसोडमध्ये काही कलाकार कोर्टरुमचा सीन करताना स्टेजवर उघडपणे मद्य प्राशन करण्याचा अभिनय करताना दाखविण्यात आले आहेत, तेही मद्याच्या बाटलीवर दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, असे लिहिले असतानाही… असे वर्तन दाखवून शो मधील कलाकारांनी न्यायालयाचा अपमान केला आहे. असा आरोप करत द कपिल शर्मा शोच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

द कपिल शर्मा शो, The Kapil Sharma Show

या प्रकरणी शिवपुरी येथील एका वकिलाने CJM न्यायालयात तक्रार दाखल केली आहे, ज्याची सुनावणी १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ‘द कपिल शर्मा शो’ खूपच अतिशयोक्तीचा असल्याचे या वकिलाने म्हटले आहे. शिवाय या शोमध्ये मुलींवर फारच वाईट कमेंट्‌स केले जात असल्याचे सांगत या वकिलाने असे शो बंद पाडले पाहिजेत असेही म्हटले आहे.  न्यायालयातील सीनमध्ये अशाप्रकारे मद्य घेताना दाखवल्यामुळे न्यायालयाचा अपमान तर झालाच शिवाय दर्शकांचेही गैरसमज होण्याची शक्यता आहेच. म्हणून याविरोधात सदर तक्रार नोंदवण्यात आली आहे.

‘द कपिल शर्मा शो’ मधील सर्वच कलाकार लोकांचे मनोरंजन करण्याचे, त्यांना हसवण्याचे काम करत असले तरी एका चुकीच्या गोष्टीमुळे त्यांच्यावर रडण्याची पाळी आली आहे.