जाणून घ्या कोविड लशीसंबंधीत सर्व प्रश्न आणि शंक...

जाणून घ्या कोविड लशीसंबंधीत सर्व प्रश्न आणि शंकाचं समाधान… (Find Answers To All your Key Questions About Covid vaccine Here)

भारतामध्ये करोना प्रतिबंधक दोन लशींच्या वापरासाठी परवानगी मिळालेली आहे. यामुळे एकीकडे लोकांना आनंद तर झाला आहे, पण काहींच्या मनात याविषयी काही प्रश्न, काही शंका देखील आहेत. तेव्हा कोविड-१९चं लसीकरण आणि त्याचे परिणाम याविषयीच्या लोकांच्या प्रश्नांचं निरसन व्हावं व त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका राहू नये यासाठी आरोग्य मंत्रालयाने त्यांना विचारण्यात येत असलेल्या प्रश्नांची उत्तरे लिखित स्वरुपात त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाहूया ते प्रश्न आणि त्यांची उत्तरे काय आहेत…

1 – देशातील सर्व नागरिकांनी करोना लस टोचून घेणे गरजेचं आहे?
उत्तर – लस टोचून घेण्यासाठी कोणताही कायदा लागू नाही. कोविड-१९ चे लसीकरण स्वैच्छिक आहे. परंतु करोनासारख्या आजारापासून स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल तर सगळ्यांनी कोविड-१९ ही लस घ्यावी, असा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींपर्यंत हा व्हायरस पसरण्यापासून आपल्याला थांबवता येईल.

2 – सगळ्यांना एकाच वेळी लस दिली जाणार का?
उत्तर – सर्वप्रथम ज्यांना या विषाणूचा धोका अधिक आहे अशा लोकांना ही लस दिली जाईल. म्हणजे हेल्थलाइन तसेच फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना पहिली लस दिली जाईल. त्यानंतर ५० वर्षांहून अधिक वय असलेल्या व्यक्तींना लस टोचली जाईल आणि शेवटी सगळयांसाठी ही लस उपलब्ध करून दिली जाणार आहे.

3 – करोनाची लस बाजारात सर्वत्र उपलब्ध असणार आहे का?
उत्तर – नाही. आता तरी ही लस बाजारात उघडपणे मिळणार नाही. सध्या ही लस तुम्हाला प्रायव्हेट स्वरुपात विकत घेता येणार नाही. तर ती केंद्राच्या नियंत्रणात असलेल्या केंद्रांमध्येच मिळेल.

4 – करोनामुक्त झालेल्या व्यक्तिंनीदेखील ही लस घेणे जरूरी आहे का?
उत्तर – करोनातून बरे झाल्यानंतरही कोविड लस घेण्याचा सल्ला दिला जात आहे. कारण ही लस या आजाराविरुध्द एक उत्तम आणि स्ट्राँग इम्युनिटी बनवण्याकरीता मदत करणार आहे, ज्यामुळे आपण एकदम सुरक्षित राहू शकू.

5 – लसीकरणानंतरही काही दक्षता घेण्याची गरज आहे का?
लक्षात ठेवा, लसीकरणानंतरही मास्क घालणे, नियमितपणे हात स्वच्छ धूणे वा सॅनिटाईज करणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे गरजेचेच आहे. लस ही यापैकीच एक अधिकचा स्वंरक्षक उपाय आहे. त्यामुळे लसीकरणानंतर मास्क न घालण्याचा विचार करणेही चुकीचं आहे. सुरक्षित अंतर आणि मास्क अजून कमीत कमी दीड वर्षं तरी गरजेचं आहे. मास्क तर सर्वाधिक सुरक्षित आहे.

6 – लस टोचून घेतल्यानंतर करोना होण्याची भिती राहणार नाही ना?
उत्तर – एम्सचे डायरेक्टर गुलेरीया यांनी सांगितले की, करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर त्या व्यक्तिंमध्ये करोना व्हायरस विरूद्ध लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती किती दिवस टिकून राहते. याविषयी अभ्यास करावा लागेल. परंतु, लस घेतल्यानंतरही जर करोना झाला तर त्याचा प्रभाव कमी असेल, हे निश्चित असंही ते म्हणाले.

7 – सदर लस अतिशय कमी अवधीच्या परिक्षणानंतर तयार करण्यात आली आहे, तेव्हा ती कितपत सुरक्षित समजायची?
उत्तर – रेग्युलेटरी संस्थानी ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे सांगितल्यानंतरच ही लस लॉन्च केलेली आहे. तेव्हा ही सुरक्षितच आहे.

8 – एखाद्या व्यक्तीला कोविड-१९ चा संसर्ग झाला आहे वा तो गंभीर परिस्थितीत आहे अशा वेळी आपण त्यास ही लस देऊ शकतो का?
उत्तर – कोविड-१९ चा संसर्ग झाला असलेल्या वा जो रुग्ण गंभीर आहे, त्याने लसीकरणासाठी केंद्रावर जाऊ नये. त्यामुळे इतर लोकांना त्यांचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. अशा व्यक्तींनी १४ दिवसांनंतर लस घ्यावी.

9 – नोंदणीशिवाय कोविड लस घेता येईल का?
उत्तर – करोना लशीकरीता नोंदणी करणे आवश्यक आहे, अन्यथा लस दिली जाणार नाही.

10 – एखादी व्यक्ती लस घेण्याकरिता योग्य आहे किंवा नाही हे कसे ओळखावे?
उत्तर – लसीकरणाकरिता योग्य असलेल्या व्यक्तींना नोंदणीनंतर त्यांच्या नोंदवलेल्या फोन नंबरवर सूचना दिली जाईल. तसेच त्यांच्या फोनवर लसीकरणासंदर्भातील सर्व माहितीही दिली जाणार आहे.

11 – लस किती प्रमाणात आणि किती अंतराने घ्यावी?
उत्तर – लशीचे दोन डोस दिले जातील. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये किमान २१ ते २८ दिवसांचं अंतर असणार आहे. खरं तर पहिला डोस दिल्यानंतर १० ते १४ दिवसांनंतरच त्याचा परिणाम दिसू लागतो.

12 – मुलं आणि गर्भवती महिलांना ही लस देता येईल का?
उत्तर – आतापर्यंत भारतामध्ये सदर लशीचा प्रयोग हा केवळ १८ वर्षांवरील व्यक्तींवरच केला गेला आहे. तसेच गर्भवती नसलेल्या महिलांवरच केला गेला आहे. त्यामुळे सध्या तरी ही लस मुलांसाठी नाही आहे. वयस्कर व्यक्तींना ही लस देण्यासाठी प्राधान्य दिलं जात आहे.

13 – मधुमेह, कॅन्सर यांसारखे आजार असलेल्या व्यक्तींना ही लस दिली जाईल का?
उत्तर – मधुमेह, कॅन्सर हे आजार असलेल्या रुग्णांना या संसर्गाचा धोका अधिक असल्यामुळे त्यांना ही लस देण्यास निश्चितच प्राधान्य दिले जाईल.

14 – या लशीचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का?
उत्तर – सदर लस सुरक्षित असल्याची हमी मिळाल्यानंतरच ही लस उपलब्ध करण्यात आली आहे. ही लस घेतल्यानंतर ताप येणे, डोकेदुखी यासारखी लक्षणं दिसू शकतात, त्यात घाबरण्यासारखं काही नाही. तरीही काही दुष्परिणाम दिसलेच तर त्यातूनही बाहेर कसे पडावे यासाठी राज्यांमध्ये सूचित केलं गेलं आहे.

15 – जर एखाद्याला ही लस घ्यायची नसेल तर काय करावे?
उत्तर – लसीकरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता असणे आवश्यक आहे. सरकार आपल्या परीने लोकांना समजवण्याचा प्रयत्न करीत आहे. जसजशी लोकांमध्ये जागरुकता येईल, ते स्वतःहून लसीकरणासाठी पुढे येतील.