गणेशोत्सवाचे बिघडलेले अर्थकारण (Financial Crisi...
गणेशोत्सवाचे बिघडलेले अर्थकारण (Financial Crisis Affects Forthcoming Ganesh Utsav)


करोनाची साथ गेल्या वर्षीपेक्षा निवळलेली दिसत असली तरी सरकारी निर्बंध उठविले नसल्याने यंदाच्या गणेशोत्सवावर मंदीचे सावट आले आहे. सलग दुसऱ्या वर्षी हा महासण दडपणाखाली साजरा करावा लागत असल्याने याच्याशी संबंधित व्यापारी, मूर्तिकार आणि किरकोळ विक्रेते यांचे अर्थकारण पुरते बिघडले आहे.

गणेशोत्सव हा कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. परंतु यंदा करोनाच्या संकटाबरोबरच गेल्या महिन्यात आलेल्या पुराने चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, खेड या बाजारपेठेत कमालीचे मंदीचे व चिंतेचे वातावरण आहे. अतिवृष्टीमुळे लोकांच्या घराची, शेतीची, उद्योगधंद्याची मोठी हानी झाली आहे. त्याचा परिणाम आगामी गणेशोत्सवावर दिसून येत आहे.

एकट्या मुंबईत १० लाखांहून अधिक घरगुती गणपती बसविले जातात. यातल्या अर्ध्याहून अधिक मूर्ती पेण परिसरातून येतात. परंतु यंदा त्या मूर्तींना मागणीच कमी असल्याने पेणच्या मूर्तीकारांच्या चिंता वाढल्या आहेत. तसेच मुंबईत १२ हजारांपेक्षा अधिक गणेशोत्सव मंडळे आहेत. मूर्तीची उंची ४ फूट एवढीच असावी, असा नियम असल्याने मोठी मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांची आर्थिक घडी पुरती विस्कटली आहे. सार्वजनिक उत्सवावरील निर्बंधामुळे त्यावर अवलंबून असलेला मंडप व्यवसाय, रोषणाई, सजावटकार, फुलांचा व्यापार अशा सगळ्याच व्यापाऱ्यांना फटका बसला आहे.

पर्यावरण विभागाने दोन वर्षांपूर्वी प्लाटर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी घातली होती. गणेश मूर्तीकारांच्या मागणीनंतर ती शिथिल करण्यात आली. यावर्षी त्याबद्दल स्पष्ट निर्देश नसल्याने पेणच्या मूर्तीकारांनी प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडुच्या मातीच्या मूर्ती बनविल्या. पण यंदाच्या निर्बंधामुळे ग्राहक मिळत नाहीत. परिणामी मातीच्या लाखो मूर्ती तशाच पडून आहेत. यामुळे किती लाखांचे नुकसान झाले असावे, त्याची कल्पना येते.

कोकण आणि मुंबईसह पुणे, नागपूर, कोल्हापूर या मोठ्या शहरांमध्ये गणेशोत्सवाचा थाट मोठा असतो. पण यंदा त्यांचेही अतोनात नुकसान झाले आहे.