लागोपाठ चित्रपट फ्लॉप होऊनही या सुपरस्टार्सच्य...

लागोपाठ चित्रपट फ्लॉप होऊनही या सुपरस्टार्सच्या मानधनात काहीच फरक पडलेला नाही… (Films of These Actors Going Flop One by One, Then Also There is no Reduction in their Fees)

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या आवडत्या कलाकारासाठी वेडे असणारे लोक अगदी फस्ट डे – फस्ट शो पाहायला जाणारेही असतात. परंतु मागील काही काळात या सुपरस्टार्सचे चित्रपट फारसे लोकांना आवडलेले नाहीत. २०२२ हे वर्ष अर्धं सरलं तरी बॉलिवूडचा एकही सुपरस्टार बॉक्स ऑफिसवर आपलं यश सिद्ध करू शकलेला नाही. मात्र सिनेसृष्टीतील या जुन्या तसेच आधीच आपलं स्थान घट्टपणे रोवून असलेल्या कलाकारांच्या तुलनेत नवीन कलाकारांनी मागून येऊन बाजी मारलेली दिसली. सांगायचं काय तर, या सुपरस्टार कलाकारांचे चित्रपट लागोपाठ फ्लॉप ठरत असले तरी त्यांनी आपल्या कामाच्या किंमतीत अर्थात मानधनात मात्र कपात केलेली नाही. ती आहे तशीच आहे.

अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचे एक दोन नाही तर चक्क तीन चित्रपट लागोपाठ बॉक्स ऑफिसवर आपटले. त्याचे ‘बेल बॉटम’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘सम्राट पृथ्वीराज’ हे चित्रपट लागोपाठ फ्लॉप ठरले पण तरीही त्याच्याकडे बरीच नवीन कामं आहेत शिवाय त्याच्या फीमध्येही कोणतीही कपात झालेली नाही. लवकरच तो ‘राम सेतु’, ‘ओएमजी 2’, ‘रक्षा बंधन’, ‘डबल एक्सएल’ आणि ‘सेल्फी’ यांसारख्या चित्रपटांत दिसणार आहे. अक्षय एका चित्रपटासाठी १४० कोटी रुपये फी घेतो.

सलमान खान

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान लाखों-करोडोंच्या गळ्यातला ताईत आहे. परंतु त्याचे ‘राधे’ आणि ‘अंतिम’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले अन्‌ सपशेल फसले. प्रेक्षकांना ते मुळीच आवडले नाहीत, परंतु सल्लू मिय्याचे मानधन काही कमी झाले नाही. सध्या तो ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाची शूटिंग करत आहे आणि लवकरच ‘टाइगर 3’ या चित्रपटात दिसणार आहे. सलमान एका चित्रपटासाठी १२५ कोटी घेतो.

शाहरुख खान

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची परिस्थिती काही वेगळी नाही. तसं पाहिलं तर २०१८ पासून तो रुपरी पडद्यावरून गायबच झालेला आहे. लवकरच तो ‘पठान’, ‘जवान’ आणि ‘धुनकी’ सारख्या चित्रपटात दिसणार आहे. हे चित्रपट पुढल्या वर्षी प्रदर्शित होणार आहेत. सांगायचं काय तर इतक्या गॅपनंतरही त्याच्या मान आणि धन या दोन्हीमध्ये काहीच कमतरता आलेली नाही. शाहरुख एका चित्रपटासाठी १०० कोटी रुपये घेतो.

प्रभास

दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार प्रभासच्या ‘बाहुबली’ने बॉक्स ऑफिसवर कमाल केली, परंतु त्यानंतर प्रदर्शित झालेले ‘साहो’ आणि ‘राधे श्याम’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच आदळले. तरीही या सुपरस्टारचे फॅन फॉलोइंग कमी झाले नाहीत की त्याची फी कमी झालेली नाही. प्रभास एका चित्रपटासाठी फक्त दीड कोटी मानधन घेतो. लवकरच तो ‘आदिपुरुष’, ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘सालार’ या चित्रपटांत दिसेल.

थलापति विजय

दाक्षिणात्य चित्रपटांतील दुसरा एक सुपरस्टार थलापति विजयचा ‘बीस्ट’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला होता, परंतु हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. खरंतर विजयला या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या परंतु चित्रपट अपयशी ठरला. तरीही विजयची लोकप्रियता कायम आहे. आणि फ्लॉप चित्रपट देऊनही हा हिरो एका चित्रपटासाठी १०० कोटी घेतो. लवकरच तो ‘वरिसु’ चित्रपटात दिसेल.