फायब्रोम्याल्जिया : तरुणींमध्ये आढळणारा विचित्र...
फायब्रोम्याल्जिया : तरुणींमध्ये आढळणारा विचित्र नावाचा आजार (Fibromyalgia: Preventive Measures To Fight Against The Disease; Mostly Found In Young Ladies)

डोके, खांदे, हाताचे कोपर, पाय, छाती आणि सांधे दुखणे, सतत थकवा व आळस येणे; अशी काही लक्षणे अलिकडे काही लोकांमध्ये आढळून येत आहेत. त्यातही डोकेदुखी व सांधेदुखी यांचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. ही लक्षणे फायब्रोम्याल्जिया या नवीन रोगाची आहेत. ही माहिती मुंबई सेंट्रल येथील वोखार्ड हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या संधीवात चिकित्सक डॉ. दीप्ती पटेल यांनी दिली आहे.

या संदर्भात अधिक निरीक्षणे नोंदवताना त्यांनी सांगितले आहे की, कोविड झाल्यानंतर जे इन्फेक्शन उरते, त्या पेशंटपैकी ३० टक्के पेशंटस्ना ह्या रोगाची लक्षणे आढळून आली आहेत. आठवड्याला ७-८ पेशंट येतच आहेत. हा दुर्धर असा मज्जारज्जूंवर परिणाम करणारा संधीवातचा रोग आहे. तसं पाहिलं तर संधीवाताशी मिळतेजुळते हे दुखणे कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकते. पण सध्या मात्र आम्हाला तरुण वर्गात हा रोग पसरलेला दिसतो आहे. त्यात पुन्हा महिलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तरुणींनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.

सध्याच्या स्पर्धेच्या युगात तरुण वर्ग राब राब राबताना आढळतो. घरातून काम चालू असले तरी ते जास्त प्रमाणात करावे लागत आहे. जे ऑफिसात जातात, त्यांना जास्त तास काम पडते. अपुरी झोप, व्हॉटस् अँप किंवा चॅटींग आणि व्हिडिओ गेम्सच्या नादापायी मनास थकवा येतो. शिवाय धकाधकीची जीवनशैली व मानसिक ताणतणाव या कारणांनी हा रोग अंगात शिरतो. वेदना देतो.
यावर उपचार आहेतच. पण ते औषधोपचाराबरोबरच औषधाविना केलेले उपचार आहेत. मज्जातंतूच्या वेदना कमी करण्यासाठी औषधे दिली जातात. पण मानसोपचार पद्धत देखील गरजेची आहे. त्यामध्ये असे सांगता येईल की, ताणतणावाला थारा देऊ नका, दररोज व्यवस्थित झोप घ्या. खूप थकवा येईल, इतके शारीरिक व मानसिक श्रम करू नका. या रोगावर कुरघोडी करण्यासाठी सेल्फ केअर अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय स्ट्रेचिंग, स्वीमिंग, पायी चालणे, योगा करणे हे व्यायाम करणे आवश्यक आहेत. तरच तुम्ही होणारा त्रास वाचवू शकाल.
