उभी राहिली गुढी, नव वर्षाच्या स्वागताची (Festiv...

उभी राहिली गुढी, नव वर्षाच्या स्वागताची (Festival To Celebrate Marathi New Year)

महाराष्ट्रीयन लोकांसाठी गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. या नववर्षाची सुरुवात गुढ्या, तोरणांच्या मंगल प्रतीकांनी केली जाते. याच दिवशी प्रजापतीने विश्वाची निर्मिती केली होती. म्हणून गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो.
चैत्र महिन्याची सुरुवात ज्या दिवशी होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. याच दिवशी प्रजापतीने विश्वाची निर्मिती केली होती. म्हणूनच विश्व निर्माता ब्रह्मदेवाची पूजा म्हणजे गुढीची पूजा! महाराष्ट्रामध्ये साजरा होणारा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. शालिवाहन शकाची सुरुवात याच दिवसापासून होते.

गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. श्रीरामांनी याच दिवशी वालीच्या त्रासातून प्रजेला मुक्त केले होते. तेव्हा प्रजेने हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी घरोघरी गुढ्या उभारल्या होत्या आणि त्यामुळे या दिवसाला गुढीपाडवा असे म्हणण्यात आले. तर इतिहासात श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला, त्याचे प्रतीक म्हणून लोकांनी आनंदाने घराबाहेर गुढ्या उभारल्या, असं सांगितलं आहे. तसंच चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून श्रीराम परत आले आणि त्यांचा राज्याभिषेक झाला तो दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो असेही मानले जाते. कथा अनेक असल्या तरीही गुढीपाडवा हा विजयोत्सव म्हणून साजरा केला जातो, एवढं निश्चित.
गुढी उभारणे म्हणजे विजयपताका फडकवणे. गुढी उभारण्याची प्रथा फार प्राचीन आहे. महाराष्ट्रीयन लोकांसाठी गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात आहे. हा दिवस मराठी माणसांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. नववर्षाची सुरुवात गुढ्या, तोरणांच्या मंगल प्रतीकांनी केली जाते. चैत्र महिन्यामध्ये एक नवीन चैतन्य फुललेले असते. प्राणी, पक्षी, सृष्टी हे नवीन चैतन्याने बहरलेले असतात. वृक्षांना नवीन पालवी फुटलेली असते. त्यामुळे हा निर्मितीचा सण मानला जातो.

गुढी उभारण्यासाठी आपण कलश, फुलांचा हार, साखरेच्या गाठी, चाफ्याची फुले, नवीन वस्त्र, बांबूची किंवा वेळूची काठी आणि कडुनिंब वापरतो. या सगळ्या गोष्टी वापरण्यामागे शास्त्रीय आधार आहे. गुढीसाठी वेळू वा बांबूची काठी वापरतात. कारण वेळू कधीही नाश पावत नाही. शिवाय वेळू किंवा बांबूचे झाड इतर झाडांच्या तुलनेत चार पट कार्बनडायऑक्साइड शोषून घेते आणि चारपट प्राणवायू जगाला प्रदान करते.  त्या काठीला कोमट पाण्याने स्वच्छ धुतले जाते. नंतर काठीला चंदनाचा लेप आणि हळद कुंकू लावले जाते. काठीला वरील बाजूस नवीन वस्त्र, चाफ्याच्या फुलांचा हार आणि साखरेच्या गाठींची माळ लावली जाते. हे बत्तासे उन्हाळ्यात औषधी असतात.

दारासमोर रांगोळी घातलेल्या जागी सूर्योदयाच्या वेळी गुढीची स्थापना करावी. गुढी हे शरीराच्या सुषुम्ना नाडीचे प्रतीक आहे. म्हणून ती घराच्या प्रवेशद्वाराशी उभी करतात. पूजेनंतर आरोग्य, संपत्ती व संततीची भरभराट व्हावी अशी प्रार्थना करून गूळ, धणे, जिरे आणि कडुनिंबाचा पाला एकत्र करून त्याची चटणी प्रसाद म्हणून खाल्ली जाते. या पदार्थांमुळे आपल्याला उत्तम आरोग्य लाभते. बुद्धी तेजस्वी होते. या दिवशी घरोघरी पुरणपोळ्या किंवा अन्य गोडधोड केले जाते.

 संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी गुढीवर अक्षता टाकून ती व्यवस्थित उतरवली जाते. गुढीपाडव्याचे निमित्त साधून लोक आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी मिरवणुका काढतात. त्या मिरवणुकांमध्ये लहान मुले, मोठी माणसे आपले पारंपरिक वस्त्र परिधान करून कला दर्शन करतात.

सध्या आपल्या सर्वांच्या डोक्यावर करोनाचं संकट घोंघावत आहे. परंतु लसीकरणामुळे याही संकटातून आपण लवकरच बाहेर येऊ आणि करोनासारख्या आजारावर विजय मिळवू.