आनंद आणि उत्साहाचा सण (Festival Of Joy And Zeal)

आनंद आणि उत्साहाचा सण (Festival Of Joy And Zeal)

होळी वसंत ऋतुमध्ये साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा भारतीय आणि नेपाळी लोकांचा सण आहे. आपल्याकडे वर्षातील 12 महिन्यांमध्ये 12 पौर्णिमा येतात. या सर्वच पौर्णिमा महत्त्वाच्या आहेत. जशी चैत्रपौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती. श्रावणातली राखीपौर्णिमा, अश्‍विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा. तशी फाल्गुनातील पौर्णिमा ही होळीपौर्णिमा. ह्यालाच होलिका किंवा हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतात.
होळीचा सण आनंद आणि उत्साह घेऊन येतो. भारतात प्रत्येक प्रांतात निरनिराळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात होळीचा सण शिमगा या नावाने प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच शिमग्यालाही कोकणात उत्साहाचं वातावरण असतं. महाराष्ट्रात फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत दोन ते पाच दिवस होळी साजरी करण्यात येते. या दिवशी घराघरांतून अंगणात पाच गोवर्‍यांची होळी करतात. दुपारी जेवणाच्या आधी तिची पूजा करतात. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात. होळीला प्रदक्षिणा घालतात. मग संध्याकाळी मोकळ्या जागेवर होळी तयार करतात. मानकरी होळी पेटवतो आणि सगळे आनंद घेतात. संपूर्ण भारतात या सणाला होलिका दहन केलं जातं. मात्र प्रत्येक प्रांतातील होलिकेची रचना निरनिराळ्या पद्धतीने केली जाते. महाराष्ट्रात काही ठिकाणी होळीच्या आदल्या दिवशी बारा वाजता तर काही ठिकाणी पहाटे होलिका दहन केलं जातं.

यासाठी घरोघरी छोटी अथवा सार्वजनिक ठिकाणी लहान मोठ्या होलिका उभारल्या जातात. गावकरी एकत्र येऊन प्रार्थना, मंत्रोच्चारात होलिकेचं दहन करतात. कोकणात होलिका दहन केल्यावर बोंब मारण्याची प्रथा आहे. होळीत नारळ अर्पण करून तिला नैवेद्य दिला जातो. हा नैवेद्य खाण्यासाठी काही तरबेज गावकरी जळत्या होलिकेत हात घालून तो नारळ काढतात.
अग्निदेवतेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होलिका दहन केलं जातं. वसंत ऋतूच्या आगमनामुळे या काळात वातावरणात थंडावा निर्माण झालेला असतो. होलिका दहन केल्यामुळे वातावरणाचा समतोल राखण्यास मदत होते.

होलिका दहन केल्यानंतर पुढील पाच दिवस महाराष्ट्रात धुळवड अथवा रंगपंचमी साजरी केली जाते. एकमेकांना गुलाल अथवा विविध रंग लावून आणि पाण्याने रंगपंचमी खेळली जाते. यामागे सर्वांनी एकत्र येणे हे उद्दिष्ट असते. रंग हे आनंद आणि उत्साहाचं प्रतीक असतात. म्हणून या रंगाची उधळण करून हा सण साजरा केला जातो.
काही ठिकाणी होळीला भांग प्यायली जाते. भांग एकमेकांना देऊन त्यांची मजा घेणं हा या मागचा उद्दिष्ट असतो. भांग पिऊन नशेत मदमस्त होऊन एकमेकांची चूकभूल माफ करून होळी खेळली जाते. हा केवळ एक मनोरंजनाचा भाग असतो.

होळीच्या दिवशी घरी पुरणपोळी आणि कटाची आमटी केली जाते. ह्या भारत देशात प्रांतोप्रांती सणाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट जेवण केले जाते.

होळीला घ्यावयाची काळजी –
दरवर्षी येणार्‍या या सणासाठी कोणती काळजी घ्यावी हे आपण सांगतच असतो. परंतु या वेळेस करोनाचं संकट डोक्यावर घोंगावत असल्याने सार्वजनिकरीत्या साजर्‍या केल्या जाणार्‍या या सणाला विशेष काळजी घ्यावयास हवी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मोठ्या संख्येने एकत्र येऊन हा सण साजरा करू नये.
. होळी हा रंगांचा सण आहे परंतु सावधानता पाळणे अधिक गरजेचे आहे. कारण आजकाल भेसळयुक्त रंगामुळे खूप नुकसान होऊ शकते. तेव्हा शक्यतो गुलालाने तसेच नैसर्गिक रंगाने होळी खेळणे जास्त सोयीस्कर आहे.
. आजकाल भांग मध्ये देखील अन्य नशिले पदार्थ मिसळले जातात. त्यामुळे अशा पदार्थापासून सावध राहणे गरजेचे आहे. अर्थात भांग न पिणेच उत्तम.
. चुकीच्या रंगामुळे डोळ्यांना हानी पोहचू शकते, त्यामुळे रसायन मिसळलेले रंग वापरू नये.
. घराबाहेर बनवलेली कोणतीही वस्तू खाण्याअगोदर विचार करावा. शक्यतो खाऊच नका.
. सावधानतेने एकमेकांना रंग लावा. कोणाची इच्छा नसेल तर उगाच जबरदस्ती रंग लावू नये.
. होळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे आणि तो तसाच साजरा करावा.