गोडवा श्रीखंडाचा (Favourite...

गोडवा श्रीखंडाचा (Favourite Dish Of Gudhi Padwa)

गुढीपाडव्याच्या सणाशी जोडला गेलेला गोड पदार्थ म्हणजे श्रीखंड. मात्र असं हे खास गुढीपाडव्याचा आनंद साजरा करण्यासाठी खाल्लं गेलेलं श्रीखंड अनेकांना बाधतं. श्रीखंड खाल्ल्यामुळे कफाचे विकार बळावले, अशी अनेक जण तक्रार करताना दिसतात.
वातावरणातला गारवा हळूहळू कमी होत जाऊन उष्णता वाढू लागली की, चाहूल लागते ती होळी, गुढीपाडव्याच्या सणाची. आणि सण-समारंभ म्हटलं की, गोडाधोडाचं जेवण आलंच. मग तो होळीच्या निमित्ताने पुरणपोळीचा बेत असो की गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्रीखंड-पुरीचा! अर्थात, गुढीपाडव्याच्या सणाशी जोडला गेलेला गोड पदार्थ म्हणजे श्रीखंड. मात्र असं हे खास गुढीपाडव्याचा आनंद साजरा करण्यासाठी खाल्लं गेलेलं श्रीखंड अनेकांना बाधतं. श्रीखंड खाल्ल्यामुळे कफाचे विकार बळावले, अशी अनेक जण तक्रार करताना दिसतात. हे टाळण्यासाठी आयुर्वेदात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे.
दह्यापासून तयार केलेल्या चक्क्याचा आंबटपणा आणि साखरेचा गोडवा समप्रमाणात एकत्र केला की, झालं श्रीखंड तयार! आपल्याला तरी श्रीखंड तयार करण्याची हीच कृती माहीत आहे. मात्र आयुर्वेद शास्त्रात सांगण्यात आलेल्या श्रीखंडाच्या पाककृतीनुसार ही कृती अर्धवट आहे. यामध्ये अजून दोन अतिशय महत्त्वाच्या घटकांचा समावेश करणं गरजेचं आहे. या घटकांशिवाय परिपूर्ण श्रीखंड तयारच होऊ शकत नाही,
असं आयुर्वेद सांगतं. आणि हे दोन घटक आहेत, साजूक तूप आणि मध!
साजूक तूप आणि मध या घटकांच्या अभावीच बरेचदा केवळ चक्का आणि साखरेपासून तयार केलेलं श्रीखंड बाधतं. तेव्हा यंदा घरी श्रीखंड तयार करत असाल किंवा बाजारातून आणलेलं तयार श्रीखंड ताटात घेत असाल, ते खाण्यापूर्वी त्यात थोडं साजूक तूप आणि मध एकत्र करायला विसरू नका. अर्थात, साधारणतः 4 चमचे श्रीखंडात 3 चमचे तूप आणि 2 चमचे मध चांगलं एकजीव करून घेता येईल. त्यात मग स्वादानुसार वेलची पूड, दालचिनी पूड किंवा जायफळ पूडही एकत्र करता येईल. असं हे तूप आणि मध मिश्रित श्रीखंड सहसा बाधत नाही. किंबहुना ते चांगलं पचतंही. तेव्हा यंदा गुढीपाडवा साजरा करताना हे नक्की लक्षात ठेवा.