‘आपल्याकडे अजूनही मुलगी झाल्यावर वडील काही दिवस...

‘आपल्याकडे अजूनही मुलगी झाल्यावर वडील काही दिवस तिचे तोंड पाहत नाहीत’, गायक व संगीतकार शंकर महादेवन यांची खंत [Father Don’t See The Face Of His Girl Child On Her Birth : Singer & Composer Shankar Mahadevan Criticises Bad Practice Of Our Society ]

पूर्वी घरात मुलगी जन्माला आली की घरातल्यांच्या कपाळी आठ्या पडायच्या. समाजात महिलांना दुय्यम स्थान होते पण काळानुसार सर्व काही बदलले असून महिलादेखील आता पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन कार्यरत असतात हे आपल्या ठाऊक आहे. असे असले तरी समाजात पूर्णपणे बदल झालेला नाही. बाहेर कितीही देवींचे उत्सव साजरे केले, आपल्या  भारत देशाला भारत मातेची उपमा दिली, बाहेर स्त्रियांचे मानसन्मान केले तरी काही घरात मुलगी जन्माला आली की तिचा जन्मदाताच काही दिवस तिचे तोंड पाहत नाही. अशी खंत सुप्रसिद्ध गायक पद्मश्री शंकर महादेवन यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याला निमित्त होते ते पुस्तक प्रकाशनाचे.

सिंगापूरमध्ये राहणाऱ्या पण मुळच्या भारतीय असलेल्या लेखिका माया महेश यांच्या ‘पद्मा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा वांद्रे येथे पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशन गायक आणि संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी शंकर महादेवन यांनी त्यांचे तारे जमीन पर या चित्रपटातील मॉंं हे गाणे गायले.

पद्मा या पुस्तकात लेखिकेने पूर्वीच्या काळातील स्त्रियांना व आताच्या आधुनिक काळातील स्त्रियांना सामोरे जाणाऱ्या संघर्षांना संबोधित करणारी तिची नवीनतम काल्पनिक कथा मांडली आहे. स्त्रीच्या जीवनाचे मूल्य अनेकदा तिच्या पुनरुत्पादक क्षमतेशी समतुल्य केले गेले आहे तर बाळंतपणाच्या प्रक्रियेत येणाऱ्या आव्हानांच्या संख्येकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच स्त्रियांना त्यांच्या बाळंतपणावेळी जी आव्हाने येतात ती आपल्याकडे दुर्लक्षित केली जातात त्यामुळे कठीण गर्भधारणा, गर्भपात आणि वंध्यत्व याच्या आसपासच्या कथा खूपच क्वचित आढळतात. पण विषयाची चौकट मोडून माला महेश यांनी पद्मा या पुस्तकात एकाच समस्यांशी झगडणाऱ्या वेगवेगळ्या काळातील दोन अतुलनीय स्त्रियांची कथा मांडून वेगळ्या विषयाकडे लक्ष वेधले आहे. पुस्तकात १९००च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात केरळमधील एका छोट्या गावात राहणाऱ्या पद्मा आणि आजचे धावते शहर असणाऱ्या मुंबईतील नयना अशा दोन उदाहरणांवर आधारित १०० वर्षांहून अधिक कालावधीमधील ही कथा आहे.

या पुस्तकाबद्दल माया म्हणाल्या की, माझ्या आजीने मला वंध्यत्वाच्या मुद्यावर काही सत्य घटना सांगितल्या. त्या काळापासून आत्तापर्यंत, स्त्रीचे मूल्य त्यांच्या मुले जन्माला घालण्याच्या क्षमतेवर मोजले जाते. त्यांच्या नियंत्रणाबाहेरील गोष्टीबद्दल त्यांना दोष देण्यात येतो. जोडप्यामधील समस्या या पुरुषामुळे पण असू शकते, परंतु ते हे सत्य स्वीकारले जात नाही. मला असे वाटले की या स्थितीसाठी स्त्रियांना दोष देणे चुकीचे आहे. ही परिस्थिती स्त्रीच्या भावना, मानसिकता आणि कुटुंबावर कसा परिणाम करू शकते यावरच आधारित ही कथा आहे