आठवणी दाटतात… गानसरस्वती लता मंगेशकर यांचा आज व...

आठवणी दाटतात… गानसरस्वती लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस (Fans Remember Lata Mangeshkar On Her Birthday)

गानसरस्वती लतादीदी मंगेशकर यांचा आज वाढदिवस. त्यांचे करोडो चाहते, त्यांच्या स्मृती आज जागवत आहेत. त्यांच्या आठवणींनी व्याकुळ झाले आहेत. या जगातून लतादीदी देहाने गेल्या असल्या तरी त्यांच्या हजारो गाण्यांनी त्या अमर झाल्या आहेत.

आपल्या ७० वर्षांच्या कारकिर्दीत हजारो सुश्राव्य गाणी गाऊन लतादीदींनी विश्वविक्रम केला आहे. तसेच केवळ हिंदी-मराठी नव्हे तर जगातील ३६ भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. असा पराक्रम अन्य कोणत्याही गायकाने केलेला नाही. डच, रशियन, इंग्लिश, सिंहली अशा जगातील इतर भाषेतील गाणी त्या गायल्या आहेत.

असं म्हणतात की, लतादीदी बालपणी फक्त एकच दिवस शाळेत गेल्या होत्या. पण त्यांनी अनेक भाषा व गायनकळा मनापासून आत्मसात केल्या. हिंदी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, तमिळ या भाषा त्यांनी वेगवेगळ्या शिक्षकांकडून शिकून घेतल्या होत्या. भाषा कोणतीही असो, त्या गाण्याचे शब्दोच्चार व्यवस्थित असावेत, इकडे त्यांचा कटाक्ष असायचा. हिंदी चित्रसृष्टीतील जवळपास सर्वच संगीत दिग्दर्शकांची गाणी त्यांनी गायली. आनंदघन या नावाने त्यांनी निवडक मराठी चित्रपटांना संगीत दिले होते. सुप्रसिद्ध ख्याल गायक बडे गुलाम अली खान यांनी लताबद्दल असे उद्‌गार काढले होते की, कम्बख्त बेसुरी ही नही होती.