नवाजुद्दीन सिद्दीकीचा वेगळा लूक पाहून चाहत्यांन...

नवाजुद्दीन सिद्दीकीचा वेगळा लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का (Fans Are Stunned With Nawazuddin Siddiqui’s New Look)

बॉलिवूडमध्ये नवनवीन कलाकारांची भर होत असते. पण काही कलाकार असे असतात जे कमी चित्रपट करुन देखील प्रेक्षकांच्या मनात जागा तयार करतात. त्यातील एक म्हणजे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी. तो त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो.गँग्स ऑफ वासेपूर, बदलापूर, रमण राघव यांसारख्या चित्रपटातून त्याने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. नवाजुद्दीनच्या चाहत्यांसाठी एक खुश खबर आहे.

ती म्हणजे तो लवकरच आपल्याला नव्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. नुकतीच त्याच्या हड्डी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटातील त्याचा लूक पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

नवाजुद्दीनच्या हड्डी या चित्रपटाचे मोशन पोस्टर झी स्टुडिओद्वारे प्रदर्शित करण्यात आले. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होईल. या पोस्टरमध्ये नवाज स्त्री वेषात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पोस्टर पाहताच क्षणी तो नवाज असल्याचे प्रथमदर्शनी कोणालाच पटत नाही.

पोस्टरमध्ये नवाजचे हात रक्ताने माखलेले दिसत आहेत. तसेच त्याच्या हातात धारदार शस्त्र देखील आहे. पोस्टरवरील नवाजचा लूक पाहून चित्रपटात काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

अनेकांकडून नवाजचे कौतुक होत असताना काहीजण मात्र सोशल मीडियावर नवाजच्या पोस्टवरील लूकची खिल्ली उडवत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘मला पोस्टर पाहून अर्चना पुरण सिंग वाटली’ तर एकाने लिहले आहे की, ‘ही अर्चना पूरण सिंगसारखी दिसत नाही का’? तर दुसर्‍याने लिहिले की ‘कदाचित तुम्ही अर्चना पूरण सिंगला टॅग करायला विसरलात.’तर आणखी एकाने लिहिले की, मेकअपवर एवढा खर्च करण्यापेक्षा सरळ अर्चना पूरण सिंहलाच कास्ट करायचे होते.