बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध मेहुणा – मेहुणी जो...

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध मेहुणा – मेहुणी जोड्या (Famous Jija – Sali Jodi Of Bollywood)

चित्रउद्योगात नट-नट्यांची मुले येतात आणि त्यांची चर्चा होते. पण याच क्षेत्रात मेहुणा-मेहुणी अर्थात्‌ जिजा-साली अशाही काही जोड्या प्रसिद्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांची जवळीक मायेची आहे.

करिश्मा कपूर – सैफ अली खान

छोटे नवाब सैफ अली खान आणि त्याची मेहुणी करिश्मा कपूर यांच्यामध्ये चांगले बॉन्डिंग आहे. ही जोडी समारंभ-पार्ट्यांमध्ये दिसते. करिना कपूरचा हा नवरा सैफ अली खान, आपल्या बेगमप्रमाणेच सालीची पण ख्यालीखुशाली विचारतो. आणि करिश्मा पण त्याची, आपल्या बहिणीइतकीच विचारपूस करते. सैफ अलीने, आपल्या लग्नात, करिश्मा कपूर या मेहुणीला छानसे ईअररिंग्ज भेटीदाखल दिले होते. सोशल मीडियावर करिना-करिश्मा आणि सैफ यांचे एकत्र असलेले फोटो झळकत असतात. त्यामधून त्यांची जवळीक दिसून येते. सैफ आणि करिश्माने ‘हम साथ साथ है’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

परिणिती चोप्रा – निक जोनास

प्रियंका चोप्राचा परदेशी नवरा निक जोनास व मेहुणी परिणिती चोप्रा यांच्यातही असेच चांगले बॉन्डिंग आहे. परिणिती ही प्रियंकाची चुलत बहीण आहे. तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, निक हा माझ्या बहिणीचा, प्रियंकाचा परफेक्ट पती आणि माझा खूप चांगला जिजू आहे. निकची वागणूक खूपच मनमोकळेपणाची आहे, अन्‌ सर्व कुटुंबियांमध्ये तो छान मिसळतो.

शमिता शेट्टी – राज कुंद्रा

शिल्पा शेट्टीचा नवरा, राज कुंद्रा याचे आपली मेहुणी शमिता शेट्टी हिच्याशी खूप चांगले बॉन्डिंग आहे. मेहुणा-मेहुणीची ही जोडी बरेचदा एकत्र दिसते. काही दिवसांपूर्वी शमिता शेट्टी एका पंजाबी म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती तो व्हिडिओ राज कुंद्राने दिग्दर्शित केला होता. त्यावर शमिताने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, या व्हिडिओच्या दिग्दर्शनाच्या निमित्ताने माझ्या लक्षात आलं की, माझ्या या जिजूच्या अंगी खूप सारे कलागुण आहेत. शिल्पा – राज – शमिता हे प्रमाने वागतात आणि पार्टी-समारंभात एकत्र दिसतात.

तनीशा मुखर्जी – अजय देवगण

अजय देवगणची मेहुणी म्हणजे काजोलची बहीण तनीशा मुखर्जी यांचे एकमेकांशी चांगले बॉन्डिंग आहे. ‘टॅन्गो चार्ली’ या चित्रपटात अजय आणि तनीशा यांनी एकत्र काम केले होते. तनीशा आपला मेहुणा अजय देवगणला ‘जय’ अशी हाक मारते. तनीशा आपल्या या जय जिजूची चाहती आहे. काजोल आणि अजयसोबत ती सणसमारंभात आणि सोशल मीडियावर प्रकट होत असते.