आइस्क्रीम प्रेमींचे चोचले! (Experiments Of Pass...

आइस्क्रीम प्रेमींचे चोचले! (Experiments Of Passionate Ice Cream Loves)

आइस्क्रीम पुढ्यात आलं की नको, आता नको अशी कोणतीच कारणं द्यावीशी वाटण्याआधी जिभेनं आपलं काम केलेलं असतं. आइस्क्रीमच्या प्रेमात असणार्‍या व्यक्तींना आइस्क्रीम चापताना काळ-वेळ, थंडी, पाऊस असं काहीही दिसत नाही. आणि त्यात उन्हाळा असला, तर आयतं निमित्तच मिळतं!

बिघडलेला मूड पुन्हा येण्यासाठी, मन शांत राहावं म्हणून, शारीरिक थकवा घालवण्यासाठी, हाडांचं पोषण व्हावं म्हणून आणि सर्वात महत्त्वाचं जिभेचे चोचले… अशा कोणत्याही कारणानं आइस्क्रीम जगभर चापलं जातं. पण कोणताही ऋतू असो, काहीही निमित्त असो किंवा नसो निव्वळ आनंदासाठी आइस्क्रीम खाणारेही काही कमी नाहीत!

सब को आइस्क्रीम पसंत है
असे सांगतात ब्रिटनचा राजा चार्ल्स-2 याने 1671 सालामध्ये प्रथम आइस्क्रीम खाल्लं आणि या पदार्थाच्या तो प्रेमातच पडला. त्याचं आइस्क्रीम प्रेम इतकं वाढलं की, त्याच्या शेफनं आइस्क्रीमची रेसिपी कुणालाही देऊ नये म्हणून चार्ल्स दुसरा यानं शेफला आजीवन पेन्शन दिलं.
जगज्जेता सिकंदर आइस्क्रीमप्रेमी होता. तो मध आणि फुलांची विविध सरबतं यापासून बनवलेलं आइस्क्रीम खात असे.
चिनी राजा तेंग दुधाचं आइस्क्रीम खात असे.
मार्को पोलो या जग प्रवाशाने युरोपमध्ये 1254-1324 पूर्व आइस्क्रीमची रेसिपी पोहोचवली.
फ्रान्सचा राजा हेन्री दोन याने इटलीच्या राजकुमारीशी विवाह केला, तेव्हा ती माहेराहून आइस्क्रीम बनविणारा शेफ सोबत घेऊन आली होती.
गुजरातमध्ये जेवणानंतर स्वीट डिश म्हणून आइस्क्रीम खाण्याची प्रथा प्रचलित आहे.
बिल क्लिटंन जेव्हा भारतात आले होते तेव्हा त्यांनी आंबा स्वादाचं हॅवमोर कंपनीचं आइस्क्रीम खाल्लं होतं आणि त्यांना ते खूपच आवडलं होतं.
शिल्पा शेट्टीनं हाँगकाँग मध्ये आइस्क्रीमचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात ती गोल्ड प्लेटेड आइस्क्रीम खाताना दिसली होती. हे आइस्क्रीम भारतात मुंबई, हैद्राबाद आणि अहमदाबाद मध्ये मिळते. त्यात 24 कॅरेट गोल्डचा वर्ख लावलेला असतो आणि हे आइस्क्रीम 17 पदार्थापासून बनविलं जातं. या आइस्क्रीमच्या एका कपची किंमत 1 हजारापासून आहे.
अमेरिकेचे तिसरे राष्ट्रपती थॉमस जेफरसन यांनी हाताने लिहिलेली व्हॅनिला आइस्क्रीमची कृती आजही काँग्रेस लायब्ररीत जपून ठेवली गेली आहे.

आइस्क्रीमविषयी आइस्क्रीमसारखंच रुचकर…
बोस्टन, युनायटेड स्टेट्समध्ये 1851 मध्ये सर्वप्रथम आइस्क्रीमचं औद्योगिक उत्पादन सुरू झालं.
सेंट लुईसमधील जागतिक मेळाव्यात 1904 रोजी आइस्क्रीम कोन आविष्कृत केला गेला.
जुलै महिना हा अमेरिकेमध्ये ‘नॅशनल आइस्क्रीम मन्थ’ मानला जातो.
आइस्क्रीमचा सर्वात लोकप्रिय स्वाद व्हॅनिला असून त्यानंतर चॉकलेट, स्ट्रॉबेरी, कुकीज अँड क्रीम आणि इतर स्वाद येतात.
एक कप व्हॅनिला आइस्क्रीममध्ये 273 कॅलरीज असतात.
1988 मध्ये कॅनडाच्या अल्बर्टा एडमंटन येथे सर्वात मोठी 24 टन वजनाची आइस्क्रीम सुंदी तयार केली गेली. तर सर्वात मोठ्या आइस्क्रीम केकचं वजन 12.096 पौंड होते.

आपल्याकडे पुण्याला सदाशिव पेठेत ‘किगा’ नावाचं एक अनोखं आइस्क्रीम पार्लर उघडण्यात आलं आहे. येथे जेवणाच्या थाळीप्रमाणे ‘आइस्क्रीम थाळी’ मिळते. या थाळीत आठ ते दहा आइस्क्रीमचे प्रकार असतात. त्यात पुरणपोळी, उकडीचे मोदक, मस्तानी, गुलकंद, पाणीपुरी, मिसळ, बदाम इत्यादी अस्सल मराठमोळ्या पदार्थांच्या स्वादाचं आइस्क्रीम उपलब्ध आहे. पदार्थांचा तंतोतंत स्वाद आइस्क्रीममधून चाखताना आइस्क्रीमप्रेमींना वेड लावतो. ‘किगा’ची ठाण्यातही शाखा सुरू झाली आहे.
दिल्लीमध्ये डिसेंबर-जानेवारीत कडाक्याची थंडी असते. तरी कुडकुडणार्‍या थंडीत आइस्क्रीमचा आस्वाद घेण्याची तेथील लोकांची फॅशन आहे. दिल्लीच्या आइस्क्रीम प्रेमींना ते अजिबात बाधत नाही.
बाजारातील विश्‍लेषकांनी दिलेल्या पुष्टीनुसार, युद्ध आणि मंदीच्या काळात आइस्क्रीमच्या विक्रीत अनेकदा वाढ झालेली आहे.