काळ्या रंगावरून इशा गुप्ताला, लहानपणी नातेवाईका...

काळ्या रंगावरून इशा गुप्ताला, लहानपणी नातेवाईकांनी फारच हिणवलं होतं… ‘इंजेक्शन घेऊन गोरी हो’ – असा सल्ला देत होते… (Esha Gupta’s Shocking Revelations, Relatives Used To Call Her ‘Kali Maa’, Actress Has To Face Body Shaming In Industry, People Asked Her To Get Injection for Fare Skin)

आपल्या हॉट लूक्स वरून नेहमीच चर्चेत राहणारी, तसेच ‘आश्रम३’ या वेब सिरीजमधील बोल्ड दृश्यांनी लोकांच्या नजरेत भरणारी इशा गुप्ताला हे यश मिळविण्यासाठी फारच संघर्ष करावा लागला आहे. ती रंगाने काळी असल्याने लहानपणी लोकांनी तिची फारच निंदानालस्ती केली होती, असा खुलासा तिने स्वतःच एका मुलाखतीत केला आहे.

काळ्या रंगावरून लोकांनी तिला फारच हिणवले होते. “इतकं की, इंजेक्शन घे, अन्‌ आपला रंग उजळ, असे सल्ले मला दिले गेले होते. सततची ही टोचणी ऐकून मी या गोष्टीला तयार झाले. अन्‌ रंग उजळ करणाऱ्या .इंजेक्शनबाबत चौकशी केली. तेव्हा एक इंजेक्शन ९ हजार रुपयांचं आहे, असं कळलं. मी कोणाचं नाव घेत नाही, पण आपल्या फिल्म इंडस्ट्रीतील काही नट्यांनी हे इंजेक्शन टोचून घेतलं आहे.”

इशा गुप्ताने या मुलाखतीत असंही सांगितलं की, “करिअरच्या सुरुवातीला मला नाक धारदार करण्याचा देखील सल्ला दिला गेला होता. माझे नाक फारच गोल आहे, ते ऑपरेशन करून सरळ करण्याबाबत सांगितले गेले होते.”

बालपणीच्या आठवणी सांगत इशा बोलली, “लहानपणी माझा रंग एवढा काळा नव्हता. पण मी काही चुकीच्या गोळ्या घेतल्या. त्यामुळे मला हॉस्पिटलात दाखल करून ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागलं. त्यानंतर माझी त्वचा काळी पडली. मला चांगलं आठवतं की, माझे नातेवाईक ‘काली मां’ म्हणून मला हिणवत होते. तेव्हा मी खूप अपसेट होत असे. मात्र मी मॉडेलिंग क्षेत्रात आले तेव्हा या रंगानेच मला तारून नेले. कारण या क्षेत्रातील लोकांचा त्वचेच्या रंगाबाबतचा दृष्टीकोन फारच पुरोगामी आहे.”

अभिनेत्रीवर सुंदर दिसण्याचे फारच दडपण असते, असं इशा सांगते. “माझ्या मुलीने अजिबात अभिनेत्री होऊ नये. म्हणजे लहान वयातच सुंदर दिसण्याचं दडपण तिच्यावर राहणार नाही. या शो बिझ प्रोफेशनमध्ये जर तिला यायचं असेल तर ती आपलं स्वाभाविक जीवन जगू शकणार नाही. त्यामुळे तिनं नटी होऊच नये. त्यापेक्षा तिनं ॲथलीट व्हावं, असं मला वाटतं.”

‘जन्नत २’ मधून इमरान हाश्मीची नायिका मह्णून इशा गुप्ताने, चित्रसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘टोटल धमाल’ व ‘वन डे जस्टीस डिलीव्हर’ या चित्रपटात ती दिसली, पण नंतर मोठ्या पडद्यावरून गायब झाली. अन्‌ ‘आश्रम ३’ या वेब सिरीजमध्ये दिसली. या वेब सिरीजमध्ये इशाने बॉबी देओल सोबत बरेच इंटिमेट सीन्स दिले आणि चर्चेत राहिली आहे.