धबधबे, कि मृत्युचे सापळे? त्यात उतरण्याची जोखीम...

धबधबे, कि मृत्युचे सापळे? त्यात उतरण्याची जोखीम पत्करू नका! (Enjoy Waterfalls But Not At The Cost Of Your Life)

मध्यंतरी व्हाटसऍप वर एक व्हिडीओ फार व्हयरल झाला होता. एका धबधब्यावर सहलीसाठी गेलेले ६ जण त्यात मृत्युमुखी पडलेले दिसत होते. तो व्हिडीओ पाहताना अंगावर काटा आला होता. काळीज गलबलले होते, कारण त्या धबधब्यामध्ये हे ६ जण वाहून जाताना दिसले होते. अर्थात या महाभयंकर अपघातात त्यांचीच चूक आहे, हेही स्पष्ट दिसत होते. कारण धबधब्याच्या प्रवाहात ते उतरून एन्जॉय करत होते. अचानक धबधब्यातील पाण्याचा प्रवाह वाढला  अन ती दुर्दैवी माणसे त्यात वाहून गेली. मुळात धबधब्यातील पात्रात उतरण्याची जोखीम घेऊ नये, असाच संदेश या व्हिडीओने दिला आहे.

आता पासला सरत आला आहे या दिवसात सगळीकडे धबधबे ओथंबून वाहत आहेत.  या धबधब्यांवर सहल काढण्याचा मोह पर्यटकांना पडतो. धबधबे पाहण्यासाठी जावे, पण त्यात उतरणे धोक्याचे असते. हे अनेकदा सिद्ध झाले आहे.

नवी मुंबईत असलेल्या पांडवकडा या धबधब्यात असे अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे पोलिसांनी तिथे जाण्यास बंदी केली आहे. अशा  अनेक जागांवर पर्यटकांच्या जीवावर बेतले आहे. धबधब्यांचा प्रपात डोळ्याने पाहणे, त्याचा धो धो आवाज ऐकणे, त्याच्या कोसळणाऱ्या धारातून उडणारे पाण्याचे तुषार अंगावर झेलणे, यात मोठी मजा वाटते. ती अवश्य अनुभवा. पण त्यामध्ये उतरण्याचा धोका पत्करू नका कारण पाण्याची शक्ती अफाट असते. अनाकलनीय असते.

बेलगाम नजीकचा जोग फॉल्स हा धबधबा, कोकणातील मार्लेश्वरचा धबधबा, पावसाळ्यात माळशेज घाटात कोसळणारे असंख्य, प्रचंड धबधबे, इगतपुरीच्या घाटातील धबधबे यांचं दर्शन कमालीचं विलोभनीय, मन प्रसन्न करणारं असत. त्यांचे नेत्रसुख अवश्य घ्या पण त्याच्या कोसळणाऱ्या धाराचं शरीरसुख घेऊ नका!