पीपीएफ अकाऊंट उघडण्याचे फायदे (Enjoy The Benefi...

पीपीएफ अकाऊंट उघडण्याचे फायदे (Enjoy The Benefits Of PPF Account)


सर्वसाधारणपणे बँकेत पैसे साठवून ठेवणे, ही आपली बचतीची व्याख्या असते. पण इतर मार्गांनीही बचत करून पैसे साठविता येतात. त्यापैकी सर्वात सोपा आणि फायदेशीर मार्ग म्हणजे पीपीएफ – अर्थात् पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचे खाते उघडणे हा होय.


कितीही मिळाले तरी कमीच पडतात, ते म्हणजे पैसे. वाढती महागाई, आपले आणि मुलाबाळांचे वाढते खर्च यामुळे सतत पैशांची कमतरता भासते. त्यात पुन्हा आपल्याला भविष्याची काळजी असते. भविष्यात येणारे मुलांचे शिक्षण, लग्न समारंभ, आजारपण यावर होणार्‍या खर्चांसाठी पैशांची तरतूद करणे गरजेचे असते. त्यासाठी बचत करणे ही अत्यावश्यक बाब असते. सर्वसाधारणपणे बँकेत पैसे साठवून ठेवणे, ही आपली बचतीची व्याख्या असते. पण इतर मार्गांनीही बचत करून पैसे साठविता येतात. त्यापैकी सर्वात सोपा आणि फायदेशीर मार्ग म्हणजे पीपीएफ – अर्थात् पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचे खाते उघडणे हा होय. विशेषतः महिलावर्गाने तर या फंड-खात्याचा लाभ घेतला पाहिजे. कारण हे खाते उघडणे आणि चालवणे सोपे आहे नि भविष्यात येणार्‍या खर्चांची तोंडमिळवणी करण्यास सोयिस्कर आहे.

तेव्हा हा भविष्य निर्वाह निधी उघडण्यासाठी अटी व नियम काय आहेत, ते पाहूया.

अटी आणि नियम
कोणताही भारतीय नागरिक सदर अकाऊंट उघडू शकतो.
देशातील प्रमुख बँका आणि पोस्ट ऑफिसात हे अकाऊंट उघडण्याची सुविधा आहे.
पीपीएफ अकाऊंट अर्थात् पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही सरकारी बचत योजना असल्याने, त्यामध्ये आपण गुंतवलेले पैसे अत्यंत सुरक्षित असतात.
हे अकाऊंट उघडण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. लहान मुलांच्या नावे देखील हे खाते उघडता येते. बँकेतील खात्याप्रमाणेच त्यांचे पालक ते चालवू शकतात. सांभाळू शकतात.
किमान 500 रुपये टाकून हे खाते चालू करता येईल. आपल्या आर्थिक स्थितीनुसार ही रक्कम आपण कमी जास्त करु शकता.
दरमहा अशी विवक्षीत रक्कम या खात्यामध्ये गुंतवली जाऊ शकते. म्हणजे वर्षभरात 12 वेळा आपण या खात्यात रक्कम भरू शकता.
प्रत्येक वर्षात दीड लाख रुपयापर्यंत रक्कम भरता येईल.
आता तर हा व्यवहार आपल्याला ऑनलाईन करता येतो. या खात्याशी सारेच व्यवहार ऑनलाईन करता येतात.
आपण खात्यामध्ये जी रक्कम भरतो, त्यावर व्याज मिळते. जमा रक्कम आणि त्यावर मिळणारे व्याज तसेच खात्यातून काढलेले पैसे यावर आयकराच्या कलम 80 सीसी प्रमाणे सूट मिळते.
5 वर्षांनंतर काढलेले पैसे देखील पूर्णतया टॅक्स फ्री असतात.
5 वर्षांनंतर सदर पीपीएफ खाते त्वरीत बंद करण्याची सुविधा आहे.
हे खाते उघडून 3 वर्षे झाल्यानंतर, त्यामध्ये जेवढी रक्कम जमा होईल, त्यावर आपण कर्ज घेऊ शकता.
हे खात उघडून 7 वर्षे झाल्यानंतर गरजेप्रमाणे आपण त्यातून थोडी थोडी रक्कम काढू शकतो.
या खात्याचे आयुष्यमान 15 वर्षांचे असते, तेव्हा 15 वर्ष पूर्ण होताच हे खाते परिपक्व होते.
अन् त्यामध्ये भरलेली व त्यावरील व्याज अशी भरघोस रक्कम आपल्याला मिळू शकते. आपले बचतीचे धोरण फळाला येते.
15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपली इच्छा असेल तर आणखी 5 वर्षे सदर खाते चालविण्याची आपल्याला मुभा मिळू शकते. म्हणजे आपण अधिकाधिक गुंतवणूक व भविष्याची सोय करू शकता.
या खात्यावर आपण नॉमिनी नियुक्त करू शकता. म्हणजे आपल्या पश्चात या खात्याची देखभाल ती व्यक्ती करू शकते.