दे टाळी… (Enjoy The Benefits Of Clapping)

दे टाळी… (Enjoy The Benefits Of Clapping)

दे टाळी…


हरी नामाचा गजर करणार्‍या टाळ्या, कौतुकाच्या आणि आनंदाच्या टाळ्या, कलेला दाद देणार्‍या टाळ्या, स्वागत करणार्‍या टाळ्या, शुक् शुक् करून संकेत देणार्‍या टाळ्या, सत्काराच्या-विजयाच्या टाळ्या आणि खेळातील आनंद देणार्‍या टाळ्या… यामागं दडलंय काय?
प्रसंग वेगवेगळे, परंतु सगळ्या प्रसंगांच्या शेवटी एक सामायिक गोष्ट घडतेच घडते आणि ती म्हणजे उपस्थित प्रेक्षक, श्रोते यांच्याकडून होणारा टाळ्यांचा कडकडाट. एखादी कलाकृती आवडल्याची ती पोचपावती असते. टाळ्या पडल्यानंतरच आपल्या कामाचे चीज झाल्याची भावना कलाकाराची होते. टाळी ही आनंद व्यक्त करण्याची अगदी सोपी प्रक्रिया नि उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे.
घरी किंवा देवळात आरती करत असताना आपण अगदी सहज आरतीच्या चालीवर तालबद्ध टाळ्या वाजवायला लागतो. आरती म्हणताना, कीर्तन, भजन करताना टाळ्या वाजविणे ही पूर्वापार चालत आलेली प्रथा. टाळ्या वाजवून देवाची प्रार्थना केल्यानं पापाचं क्षालन होतं, असं पूर्वज सांगत आले आणि आपण ऐकत आलो. हे यामागचं धार्मिक कारण झालंं. परंतु टाळ्या वाजवणे हे आरोग्याच्या दृष्टीनेही हितावह आहे. अर्थात यामागे वैज्ञानिक कारणेही आहेत.

टाळी वाजवल्यामुळे होणारे फायदे


टाळी वाजवणे हा एक व्यायाम आहे. आपल्या शरीरात अनेक प्रेशर पॉइंट्स असतात, ज्या पैकी 28 आपल्या हातावर असतात. टाळी वाजवल्यामुळे हे प्रेशर पॉइंट्स दाबले जातात. त्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. दिवसातून 20-30 मिनिटं टाळी वाजवल्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि शरीरात ऑक्सिजनचा संचारही व्यवस्थित होतो.
टाळी वाजवल्यामुळे संधिवाताच्या रुग्णांना आराम मिळतो. सांधेदुखी, मान आणि पाठीच्या दुखण्याने त्रस्त असणार्‍यांना टाळी वाजवण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे प्रेशर पॉइंट दाबतात ज्यामुळे वेदना कमी होतात.
टाळी वाजवल्यामुळे रक्तसंचार वाढतो. यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह चांगल्या पद्धतीने होतो आणि ऑक्सिजनचा प्रवाह चांगला झाल्यामुळे फुफ्फुस निरोगी राहतात. यामुळे अस्थमा आणि फुफ्फुसाच्या अन्य समस्या पासून रक्षण होते.
ज्या लोकांना रक्तदाबाची समस्या असते त्यांना टाळी वाजवल्यामुळे फायदा होतो. टाळी वाजवल्यामुळे रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
लहान मुलांनी पण टाळी वाजवणे फायदेशीर असते. यामुळे कोणताही व्यायाम न करता खेळताखेळताच त्यांच्या हाताचे प्रेशर पॉइंट दबले जातात. ज्यामुळे रक्तसंचार वाढतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पचन सुधारते तसेच बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
कौतुकाने वाजवलेल्या टाळ्या कोणाला आवडत नाहीत? लहान मुलेसुद्धा आनंद झाल्याची प्रतिक्रिया टाळ्या वाजवूनच देतात. त्यांना कशी टाळी वाजवायची हे सांगावंही लागत नाही. मोठ्यांचं अनुकरण करत ती मुलं टाळ्या वाजवतात. त्यावेळेस त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वाहत असतो. लहान मुलांचं दुडक्या चालीत चालणं, बोबडं बोलणं जितकं लोभस असतं ना तितकंच टाळ्या वाजवणं हे देखील दृष्ट लागण्याजोगं असतं. त्यांच्या बाललीला पाहून आपण टाळ्या वाजवल्या तर त्यांनाही कोण आनंद होतो.
किन्नरांना पोटाची खळगी भरण्यासाठी टाळीचा वापर होतो. तृतीयपंथीयांचं संपूर्ण जीवन टाळ्यांवर असतं. हे किन्नर लोक आपल्या समुदयातील लोकांना संकेत देण्यासाठी टाळ्या वाजवतात.