ठेवाल घर साफ, मिळेल मोठा लाभ (Enjoy The Benefit...

ठेवाल घर साफ, मिळेल मोठा लाभ (Enjoy The Benefits Of A Tidy Home)

घर लहान असो वा मोठं, घरात कचरा होतोच. प्रत्येक जणाची वागण्याची तर्‍हा वेगवेगळी असल्याने पसारा होतोच. मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष करून घर अस्ताव्यस्त राहिले तर आरोग्य आणि स्वच्छता राहणार नाही. फेंगशुई शास्त्रानुसार घर विस्कटलेलं असेल तर नकारात्मक उर्जा निर्माण होते. अन् त्याचा आपल्या जीवनावर परिणाम दिसून येतो. त्यामुळे आपलं घर साफ, स्वच्छ टापटीप ठेवणे, ही आपली प्राथमिक गरज मानली पाहिजे.

– घराच्या मुख्य दरवाजाबाहेर पायपुसणे अवश्य ठेवा. आजकाल त्याला डोअर मॅट म्हणतात. त्यामुळे बाहेरील कचरा, धूळ घरात येणार नाही. पण या डोअर मॅटची नीट देखभाल केली जात नाही. त्यामुळे त्याची नियमित साफसफाई करणे गरजेचे आहे.
-• बाहेरच्या दरवाजावर न चुकता, सॅनिटायजर स्प्रे मारून घ्या. म्हणजे तो निर्जंतुक राहील.
-• आजकाल करोनाच्या संसर्गाची भिती आहे. त्यामुळे घरातील प्रवेशद्वाराजवळच सॅनिटायजरची बाटली ठेवा. जेणेकरून जातायेता त्याचा वापर करता येईल.

-• घरात काही जागा, कोपरे असे असतात ज्यांच्याकडे आपलं लक्ष जात नाही. तिथे धूळ, कोळ्याची जाळी जमतात. शिवाय डास, झुरळ यांना लपायला जागा मिळते. तेव्हा अशा जागा, कोपरे आवर्जून साफ करा. त्याचबरोबर घराचे छत आणि भिंती यांवर देखील झाडू मारून सफाई करा.
-• किचनमधील सिंकच्या साफसफाईकडे जास्त लक्ष द्या. कारण आपण भांडी तिथे धुतो, तेव्हा अन्नाचे छोटे कण तिथे जमून राहतात. त्यावर चिलटं येतात, झुरळे येतात. शिवाय ते अन्नकण कुजल्याने घाण वास येतो. हे अन्नकण ड्रेनपाईपमध्ये अडकल्याने सिंक तुंबते. या सर्व बिघाडांवर मात करण्यासाठी सिंकची दररोज साफसफाई करा.

-• खरकटी भांडी रात्रभर सिंकमध्ये ठेवू नका. त्याच्यात राहिलेले अन्नकण खाण्यासाठी झुरळ व अन्य किटक येतात आणि आपले आरोग्य बिघडवतात. तेव्हा सिंकमध्ये अशा भांड्यांची रास लावण्यापेक्षा ती लगेच धुवून टाका.

-• सोफा कव्हर्स, बेडशीटस् आणि उशांचे अभ्रे 4-5 दिवसांनी धुवून घ्या. त्यामध्ये धूळ किंवा घाण साचून राहिल्याने सूक्ष्म किटाणू जन्मतात अन् तुम्ही आजारी पडू शकता. हे कपडे धुण्यास जड पडतात. तेव्हा ते व्हॅक्युम क्लिनरने साफ करा.

-• घरातील गाद्या आणि उशा यांना वेळोवेळी उन्हामध्ये ठेवा. त्यामुळे ते स्वच्छ राहतील व कुबट वास येणार नाही.
-• घरातील पडद्यांच्या स्वच्छतेकडे नीट लक्ष असू द्या. ओले हात या पडद्यांना पुसायची, कित्येक लोकांना वाईट सवय असते ती तोडा. अन् पडदे नियमितपणे धुवायला काढा. अथवा व्हॅक्युम क्लिनरने स्वच्छ करा.
-• घरामध्ये व्यवस्थित सूर्यप्रकाश आणि ताजी हवा खेळती राहील, याकडे विशेष लक्ष द्या. दिवसा घराच्या सर्व खिडक्या उघड्या ठेवा. घरात सूर्यप्रकाश आला तर बारीकसारीक किटाणूंचा संसर्ग होत नाही.

-• शू रॅककडे आपण सहसा दुर्लक्ष करतो. पण त्यामध्ये देखील जळमटे लागू शकतात. धूळ साचू शकते. पादत्राणांमुळे बाहेरील घाण साचू शकते. तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष न करता, वेळोवेळी सफाई करा. रॅकमधील बूट, चप्पल बाहेर काढून रॅक व्यवस्थित साफ करा.
-• घरातील टॉवेल देखील 1-2 दिवसाआड धुवायला टाका. घरातील प्रत्येकाने वेगळा टॉवेल वापरा. कारण एकाच टॉवेलच्या वापराने त्वचेचे विकार जडू शकतात.

-• दररोज सकाळी, खाद्यपदार्थ बनविण्यापूर्वी किचनमधील वापरायची भांडी आधी धुवून घ्या. कारण कितीही साफसफाई ठेवली तरी रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात डास, माशा, किटक, कोळी, झुरळ यांचा वावर असतो. त्यांच्यामार्फत आजार पसरविणारे बॅक्टेरिया व अन्य जंतू या भांड्यांवर सोडले जाण्याची शक्यता असते.
-• भाज्या आणि फळे आधी धुवा आणि मगच चिरा.

-• प्लॅस्टिकच्या बाटल्या दीर्घकाळ वापरू नका. ते आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्याचप्रमाणे प्लॅस्टिकचे कॅन वा कन्टेनर अधिक काळ वापरू नका. त्याऐवजी स्टील अथवा काचेची भांडी वापरा.
-• वॉश बेसिन, बाथरूम, टॉयलेट आणि टूथब्रश ठेवण्याचा परिसर नियमितपणे साफ ठेवा. येथील ओलसरपणामुळे बारीकसारीक किटाणूंची पैदास होते. जी आपल्या आरोग्यास हानिकारक असते.

-• आपल्या फ्रिजची नियमित साफसफाई करा. फ्रिजमधील खाद्यपदार्थ बाहेर काढून साफ करा. पाण्यात थोडे व्हिनेगर घालून साफ केल्यास उत्तम. त्याचप्रमाणे फ्रिजमध्ये खाद्यपदार्थ खचाखच भरून ठेवू नका. -• असं म्हणतात की, स्वच्छ घरात लक्ष्मीचा वास असतो. तेव्हा तिचे वास्तव्य आपल्या घरात राहण्यासाठी तिला मोकळीक द्या. जेणेकरून आरोग्य आणि अर्थ यांचे मोठे लाभ मिळतील.