हे नातंऽऽऽ सुंदर आहे…(Enjoy Every Moment ...

हे नातंऽऽऽ सुंदर आहे…(Enjoy Every Moment In Married Life And Maintain Healthy Relationship)

हे नातंऽऽऽ सुंदर आहे…
वैवाहिक आयुष्यात येणार्‍या सुखदुःखाच्या, यश-अपयशाच्या प्रत्येक क्षणांना महत्त्व आहे.
या प्रत्येक क्षणाकडे सकारात्मकतेने पाहून त्यातून अनुभव घेऊन आपलं नातं सुंदर बनवा.
स्त्री-पुरुष हे दोन्ही घटक जरी नवरा-बायको झाले तरी पूरक आहेत. त्यांच्यासाठी वेगवेगळे निकष नसावेत. आपण सर्वजणच आपल्या आयुष्यात अगदी लहानपणापासूनच कितीतरी नाती निर्माण करतो. काही नाती नकळत निर्माण होतात. पण या सगळ्या नात्यांचा आवाका, मर्यादा, अपेक्षा ह्या सगळ्यांना एक सीमा असते. काही नात्यांसाठी ती ठळक अधोरेखित केलेली तर काही नात्यांसाठी अस्पष्ट होत गेलेली असते. पण ह्या सगळ्या पलीकडचं अमर्याद असं नातं नवरा बायकोचं आहे.
प सुरुवातीला जरी अपेक्षांचं ओझ असलं तरी हळूहळू ते कमी होत जातं. एकमेकांच्या मनातील भावना न सांगता कळू लागतात. या नात्यात भांडण, वादविवाद किंवा मतभेद असणं अगदी साहजिकच आहे, कारण दोन वेगवेगळ्या वातावरणात वाढलेले, दोन वेगवेगळया विश्वात जगलेले हे दोन लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो कलह साहजिकच नैसर्गिक असतो. आणि तो व्हायलाच हवा. कारण आपण आपल्या हक्काच्या विश्‍वासाच्या माणसासोबत भांडत असतो.
आणि म्हणूनच अशा भांडणांत इगो न येता एकमेकांविषयीचा विचार आला पाहिजे.


नवरा जिद्दी असेल, एखाद्या गोष्टीवर अडून राहणारा असेल तर त्यास त्याच्या स्वभावाप्रमाणे वागण्यास वाव द्यावा. कारण बरेचदा ते आपल्या सहनशक्तीची परीक्षा घेत असतात. आणि काही प्रतिउत्तर न मिळाल्यास हळूहळू पूर्ववत होतात.
आधी अनोळखी असणारं नातं हळूहळू होत जाणारी ओळख आणि स्पर्श यामुळे फुलत असतं. असं होत असताना जोडीदाराची एखादी वर्तणूक खटकत असेल तर त्याबद्दल त्याच्याशी स्पष्टपणे बोलून मोकळं व्हायचं. त्याबद्दलची चीड मनात बाळगून ठेवायची नाही. सुरुवातीला एक अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी दुर्लक्षित केल्या जाऊन मग त्याचा पर्वत होतो.
एखाद्या विचारावरून मतभेद झाल्यास समजुतीने घ्या. त्यासाठी बोलायचे बंद होऊ नका.
जोडीदाराच्या वर्तणुकीचा त्रास होत असल्यास त्यास विरोध न करता विश्‍वास आणि प्रेमाने त्याची चूक त्याला स्वतःलाच लक्षात येईल असे वागा.
नवरा बायकोचं नातं हे एकमेकांबद्दलच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपापल्या आवड निवडीला प्राधान्य देत स्वीकारलेलं सुंदर सहजीवन आहे. तेव्हा जोडीदाराची प्रशंसा करा. त्याच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करा. त्याला नवीन गोष्टी करावयाच्या असल्यास प्रोत्साहित करा. तुम्ही सदैव त्याच्या सोबत आहात ही जाणीव त्याला अनुभवू द्या.
काही वेळेस लहानपणापासूनची जडणघडण असते की ज्यात खूप लाड झालेले असतात, चांगल्या वाईट सवयींकडे दुर्लक्ष झालेले असते. आपण म्हणणार ती पूर्व, याप्रमाणे आपलंच म्हणणं खरं करण्याची सवय झालेली असते. अशा व्यक्तींशी पटवून घेणे म्हणजे अवघड असते परंतु अशक्य नसते. इथेही एकमेकांच्या सवयी, त्रुटी, गुण दोष जाणून घेऊन त्यासह एकमेकांना स्वीकारायची तयारी ठेवली पाहिजे.


आयुष्यात रोजच्या रोज नवनवीन समस्या, ताणतणाव, अडथळे येतात. पण ते पार करण्यासाठी, त्यातून बाहेर येण्यासाठी मार्गही असतात. ते शोधले पाहिजेत आणि एकजुटीने त्यातून बाहेर येण्यासाठीचे उपाय शोधले पाहिजेत.
रुसवा, फुगवा, हट्ट, भांडण, अबोला नाही असं एकही नातं नाही. उलट एखादं नातं जास्त चांगलं बहरावं असं वाटत असेल तर या सर्व गोष्टी नात्यात हव्यात असं म्हणावं लागेल.
शेवटचं तरीही महत्त्वाचं म्हणजे नवरा बायको दोहोंनीही कोणत्याही परिस्थितीत एकमेकांचा आदर आणि स्वाभिमान हा जपलाच पाहिजे. दोहोंच्याही आदर आणि स्वाभिमानाला तडा जाणार नाही ही दोघांची नैतिक जबाबदारी असेल.
एवढं सगळं करूनही जर तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल की आपण एकमेकांसोबत फार काळ राहू शकणार नाही, तर मग तुम्ही एखाद्या काऊन्सलरचा सल्ला घेऊ शकता. ते देखील तुम्हाला शांतपणे आणि हुशारीने हाताळता आलं पाहिजे.