खेळताना रंग होळीचा (Enjoy C...

खेळताना रंग होळीचा (Enjoy Colours, Maintain Beauty)

होळीचा आनंद घेताना आपण त्या रंगांमध्ये समरसून जातो. अशा वेळी या रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून थोडी दक्षता घ्यायलाच हवी.
आपल्याकडील सगळेच सण भरभरून आनंद देणारे आहेत. विशेष म्हणजे, आपल्याकडे प्रत्येक सण साजरा करण्याची तर्‍हा वेगळी आहे. होळी-रंगपंचमीही त्यास अपवाद नाही. मात्र विशेषतः हा सण साजरा करताना थोडी काळजी घेतली, तर त्याचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल.

रंगपंचमी खेळण्यापूर्वी…
–    संपूर्ण शरीरावर मॉइश्‍चरायझर किंवा मोहरीचं तेल लावा.
–   केसांना भरपूर तेल लावून ठेवा.
–    शरीर अधिकाधिक झाकलं जाईल, असे कपडे परिधान करा.
–    केसांवर स्कार्फ बांधा किंवा टोपी घाला.
–    डोळ्यांमध्ये लेन्स लावू नका. चष्मा लावा. चष्मा नसल्यास, गॉगल लावा.
–    नखं आणि एकंदरच हाताला खोबरेल तेलाने मालीश करा.
–    नखांवर नेलपॉलिश लावा. पेट्रोलियम जेलीही लावता येईल.

रंगपंचमी खेळताना…
–    नैसर्गिक रंगांचाच वापर करा.
–    काळा, हिरव्या-निळ्या-लाल रंगाच्या गडद रंगछटा, सोनेरी-चंदेरी रंग यांचा वापर मुळीच करू नका. हे रंग तयार करण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. ते अर्थातच हानिकारक असतात.
–    चेहर्‍यावर रंग लागल्यास, तो लगेच कोमट पाण्याने धुवा.
–    डोळ्यात रंग गेल्यास, डोळे लगेच थंड पाण्याने धुवा. थंड पाण्याने धुऊनही डोळ्यांची जळजळ कमी होत नसल्यास, डोळ्यात गुलाबपाण्याचे काही थेंब घाला. तरीही डोळे जळजळत असल्यास, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

रंगपंचमी खेळल्यानंतर…
–    अंघोळ केल्यानंतर रंगांमुळे अंगाला खाज सुटली असेल तर, संपूर्ण अंगावर खोबरेल तेलाने मालीश करा. तुम्ही मॉइश्‍चरायझरही लावू शकता.
–    तरीही खाज जात नसल्यास, अर्धा बादली पाण्यात चार चमचे व्हिनेगर मिसळून, ते पाणी अंगावर घ्या.
–    हे प्रयोग करूनही खाज जात नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला उशीर करू नका.
–    केस धुण्यासाठी हर्बल शाम्पूचा वापर करा. रासायनिक शाम्पूमुळे केसांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
–    रंगांमुळे केस धुतल्यानंतर कोरडे, रूक्ष दिसतात. ते टाळण्यासाठी केसांना मुळापासून टोकापर्यंत कोमट खोबरेल तेल लावा.
–   नखांवर रंग चढल्यास, लिंबाची फोड चोळा.
–    अंग, केसांवरील रंग काढण्यासाठी तीव्र साबणाचा, रॉकेलचा वापर मुळीच करू नका.

रंग घालवणारे घरगुती पॅक
रंगाशिवाय होळी खेळण्यात मजा नाही. परंतु, होळी खेळून झाल्यानंतर शरीरावरील रंग उतरला नाही, तर मात्र ही मजा सजा होते. सिंथेटिक रंगांमुळे चेहर्‍यावर चट्टे येऊ शकतात, त्वचा रूक्ष होऊ शकते. त्यात रंग पूर्णतः निघायला हवा, म्हणून बरेच जण तीव्र साबणांचा, अगदी रॉकेलचाही वापर करता. मात्र यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होऊ शकते. हे सर्व टाळण्यासाठी, घरगुती पॅक तयार करून रंग सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा.
–    बेसनात, गव्हाचा कोंडा, दूध आणि लिंबाचा रस मिसळून पॅक तयार करा. हा पॅक चेहर्‍यास लावून थोडा वाळू द्या. नंतर ओल्या हाताने हळुवार चोळत काढा. पॅक पूर्णपणे हटवल्यानंतर सौम्य साबण आणि पाण्याने त्वचा धुवा.
–    मुलतानी मातीत गुलाब पाणी आणि दही मिसळून पॅक तयार करा. हा पॅक चेहर्‍यावर लावा. पॅक वाळल्यानंतर चेहरा धुवा.
–    केसातील रंग घालवण्यासाठी मुलतानी मातीमध्ये पाणी मिसळून पॅक तयार करा. तो केसांमध्ये लावून वाळू द्या. वाळल्यानंतर केस स्वच्छ धुवा.

नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी…
स्वतः नैसर्गिक रंग तयार करून, त्याने रंगपंचमी खेळा.
लाल =    भेसळविरहित कुंकू + मुलतानी माती
पिवळा =   हळद + टाल्कम पावडर
हिरवा =   पुदिन्याच्या पानांची पूड + चंदन पूड
केशरी =   गुलाबाच्या पाकळ्या + दही
गुलाबी =   गाजराचा अर्क + दही
पोपटी =   तुळशीची पानं + दही
नारिंगी =  बीट + दही

बेरंग होऊ नये म्हणून…
रंगांची मजा लुटताना अनेक जण आपली मर्यादा विसरतात. मौजमजेसाठी मादक पदार्थांचा वापर करतात. अशी मस्ती अंगाशी येऊ शकते. तेव्हा या बाबतीतही सतर्क राहायलाच हवं.
–    होळी म्हणजे पुरणपोळी, तसंच होळी म्हणजे थंडाईही असते… आणि होळी म्हणजे भांगही असते. आपल्या थंडाईत भांग तर मिसळलेली नाही ना, याची काळजी घ्या.
–    होळीचा प्रसाद म्हणजे, अनेक ठिकाणी थोडीशी भांग पिण्याचीही प्रथा आहे. मात्र हल्ली या भांगेमध्ये ही इतर नशीले पदार्थ मिसळले जातात. त्यापासूनही दक्ष राहायला हवं.
–    केवळ पेयांमध्येच नव्हे तर खाद्यपदार्थांमध्येही अशा प्रकारची भेसळ केली जाण्याची शक्यता असते.
हे सर्व टाळण्यासाठी मुळात घराबाहेर खाणं किंवा बाहेरचे पदार्थ खाणंच टाळलं पाहिजे. घरी तयार केलेली थंडाई किंवा इतर पदार्थ मनमुराद खा. म्हणजे होळीही मनमुराद साजरी होईल.


रुषांच्या इंद्रियावर कमेंट करून दिया मिर्झाने माजवली खळबळ… (Dia Mirza’s Comment On Mens Private Part; People Surprised By Tweet)