सौंदर्यवर्धक ज्यूस (Enhance Beauty With Juices)

सौंदर्यवर्धक ज्यूस (Enhance Beauty With Juices)

आपल्या रोजच्या सौंदर्य दैनंदिनीमध्ये सौंदर्यप्रसाधनांच्या बरोबरीने आता सौंदर्यवर्धक ज्यूसेसनाही सामील करा. हे ज्यूस केवळ सौंदर्य जपणार नाहीत, तर त्वचेस सर्व प्रकारच्या तक्रारींपासून दूरही ठेवतील.
आपल्याकडे फळांची वर्षाच्या बाराही महिने उपलब्धता असते. मोसमाप्रमाणे फळं, फुलं, भाज्या इत्यादींनी बाजार फुललेली असतात. याच ताज्या फळांचा आपण जर नियमितपणे आपल्या आहारात समावेश केला, तर आपणही खुलून दिसतो. सौंदर्यासाठी क्लिंजिंग, टोनिंग, फेशिअल असे बरेच बाह्य उपाय आपण करतो. परंतु, सौंदर्यासाठी अंतर्गत उपाय म्हणून फळांचे, भाज्यांचे ज्यूस पिणंही गरजेचं आहे.

तेजस्वी त्वचेसाठी ज्यूस
सफरचंदाचा ज्यूस : सफरचंदाच्या ज्यूसमध्ये अँटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे आपल्या त्वचेवरील डाग जाऊन त्वचा चमकदार बनते. त्याचबरोबर वय दाखवणार्‍या त्वचेवरील सुरकुत्याही यामुळे निघून जातात.
पपईचा ज्यूस : पपई हा खाण्यास जितका सकस आहे, तितकेच त्याचे परिणामही सकस आहेत. पपईचा ज्यूस प्यायल्याने त्वचेवरील सर्व अशुद्धता निघून जाऊन, त्वचा निरोगी बनते आणि त्वचेवर तेज दिसू लागतं.
लिंबू ज्यूस : क जीवनसत्त्वानं ओतप्रोत भरलेला लिंबाचा रस त्वचेसाठी उत्तम क्लिंजर आहे. यामुळे त्वचेच्या पीएच घटकाचं संतुलन राखलं जाऊन, त्वचा सुंदर बनते. अधिक चांगल्या परिणामासाठी, या ज्यूसमध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करा.

गाजर ज्यूस : गाजरामध्ये अ जीवनसत्त्व असतं, हे आपल्याला माहीतच आहे. मुरमं, काळे डाग, सुरकुत्या आणि त्वचेच्या इतरही तक्रारींपासून गाजर ज्यूस आपल्याला सुरक्षित ठेवतो. यामुळे आपली त्वचा तरुण दिसते.
संत्री ज्यूस : स्वच्छ आणि नितळ त्वचेसाठी रोज संत्र्याचा ज्यूस प्या. यामुळे त्वचेचा पोतही छान होतो.
सेलेरी ज्यूस : सेलेरीमधील सोडियममुळे त्वचेस पाण्याचं पोषण मिळतं आणि त्वचा नैसर्गिकरीत्या चमकते.
बिटचा ज्यूस : बीट हे उपयुक्ततेच्या दृष्टीनं सर्वांगसुंदर आहे आणि ते इतरांनाही तसंच सुंदर बनवतं. बिटामध्ये जीवनसत्त्व ए, सी आणि के भरपूर. तसंच लोह आणि पोटॅशियमही बिटामध्ये असतं, ज्यामुळे त्वचेवरील डागांची समस्या राहतच नाही.

घरीच बनवा हे ज्यूस
ब्राइटनिंग ज्यूस : 3 गाजर, काही पालकाची पानं, थोडी पार्सले आणि अर्ध हिरवं सफरचंद. सर्व एकत्र वाटून, गाळून प्या.
फायदे : पार्सलेमुळे शरीराचं शुद्धीकरण होतं. तसंच शरीरात पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, तर पालक तुकतुकीत व नितळ त्वचेसाठी आवश्यक आहे. सफरचंदही चमकदार आणि टोनिंग परिणाम दर्शवतो.
स्किन ग्लो ज्यूस : अननसाचे तुकडे, अर्धी काकडी आणि अर्धं सफरचंद एकत्र करून वाटून त्याचा ज्यूस बनवा. सकाळी किंवा संध्याकाळी कधीही प्या.
फायदे : अननसामधील एंझाइम्स पचनास उपयुक्त ठरतात, तसंच त्वचा निरोगी ठेवतात. काकडी आणि सफरचंद त्वचा स्वच्छ करतं. आणि या तीनही गोष्टी एकत्र करून केलेला ज्यूस त्वचेस निरोगी ठेवतो. तसंच त्वचेवरील मुरमं आणि काळे डागही घालवतो.
स्किन रिफे्रशिंग ज्यूस : 1 काकडी, 3 कप पालक, पाव सफरचंद, 10-15 पुदिन्याची पानं, 1 कप नारळपाणी. नारळपाणी सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र करून ज्यूसरमधून ज्यूस बनवून घ्या. नंतर त्यात नारळपाणी मिसळून प्या.
फायदे : हे तजेला देणारं एनर्जी ज्यूस आहे. हे प्यायल्याने त्वचा सुंदर बनते.

सुंदर केसांसाठी : अर्धी काकडी, 1 लिंबू, 3 दांड्या सेलेरी, 1 सफरचंद. हे सर्व एकत्र करून ज्यूस बनवा. नियमितपणे याचं सेवन करा.
फायदे : भरपूर प्रमाणात पोषकतत्त्वं असलेलं हे ज्यूस केस, तसंच नखं दोन्ही निरोगी राखतं. 

हे ज्यूसही प्या
टोमॅटो ज्यूस : 2 टोमॅटो, काळीमिरी पूड, जिरं,  मीठ, बर्फ, 1 कप पाणी सर्व एकत्र वाटून घ्या. गाळून प्या.
दुधी ज्यूस : 5-6 तुकडे दुधी, प्रत्येकी 3 पानं पुदिना व तुळस, आलं, लिंबू, मीठ, काळीमिरी पूड, जिरं. सर्व एकत्र करून वाटून घ्या आणि गाळून प्या.
काकडी ज्यूस : 2 काकड्या, मीठ, काळीमिरी पावडर, जिरं, बर्फ सर्व वाटून आणि गाळून घ्या.
आवळा ज्यूस : अर्धा कप पाण्यात 2 आवळे, आलं, स्वादानुसार मीठ आणि जिरं घालून वाटून, मग गाळून घ्या.
गाजर ज्यूस : 1 मोठं गाजर, 1 कप पाणी, स्वादानुसार मीठ घालून मिक्सरमध्ये ब्लेंड करा आणि मग गाळून घ्या.
बीट ज्यूस : अर्धा तुकडा बीट, 2 पानं पुदिना, स्वादानुसार जिरं आणि मीठ, 1 कप पाण्यामध्ये घालून मिक्सरमधून ब्लेंड करून घ्या.
कोरफड ज्यूस : 1 कप कोरफड ज्यूस, तुळशीची पानं, आलं, 1 कप पाणी, स्वादानुसार मीठ घालून मिक्सरमधून फिरवून घ्या.